शेवटी लग्न म्हणजे फक्त व्यवहार नसतो, मुलाबाळांसाठीची व्यवस्था नसते, तर...

जपानसारख्या देशात लग्नच आता फार होत नाहीत.
marriage
marriageesakal
Updated on

डॉ. आशुतोष जावडेकर

लग्नसराई आली की आपला सगळा देश लग्नाळू होतो! मावशा, काकवा वय विसरून (किंवा स्मरून) लग्नाआधी ब्यूटी पार्लर जवळ करतात, मध्यवयीन पुरुष कपाटात आत ठेवलेले कुर्ते आणि ब्लेझर घालून आरशासमोर स्वतःला न्याहाळतात.

ज्यांची लग्नं ठरलेली असतात त्यांचे तर दिवस अनेक अर्थाने भरलेले असतात! म्हणजे पोरग्याला मित्र बॅचलर पार्टीच्या नावाखाली तुडवत असतात.

पोरीला तिच्या (विशेषतः अद्याप लग्न न ठरलेल्या) मैत्रिणी खरेदी वगैरे करताना टोमणे मारून नामोहरम करत असतात.

म्हणजे एखादं घर आदर्श असेलही, जिथं हे सगळं होत नाही - जिथे रुसवे, मानापमान वगैरेला जागा नसते, पण हे अपवाद असतात. सहसा भारतीय लग्न हा फुल ऑन मेलोड्रामा असतो!

लग्न म्हणजे शरीरसंबंध असं स्वच्छपणे पत्रिकेवर एकेकाळी छापलं जायचं. पुढे लग्नाचे अन्यही हेतू असतात, हे गृहीत धरून पत्रिकांचा मजकूर आणि खुद्द लग्नाचं स्वरूप बदलत गेलं.

लग्न म्हणजे मुलं-बाळं, संसार, इथपासून लग्नाआधीच आम्हाला मुलं नको आहेत, आमची करिअर मुख्य आहे, असं सांगणारी नवी पिढी समोर येऊ लागली.

प्रणय लग्नानंतरच साजरा करायचा असतो अशी आता जे चाळिशीत आहेत त्या पिढीची समजूत होती. (त्यांना चान्सदेखील दुसरा फार नव्हता म्हणा!) बघता बघता हे हास्यास्पद वाटेल इतक्या झपाट्याने काळ पुढे सरकला.

वयात आल्यावर थोड्याच काळात प्रणयाचं सुख सर्रास घेणारी पिढी आज आसपास आहे. कधी ती ते लपवते, कधी दोस्तांसोबत असताना मिरवते, तर कधी काही नसतानाही भासवते! अशा सगळ्या झपाट्याने झालेल्या बदलांमध्ये मुळात लग्न ही गोष्ट टिकून राहिली आहे हेच विशेष. जपानसारख्या देशात लग्नच आता फार होत नाहीत.

संसार वगैरे फार पुढच्या गोष्टी. पण भारतात लग्न आहेत आणि राहतील असं माझं मन सांगतं. एक तर आपल्याला नाट्य आवडतं. खेरीज लग्नात जशा काही गैरसोयी असतात, तशा कायदेशीर सोयीही असतात.

म्हटलं तर तो रोखठोक व्यवहार असतो, म्हटलं तर गुलाबी थंडीमधला रोमान्स आणि बरेचदा याच्या मधलं काहीतरी. आजही मुलांना लग्न करायचं आहे हे दिसतंय.

मधुराणी प्रभुलकर यांच्या यूट्यूबवरच्या कवितेच्या पानात या सिरीजमध्ये माझ्या काव्यावर जो एपिसोड आहे, त्यात मी एक गाणं गिटारवर गायलंय.

अगदी आत्ता विशीत असलेली अनेक मंडळीदेखील मला त्या गाण्याला दाद देत गेली. काय लिहिलेलं मी त्यात? - ‘उंची- बिंची मोजूच नये / पगार बिगार तर पाहूच नये / सहज जुळावे सूर अन सहज मिळावं गाणं!/ काय तरी राव हे स्थळ बघणं!’

