गंधाली दिंडे
खर्डा चिकन
साहित्य: एक किलो चिकन, २५० ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १० ग्रॅम चिकन मसाला, अर्धा चमचा धने पूड, पाव वाटी दही, पाव चमचा हळद, २ ते ३ मिरे, १ तुकडा दालचिनी, २ ते ३ लवंगा, ४ चमचे तूप, पाव वाटी तेल, मीठ स्वादानुसार, १० ते १२ हिरव्या मिरच्या, १ आल्याचा तुकडा, ८ ते १० लसूण पाकळ्या, पाव वाटी कोथिंबीर, ५ ते ६ पुदिन्याची पाने, ३ ते ४ तमालपत्रे, २ हिरवे वेलदोडे, १ वाटी सुके खोबरे, ५० ग्रॅम तीळ.
कृती
प्रथम चिकन स्वच्छ धुऊन घ्यावे. नंतर त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, दही, धने पूड, चिकन मसाला व थोडेसे मीठ घालून चिकन २ तास मॅरिनेट करून घ्यावे. नंतर थोड्याशा तेलामध्ये मिरच्या, आले-लसूण, कोथिंबीर, पुदिना चांगला भाजून घ्यावा. त्याची पेस्ट करून घ्यावी. नंतर सुके खोबरे व तीळ चांगले भाजून घ्यावे व त्याचीदेखील पेस्ट करावी.
पेस्ट करताना थोडेसे पाणी घालावे. नंतर तेलामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्रे, मिरे, हिरवे वेलदोडे घालून फोडणी करावी. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत भाजावे.
नंतर तयार केलेली मिरचीची पेस्ट व खोबऱ्याचे वाटण फोडणीत घालून तेल सुटेपर्यंत चांगले भाजावे. नंतर त्यामध्ये तूप व मॅरिनेट केलेले चिकन घालावे. पाव कप गरम पाणी घालून कढईवर झाकण ठेवावे व चिकन चांगले शिजवून घ्यावे. नंतर वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
(गंधाली दिंडे अन्नप्रक्रिया तज्ज्ञ आहेत.)
-------------------------