डॉ. सदानंद मोरे लायबिग किंवा मार्क्स निसर्गाकडे एक अवाढव्य अशी चयापचय व्यवस्था म्हणून पाहतात. या त्यांच्या दृष्टीचा विस्तार केला तर मानव आणि निसर्ग यांची मिळून एक महाव्यवस्था होते. मानव निसर्गाबाहेर नसून निसर्गाचाच एक भाग ठरतो. .त्याचे अस्तित्व आणि जगणे निसर्गाच्या चौकटीतच घडत असते. त्याचे वैशिष्ट्य जर काही असेल, तर तो बुद्धीच्या योगे स्वतःला निसर्गापासून वेगळे करून अभ्यासविषय तयार करतो व त्याचे नियम शोधून काढतो. या नियमांचा उपयोग त्याला स्वतःचे जगणे अधिक सुखकर करण्यासाठी करायचा असतो. त्यासाठी तो सतत निसर्गनियमांच्या आधारेच निसर्गनियमांवर कशी मात मारता येईल यासाठी प्रयत्न करतो.पृथ्वीच्या इतिहासात मानवयुग केव्हा सुरू झाले, हा खरोखरच महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याचे उत्तर शोधताना मानव आणि पृथ्वी (दुसऱ्या शब्दात निसर्ग) यांच्यातील संबंधाच्या चर्चेला हात घातल्याशिवाय पुढे जाताच येत नाही.सेमिटिक किंवा अब्राहमिक धर्मांसाठी हा विषयच सोपा होता. ईश्वराने पृथ्वी निर्माण केली तीच मुळी मानवाच्या उपयोगासाठी अशी धारणा असेल तर पृथ्वीचा- पृथ्वीवरील निसर्गाचा -उपयोग मानवाने स्वतःसाठी करण्यात काहीच गैर नाही. ती ईश्वरेच्छा, ईश्वरी योजना आहे. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी - या तीनही धर्मांची अशीच धारणा होती.तरीही थोडा तपशील शोधू गेले असता, एक वेगळा मुद्दा हाताशी येतो. नंदनवनात वास्तव्य करणाऱ्या आदम आणि ईव्ह यांना ईश्वरानेच सफरचंदाचे फळ तोडण्यास (व अर्थात खाण्यास) मनाई केली होती. याचा अर्थ असा होतो, की निसर्गाचा (मग तो नंदनवनातील असो किंवा आदम अधःपतित होऊन जेथे आला त्या पृथ्वी ग्रहावरील असो) स्वेच्छेनुसार उपभोग घेण्यावर बंधन घालता येते; घातली गेली आणि ते न पाळल्यामुळे मानवाची हानी झाली.हा झाला आदम- ईव्ह नंदनवनात असतानाचा विचार. आदमपासून उत्पन्न झालेल्या मानवाला गहू खाण्याचीही मुभा नव्हती, असेही ऐकिवात आहे. ते काहीही असो. अशा प्रकारे निसर्गाला आपली देवदत्त मालमत्ता समजून त्याचा उपभोग घ्यायचा, असे जर त्या काळातील लोकांना वाटत असेल तर त्यात आश्चर्यकारक काहीच नाही.मानवाने उपयोग केल्यामुळे किंवा उपभोग घेतल्यामुळे निसर्गाची काही हानी होईल, त्यात काही कमतरता येईल याची जाणीव तेव्हा कोणास होण्याइतपत माणसाच्या ज्ञानाची पातळी उंचावली नव्हती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे उपयोग, उपभोगाची साधनेच संख्येने आणि सामर्थ्याने इतकी कमी होती, की त्यामुळे निसर्गाची हानी संभवते हेच मुळी कोणाच्या कल्पनेतही आले नसते.आणि तसेही पाहता निसर्गाचा उपयोग करून घेण्याची क्षेत्रेही मर्यादित होती. अन्न, वस्त्र आणि निवारा ही तीन क्षेत्रे होती. सुरुवातीला माणूस फळे, कंदमुळे आणि शिकारीत मिळणारे प्राणी यांचाच अन्न म्हणून उपयोग करीत असे. अन्नासाठी निसर्गात हस्तक्षेप करायची सुरुवात माणूस शेती करायला लागला तेव्हा झाली.शेतीसाठी जमिनीची नांगरणी वगैरे मशागत करणे, बिया लावणे- पेरणे ही मानवाची कृत्ये नियमितपणे निसर्गात बदल करणारीच होती. आता पुढच्या टप्प्यात माणूस शेतीसाठी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून करण्यात येणारी शेती (देवमातृका) आहाराच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी नाही या निष्कर्षापर्यंत आला व त्याने विहीरी, तळी, पाट इत्यादींचा वापर करून पिकांना कृत्रिम रीतीने पाणी देण्याच्या पद्धती विकसित केल्या.