आता प्रत्यक्षात उंची, पगारच काय, कांतीचा वर्ण, जमीनजुमला, समाजातले कनेक्ट आणि मुख्य म्हणजे जात हे सगळं बघितलं जातं.

अरेंज्ड मॅरेज नको असं माझ्या पिढीत तरी प्रत्येकाला वाटायचं. माझी पिढी म्हणजे मगाशी उल्लेख केलेली चाळिशीची पिढी. दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे बघत आयुष्यात एकदाच (आणि एकाच व्यक्तीवर) प्रेम होतं असं मनोभावे मानणारी आमची गरीब पिढी.

त्यामुळे ते प्रेम ज्यावर बसेल तोच/ तीच आपला लग्नाचा जोडीदार असावा/असावी अशी इच्छा असणं स्वाभाविक. आमच्यापैकी काहींना ते साधलं, बऱ्याच जणांची ठरवून लग्न झाली आणि त्यांचं काही फार बिघडलं असं अद्याप दिसलेलं नाही.

‘लिव्ह इन’चा पर्याय तेव्हा नव्हताच. तो शब्द पहिल्यांदा आमच्या पिढीने ऐकला तेव्हा आमची पिढी हादरली. त्या शब्दाचा अर्थ कळला, पण पचला असं अजूनही वाटत नाही. पण काळ हा निर्मम असतो, तो ‘दिलवाले पिढीत’ अडकला नाही! प्रेमाचे नवे संकेत आले, सहजीवनाचे नवे प्रयोग सुरू झाले.

कधी पालकांना पटले, कधी नाहीत. बऱ्याचदा कळलेच नाहीत. हे भारतीय लिव्ह इनचं खास वैशिष्ट्य. या नव्या पिढीला बंडखोरी हवी होती, पण पालकांच्या पैशाच्या जिवावर! त्यामुळे शिक्षणासाठी बाहेर गेल्यावर लिव्ह इनमध्ये राहताना अमेरिकी जोडप्यासारखं स्वतःच्या जिवावर लिव्ह इनमधला संसार पेलवला नाही.

पैसे पालकांचे होते, गुंतवणूक बव्हंशी शारीरिक होती, आणि प्रेम नसून मुळात तो प्रयोग होता. त्यातून बाहेर पडल्यावर सगळ्यांना ब्रेक-अपचे धक्के पचले नाहीत. कधीकधी पराकोटीचं नैराश्य आलं. अनेकांची काउन्सिलिंग सेशन सुरू झाली.

मग काहींना वाटलं की प्रेम वगैरे कटकट नकोच. निर्णय आपला आपण घेतला आणि चुकला म्हणजे! त्यापेक्षा पालक म्हणतात तसं करू. चुकली निवड आणि फसलं लग्न तर जबाबदारी त्यांची! दुसरीकडे ठरवून लग्न करण्याची पद्धत बघता बघता किती बदलत गेली.

विशीच्या माझ्या अनेक तरुण मित्र मैत्रिणींमुळे मी लग्न ठरवणाऱ्या संस्थांची ॲप पाहिली. मस्त आहेत! म्हणजे त्यात रीतसर पत्रिका वगैरेही जुळवली जाते आणि होतकरू वधूवरांना खासगी चॅटदेखील करायची मुभा असते. अगदी देशी टिंडर!

marriage
Inter-Caste Marriage: प्रेमात 'जात' आडवी! आंतरजातीय विवाहाला विरोध करत स्वत:च्या अधिकारी मुलीचंच केलं अपहरण

पण या सगळ्यातून जाताना जितके पर्याय अधिक, तितकी नवी पिढी अधिक गोंधळलेली मला दिसते आहे. तेही माझ्याशी खासगीत बोलताना ही कबुली देतात. मुळात लग्नाचं प्रयोजन काय हेच अनेकांना उमगत नाही सध्या.

म्हटलं तर शारीरिक सुख तसंही मिळत असतं, त्यात वैविध्यही असतं, पुढे मुलंबाळं असावीत का नाही याबाबत मनात गोंधळ असतो. मग बहुधा पिअर प्रेशर तत्त्वाने एकानं केलं की दुसऱ्याला करावंस वाटतं.

