चेतन केळकर
होडीतून पाण्यात उडी मारली आणि एका वेगळ्याच जगात गेलो! हजारो रंगांचे, हजारो आकारांचे असे एक से एक कमाल जलचर बघून अक्षरशः वेड लागलं होतं. अशक्य नजारा होता तो! शौकत सर ‘वर जाऊया’ असा इशारा करत होते आणि मी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो. शेवटी वर यावं लागलंच. पण तो पाऊणएक तास कसा गेला, हे कळलंच नाही.
मला कळायला लागल्यापासून मी लक्षद्वीपबद्दल ऐकत आलोय. लहानपणी आपण आजोळाविषयी ऐकतो ना, तसंच! पण तरीही कधी जायचा योग आला नव्हता. तो २००३च्या मार्चमध्ये आला. तयारी चालू झाली. तिकडे जाताना कमीतकमी सामान घेऊन जायचं असल्याकारणानं जास्त काही तयारी करावी लागणार नव्हती.