तरीही अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे निसर्गात घडून येणारे बदल इतके क्षुल्लक आणि किरकोळ होते, की त्यामुळे निसर्गाला, पृथ्वीला काही धोका होईल असे कोणाला वाटणे असंभव होते. दुसरे असे, की हा कालखंड शेतीप्रधान होता. उद्योगधंदे होते पण तेही असेच निसर्गाच्या अनुकूलतेवर, मेहेरबानीवर चालणारे, निसर्गाशी जुळवून घेऊन चालणारे.म्हणजेच मानवी उद्योग-उपद्व्यापातून निसर्गाला धोका पोहोचू शकतो याची पूर्ण जाणीव होण्यासाठी यंत्राधिष्ठित उद्योग सुरू होण्याची गरज होती. येथे आणखी एक मुद्दा विचारात घ्यायला हवा..शेतीसाठी, उद्योगांसाठी जे काही लागते (उदाहरणार्थ, ऊर्जा) ते मिळविण्यासाठी निसर्गावरच अवलंबून राहावे लागणार यात काहीच शंका नव्हती. पण अवलंबित्वातही फरक होऊ शकतो. अगदी पाणचक्की किंवा पवनचक्की यासारख्या उपकरणांचा आधार घेताना पाणी हे पाणीच राहाते व वारा हा वाराच राहातो.मानवाच्या प्रगतीत असा एक टप्पा आला, की जेव्हा त्याला ऊर्जेच्या स्वरूपात बदल करता येऊ लागला. पाण्याची वाफ होते हे सर्वांनाच ठाऊक होते. त्यात नवे काहीच नव्हते. पण या वाफेचा ऊर्जास्रोत म्हणून उपयोग करून उत्पादन आणि अन्य प्रक्रिया (उदाहरणार्थ, रेल्वे) अधिक वेगवान करता येतात हे माणसाला उमगले.(पाण्यातून वीज मिळवणे अद्याप दूर होते.) अशा प्रकारे एका द्रव्यातून दुसरे द्रव्य मिळवून त्याचा उपयोग करणे हा खऱ्या अर्थाने हस्तक्षेप होता. ज्या कोण्या शक्तीने (ईश्वर असेल किंवा स्वतः निसर्गही असेल) ही महाभूतात्मक द्रव्ये निर्मिली, तिचा ती द्रव्ये आहेत त्याच स्वरूपात राहावीत वा त्यांचा स्वाभाविक असाच उपयोग व्हावा असाच हेतू असणार (भाषा मानवकेंद्रिय होतेय पण त्याला इलाज नाही. मुद्दा महत्त्वाचा). आता जणू मानव हाच ईश्वरसदृश होऊन निसर्गात हस्तक्षेप करायला शिकला!परत शेतीच्या मुद्द्यावर येऊ. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न लागते आणि हे अन्न ज्या शेतीतून म्हणजेच जमिनीतून उपलब्ध होते, तिची अन्न पिकविण्याची क्षमता टिकवता आली पाहिजे, हे वेगळे सांगायची गरज नाही. आणि ही क्षमता शेती करतानाच, कृषिकर्मातूनच कमी होत असेल तर शेती करायची पद्धत बदलली पाहिजे, ही जाणीव एकूणच निसर्गाच्या जाणिवेच्या तुलनेत संकुचित वाटते. शिवाय तिच्यामागे अंतिमतः निसर्गाच्या काळजीपेक्षा मानवी स्वार्थाचा विचार अधिक असल्याचेही लक्षात येते.शेती पिकली नाही तर खाणार काय? आता पुढचा टप्पा म्हणजे या जाणिवेची कक्षा वाढवायची इतकी वाढवायची, की संपूर्ण निसर्गच तिच्या आवाक्यात यावा. मुळात शेती हा काही वेगळा निसर्ग नसून एकूण निसर्गाचा एक हिस्सा आहे; त्यामुळे एकूण निसर्गाची हानी होत असेल तर त्यातूनच एक हिस्सा असलेल्या शेतीवर, शेतजमिनीवर त्याचा परिणाम होणार हे कोणाच्याही लक्षात यावे.शेतीच्या संदर्भात ही जाणीव शास्त्रीय पद्धतीने पहिल्यांदा व्यक्त करायचे श्रेय जर्मन कृषिरसायन शास्त्रज्ञ जस्टस फॉल लायबिगकडे जाते. याचा उल्लेख यापूर्वी झालेला आहेच. तोच धागा धरून चर्चा पुढे न्यावी लागेल. लायबिग ज्या काळात लिहीत होता त्या काळात युरोप खंडातील औद्योगिक क्रांती जोरात व जोमात होती.या क्रांतीचा संबंध वसाहतवादाशी पोहोचत होता हे वेगळे सांगायला नकोच. कारखाने व त्यांच्यावर आधारित व्यापार फलदायी ठरतो कारण एव्हाना यंत्रे दाखल झाली होती, हे लक्षात आल्याने एकीकडे शेतीला गांभीर्याने घ्यायची गरज नाही अशी भावना निर्माण होत चालली होती. लागवडीखाली असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून काढून घेऊन तेथे कारखाने उभारायचे प्रयत्न राजरोसपणाने चालले होते.