वेद व्यासंगी, प्रकांड संस्कृत पंडित, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी, रॉयवादी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, धर्मकोश, मीमांसा कोश, पदनाम कोशाचे संपादक, नवभारत मासिकाचे संचालक, साहित्यिक, प्रबोधक अशी कितीतरी वैशिष्ट्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू म्हणून सांगता येतील.
त्यांचे जीवन, कार्य, विचार आणि कर्तृत्वाची नोंद घेऊन त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, साहित्य अकादमी महदत्तर सदस्यत्व (फेलोशिप), साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संस्कृत पंडित, राष्ट्रभूषण आदी सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
ज्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात आणि त्यातही महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषेचा विकास ज्ञानभाषा म्हणून केला नि मराठी साहित्यास आपल्या लेखनाने अभिजात बनवले अशा साहित्यिकाचे ग्रंथ कोणते, असे मराठी सारस्वत समाजास विचारले तर अपवाद व्यक्तीच उत्तर देऊ शकतील. तर्कतीर्थांचं साहित्य वाचणं हा शिळोप्याचा उद्योग नाही.
जेठा मारून बसल्याशिवाय तर्कतीर्थ पचवता येत नाहीत. ते येरा गबाळ्याचे काम नाही. असं का म्हणाल, तर त्यांचं लेखन ललित नाही. ते आहे धर्म, तत्त्वज्ञान, विचार, इतिहास, प्राच्यविद्या क्षेत्रातलं. बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी विचारक म्हणून त्यांचा लौकिक राहिला आहे.
ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असतानाच्या १९६० ते १९८० अशा दोन दशकात सेनापती बापट, महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय प्रकाशित केले; पण तर्कतीर्थांचे समग्र वाङ्मय काय आहे, याचा शोध मात्र महाराष्ट्र सारस्वताने घेतला नाही याचे शल्य मला डाचत होते. म्हणून मी २०१८मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास तर्कतीर्थांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करावे म्हणून विनंती केली होती.
मंडळाने २०१९मध्ये ती जबाबदारी मजवर सोपवली. पाच वर्षांच्या प्रयत्नांतून हाती आलेल्या साहित्याचे १८ खंड मंडळास नुकतेच सादर केले आहेत. लवकरच ते प्रकाशित होतील.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जीवनकाळ १९०१ ते १९९४ असा ९३ वर्षांचा राहिला आहे. त्या अर्थाने ते विसाव्या शतकाचे साक्षीदार नि शिलेदार होत. आपल्या लेखनाचा प्रारंभ त्यांनी तत्कालीन साप्ताहिक केसरीच्या मंगळवार, तारीख ८ फेब्रुवारी १९२७च्या अंकात ‘धर्मशास्त्र संशोधनाची दिशा’ या शीर्षकाचा लेख लिहून केला, तर त्यांचा शेवटचा लेख मृत्युपूर्व संध्येला लिहिला गेला.
त्याचं शीर्षक होतं ‘माणसाची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती कशी जन्माला आली?’ हा लेख म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन सांस्कृतिक धोरणासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया होती.
दैनिक सकाळचे त्यावेळचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी प्रा. बाबूराव शिंदे यांनी तर्कतीर्थांच्या महाबळेश्वरस्थित ‘कृष्णादर्शन’ या निवासस्थानी ता. २६ मे १९९४ रोजी नोंदवून घेतलेल्या मुलाखतवजा प्रतिक्रियेचे लेखरूप होते. ता. २८ व २९ मे १९९४ रोजी नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणसंबंधी परिसंवाद संपन्न होणार होता.
त्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया नोंदवून घेतली होती. ता. २७ मे १९९४ला सकाळी झोपेतच तर्कतीर्थांचे प्राणोत्क्रमण झाल्याचे लक्षात आले. हा शेवटचा लेख मृत्युलेखाबरोबरच दैनिक सकाळच्या २८ मे १९९४च्या अंकात प्रकाशित झाला होता.
तर्कतीर्थांनी १९२७ ते १९९४ असे सुमारे सात दशके साहित्य सृजन केले. त्यात लेख, भाषणे, मुलाखती, प्रबंध, चरित्र, भाषांतर, प्रवासवर्णन, कोश नोंदी, वृत्तांत, पत्रव्यवहार, प्रस्तावना, परीक्षणे असा ऐवज आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय प्रकल्पामध्ये १८ खंडांच्या सुमारे अकरा हजार पृष्ठांत हे साहित्य शब्दांकित आहे.