प्रेमविवाह ही तर आता दुर्मीळ होत जाणारी गोष्ट दिसते. कारण अनेकविध नात्यांमधून प्रेमाचे अर्थ समजून पुढे जाणारी ही पिढी आहे आणि लग्न करतेवेळी मात्र त्यातला बहुसंख्य लोकांना आर्थिक सुरक्षितता हा निकष अधिक मोलाचा वाटतो, हे सत्य आहे.

माझे विशीतले मित्र मला सांगतात, ‘आशु दा, पोरींना लग्न म्हणजे इकॉनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये जाण्याची संधी वाटते. आम्ही सगळं रेडी त्यांच्या हातात ठेवावं, असं त्यांना वाटतं.’

दुसरीकडे तरुण मुली तक्रार करतात, की मुलगे अतिशय मनमानी करतात, ते इन्सेंसिटिव्ह असतात, आम्ही मुली घर सोडणार असतो याची त्यांना जाणीव नसते. मला त्या सगळ्यांना एकत्र बसवून एकदा एक मोठ्ठं लेक्चर झोडायचं आहे.

मी जणू त्यांना सांगतो - सोलो जर्नी करायचं धाडस असेल तर तसं करा. प्रेमात पडून लग्न करणार असाल तर ते करा. पालकांवर विश्वास ठेवून लग्न कराल तर तेही ठीक. एकत्र राहण्याचा प्रयोग करताय? हरकत नाहीच.

पण सगळ्या परिस्थितीत जबाबदारी तुमचीच असेल हे ध्यानी घ्या. पालकांची निवड असेल किंवा तुमची, पण टिकवण्यासाठी लागणारं कौशल्य तुमचंच असेल.

कॉलेजमधल्या प्रेमिकांसारखं वागून संसार होत नाही. प्रयोग करताना प्रयोग फसला तर काय करायचं, याचीही पूर्ण तयारी करून ठेवा.

marriage
Marriage : मुलाकडे शेती हवी, पण शेतकरी नवरा नको गं बाई

शेवटी लग्न म्हणजे फक्त व्यवहार नसतो, फक्त मुलाबाळांसाठीची व्यवस्था नसते, फक्त संसारदेखील नसतो. एक लांबलचक निवड असते ती. जिथे आपण दमून घरी आल्यावर हक्काने आपल्या पार्टनरच्या कुशीत पडू शकू, हक्काने त्याच्या/तिच्या गळ्यात गळा घालून रडू शकू, हसू शकू, फिरू शकू.

ती निवड काळजीपूर्वक करायला हवी हे खरंच, पण माणूस परिवर्तनीय असतो हेही भान हवं. समोरचा बदलतो तसे आपणही बदलत जातो अनेकदा.

जणू एकाच माणसाच्या बदललेल्या नवनव्या रूपांशी पुन्हा पुन्हा लग्न लागल्याचा प्रत्यय दीर्घजीवी लग्नातली जोडपी घेतात! हे थ्रिलिंग असतं आणि ते थ्रिल अनुभवानेच कळतं.

अडथळे, गैरसमज, दुरावा हे सगळं त्या प्रदीर्घ वाटेवर असणार हे गृहीत धरूनच सात पावलं टाकायला हवीत. पण एकदा ते गृहीत धरलं की जो आश्वासक हात नंतर हातात येतो आणि राहतो, त्याची खुमारी वेगळीच असते.

प्रेमविवाह, स्थळ बघून झालेले विवाह किंवा बिनलग्नाचे संसार या सगळ्याची अंतिम फलश्रुती विश्वास ही असते.

एकमेकांवर असलेला गाढ विश्वास हे त्या सगळ्या वाटेवरून निरंतर चालत राहिल्याचं बक्षीस असतं! ते तुम्हाला मिळावं या माझ्याकडून शुभेच्छा!

बाकी वेडिंग सीझन आहे, लग्न वाजत गाजत होणार आहेत, वरातीत घोड्यापुढे मस्त नाचायचं आहे आणि नटून सजून सगळा मेलोड्रामा एन्जॉय करायचा आहे!

------------------

marriage
Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानची लेक अखेर लग्नबंधनात! आयरा-नुपूरचं मराठमोळ्या थाटात पार पडलं शुभमंगल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()