इतर युरोपीय राष्ट्रांपेक्षा इंग्लंड यात आघाडीवर होते. या प्रकारासाठी लायबिग ‘एक्सप्रोप्रिएशन’ (Expropriation) हा शब्द वापरतो. विशेष म्हणजे कार्ल मार्क्सला त्याच्या मांडणीसाठी, स्पष्टीकरणासाठी लायबिगच्या लिखाणाचा खूप उपयोग झाला. भांडवलशाहीच्या विकासासाठी सुरवातीला प्राथमिक भांडवलाची (Primitive Capital) जुळवाजुळव करावी लागते.मार्क्स त्याला Accumulation of Primitive Capital म्हणतो. त्याच्या उपलब्धीचा मार्ग म्हणजे शेतीवर दरोडा! भांडवलशाही ज्यावर आधारित आहे. त्या कारखान्याला लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून कशी मिळणार? त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना जाचक असे कायदे करवून घ्यायचे जेणेकरून त्यांना शेती परवडणारच नाही.आता एकदा शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवले, की एका बाजूला त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवून तेथे उद्योग उभारायचे व दुसरीकडे स्वतःच्या मालकीच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला वंचित झालेल्या ज्या शेतकऱ्यांना पोटासाठी काहीतरी करणे भागच पडणार, त्यांची कारखान्यात मजूर म्हणून भरती करायची. तेथे त्यांच्या श्रमाचा पुरेसा मोबदला (वेतनाच्या रूपात) न देता वरकड हिस्सा काढून घ्यायचा.या प्रकाराला शोषण (Exploitation) म्हणतात. थोडक्यात भांडवलशाहीचा प्रारंभिक विकास एक्सप्रोप्रिएशन आणि एक्स्प्लॉयटेशन या दोन प्रक्रियांमधून झाला. पुढील टप्प्यावर एक्सप्रोप्रिएशन थांबले असेल पण एक्स्प्लॉयटेशन चालूच राहिले. हा झाला एक भाग. पण आता दुसरा मुद्दा शिल्लक राहतोच.भांडवलदारांच्या दुष्ट नजरेतून वाचलेल्या शेतीचे काय करायचे?खरेतर अशा प्रकारचा प्रश्न औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या काळात पडलाही नसता. तेव्हा शेती करण्याची एकच एक अशी पारंपरिक पद्धत प्रचलित होती. आता उद्योगधंदे आले, यंत्रे आली व या नव्या प्रकारच्या उद्योगाची पद्धत तिच्या वैचारिक भूमिकेसह शेतीलाही लावली पाहिले, असा विचार बळावू लागला. शेती हा इतर नव्या भांडवलशाही उद्योगांसारखाच एक उद्योग आहे, असे वाटू लागले. शेतीचे व्यापारीकरण करावे अशी इच्छा सार्वत्रिक झाली.लायबिगला हे मान्य नव्हते. उद्योगाप्रमाणे शेती करायची ही कल्पना म्हणजे दरोडेखोरी अर्थव्यवस्था (Robbery Economy) होय, असा खळबळजनक आरोप त्याने केला. ‘प्लंडर’ (Plunder) हा आणखी एक शब्द. ही एकूण व्यवस्थाच Robbery System आहे..लायबिगच्या मते पारंपरिक शेती ज्या तत्त्वावर आधारित होती ते तत्त्व म्हणजे, आपण जेवढे जमिनीतून घेतो तेवढे तिला परत करायचे. समतोल राखण्याची हीच नैसर्गिक पद्धत होय.लायबिगचा भर मुख्यत्वे शेतीवर असला, तरी एकूण निसर्ग हीच एक व्यवस्था असल्याचे त्याचे मत होतेच. त्याला शेतीच्या प्रत्यक्ष कर्माकडे (Practice) लक्ष वेधायचे होते म्हणून त्याने लेखनाचा पैस मर्यादित ठेवला. एरवी नंतरच्या काळात ज्यांना Ecology, Environmental Science असे संबोधिले गेले त्या ज्ञानशाखांची मुळे ज्यांच्यात आढळून येतात त्यांच्यात लायबिगचा समावेश होतो.लायबिगच्या मतांच्या मार्क्सच्या मतांशी असलेला संबंध अधोरेखित करीत जॉन बेलामी फॉस्टर यांनी अलीकडे एक वेगळी मांडणी केली आहे. मार्क्सच्या लेखनातील निसर्गाचे संदर्भ शोधत फॉस्टरने मार्क्सवादाचीच फेरमांडणी केली, असे म्हणावे लागते. दुर्दैवाने मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या अन्वयार्थ लावायची मक्तेदारी ज्या कम्युनिस्ट देशांकडे होती त्यांनी मार्क्सच्या या विचारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचा साम्यवाद (किंवा मार्क्सवाद) हा भांडवलशाहीचा प्रतिस्पर्धी न वाटता तिची सुधारित आवृत्ती वाटू लागते.मार्क्सचे विचार व लढा केवळ उत्पादनसाधनांच्या मालकीपुरताच मर्यादित नसून उत्पादनसाधनांविषयीसुद्धा त्याने गंभीर चिंतन केले आहे. भांडवलशाहीच्या मूलतत्त्वांना तो भिडला असून उत्पादनसाधने अंतिमतः जेथून उपलब्ध होतात त्या निसर्ग नावाच्या महास्रोताचाही तो विचार करतो. या विचारात त्याला लायबिगचा आधार मिळाला यात संशय नाही.पण लायबिगचे नाव होण्यापूर्वी, तरुण असताना (या टप्प्याला ‘अर्ली मार्क्स’ म्हणायची पद्धत आहे.) मार्क्सने निसर्गाचा विचार केला होता. हा विचार त्याने हेगेल व फ्यूरबाख यांच्या मांडणीच्या पार्श्वभूमीवर केलेला होता. त्याच्या इकॉनॉमिक अॅण्ड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्टस या प्रारंभिक पुस्तकाची दखल घेतली तरी हे स्पष्ट होते.मानव, निसर्ग आणि समाज यांच्यातील संबंधाचा वेध घेत मार्क्सने मानवाचे आणि निसर्गाचे, मानवाचे आणि समाजाचे आणि मानवाच्या स्वतःशीच असलेल्या नात्याचे विश्लेषण करीत भांडवलशाही व्यवस्थेत माणूस त्याच्या निसर्गाशी, समाजाशी आणि स्वतःशी असलेल्या नात्यांपासून कसा दुरावतो याचे विश्लेषण केले आहे. या परात्मता (Alienation) असे म्हटले जाते.लायबिगमुळे मार्क्सचे निसर्गविषयक विचार अधिक परिपक्व झाले असे म्हणायला हरकत नाही. तथापि, पोथीनिष्ठ मार्क्सवाद्यांनी मार्क्सवादाला विज्ञान ठरवण्याच्या नादात त्याच्याच अशा विचारांकडे दुर्लक्ष केले. मार्क्सची ‘कॅपिटलपूर्व’ मांडणी ही अवैज्ञानिक, हेगेलियन चिकित्सावादाच्या प्रभावाखालील, अपरिपक्व अवस्थेतील ठरवून टाकली.खरेतर मुळात, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी सामाजिक विज्ञानाचा विषय असलेला मनुष्यप्राणी हा नैसर्गिक विज्ञानांचा विषय असलेल्या वस्तूंप्रमाणे निर्जीव (व इतर प्राण्यांप्रमाणे पुरेसे आत्मभान नसणारा) नाही, याचे मुळात मार्क्सचेही भान सुटले होते. त्यामुळे त्याचा फायदा त्याच्या काही अनुयायांनी घेतला व मानवालाच काय परंतु निसर्गालाही वस्तुरूप करून टाकले. त्यांच्यातील संबंधांनाही यांत्रिक ठरवले.लायबिग काय किंवा मार्क्स काय निसर्गाकडे एक अवाढव्य अशी चयापचय व्यवस्था (Metabolic System) म्हणून पाहतात. या त्यांच्या दृष्टीचा विस्तार केला तर मानव आणि निसर्ग यांची मिळून एक महाव्यवस्था होते. मानव निसर्गाबाहेर नसून निसर्गाचाच एक भाग ठरतो. त्याचे अस्तित्व आणि जगणे निसर्गाच्या चौकटीतच घडत असते.त्याचे वैशिष्ट्य जर काही असेल, तर तो बुद्धीच्या योगे स्वतःला निसर्गापासून वेगळे करून अभ्यासविषय तयार करतो व त्याचे नियम शोधून काढतो. या नियमांचा उपयोग त्याला स्वतःचे जगणे अधिक सुखकर करण्यासाठी करायचा असतो. त्यासाठी तो सतत निसर्गनियमांच्या आधारेच निसर्गनियमांवर कशी मात मारता येईल यासाठी प्रयत्न करतो. पण ही मात म्हणजे सूट किंवा सवलत या स्वरूपाची असते. तेथे नियम मांडणे शक्य नसते.(डॉ. सदानंद मोरे इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि संशोधक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.)-----------------------------