लोणी भापकरमधील मल्लिकार्जुन मंदिर हे भूमिज शैलीतील असून मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. यातील उत्तरेकडील प्रवेशद्वार मुख्य आहे. आत शिरल्यावर सभामंडप तोलून धरणारे चार खांब त्यांच्यावरच्या कोरीवकामाने आपले लक्ष वेधून घेतात. छतावरील कोरीवकामसुद्धा लक्षणीय आहे.
डॉ. मोहित विजय रोजेकर
पुण्याच्या पूर्वेस साधारण ८०-९० किलोमीटर अंतरावर, जेजुरीच्या पुढे बारामती रस्त्यावर लोणी भापकर गाव आहे. गावाचा तोंडावळा आपल्या पाहण्यातल्या बाकीच्या गावांसारखाच असला तरी या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील समृद्ध शिल्पवैभव.
गावात शिरल्यावर मल्लिकार्जुन देवस्थानचा रस्ता विचारात जायचे. वाटेत उजव्या हाताला सोमेश्वर नावाचे एक छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरावर काही विशेष कोरीव काम नाही, पण समोरच्या मोकळ्या जागेत सुमारे १५-२० वीरगळ आहेत.
पूर्वी कधीतरी इथे मोठ्या लढाया झाल्या असणार किंवा इथले वीर लढवय्ये समरांगणी धारातीर्थी पडले असणार. इतिहासाच्या अभ्यासकांना आणि जाणकारांना हे वीरगळ म्हणजे अभ्यासाची मोठीच पर्वणी ठरेल.
इथून पुढे उजवीकडे वळून थोडे अंतर गेले की डाव्या हाताला मोठे आणि स्वच्छ प्रांगण दृष्टीस पडते. इथे आहे मल्लिकार्जुन देवस्थान. मंदिराकडे जाताना एका चिंचेच्या झाडाखाली वराहमूर्ती दिसते. मुखाकडचा भाग जरा भग्न झाला आहे, परंतु त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे.
शिल्पाच्या पाठीवरील कोरीवकाम जणू झूल पांघरल्यासारखे वाटते. यावर १४२ मूर्ती अंकित आहेत. त्याशिवाय चारही पायांवर विविध मूर्ती आणि आभूषणे कोरलेली आहेत. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात वालूर, चारठाणा, गोसावी पिंपळगाव या जागी वराहमूर्ती सापडल्या आहेत.
मध्यप्रदेशात खजुराहो आणि सागर जिल्ह्यातील ऐरन येथेही अशा मूर्ती सापडल्याचे उल्लेख आहेत. परंतु एकंदरच अशी शिल्प अत्यंत दुर्मीळ. इसवी सनाच्या १२-१३ शतकापर्यंत अशा यज्ञवराहांचे पूजन होत असे, त्यानंतर त्यांची जागा विष्णू मूर्तींनी घेतली असावी असे जाणकारांचे मत आहे.
मल्लिकार्जुन मंदिर हे भूमिज शैलीतील असून मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. यातील उत्तरेकडील प्रवेशद्वार मुख्य आहे. आत शिरल्यावर सभामंडप तोलून धरणारे चार खांब त्यांच्यावरच्या कोरीवकामाने आपले लक्ष वेधून घेतात.
छतावरील कोरीवकामसुद्धा लक्षणीय आहे. मंदिराची रचना अर्ध्यापर्यंत दगड आणि त्यावरील शिखर हे विटांमधून अशी आहे. कालौघात १२व्या शतकातील हे मंदिर जरासे डावीकडे झुकलेले आहे.
मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या अत्यंत सुंदर अशा प्रतिमा आहेत. तसेच डावीकडच्या कोनड्यामध्ये एक भग्न विष्णुमूर्ती आहे. मात्र हातातील आयुधे झिजली असल्याने विष्णुमूर्तींच्या २४ प्रकारांपैकी ती कोणती हे ओळखणे कठीण आहे.
शिवलिंगाची दिशाही नेहमीप्रमाणे उत्तरेकडे नसून पूर्वेकडे आहे. अभिषेकाचे तीर्थ वाहून जाण्यासाठीचा मूळ मार्गही येथे नाही. शिवाय गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस कोठेही याला गोमुख /मकरमुख अस्तित्वात नाही.
यावरून हे मंदिर मूलतः विष्णूंचे होते परंतु परकीय आक्रमणादरम्यान मूळ मूर्ती भग्न झाल्याकारणाने अथवा लपवली गेल्याने नंतर मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली असावी, असा अंदाज बांधता येतो.
मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजासमोर एक रेखीव पुष्करिणी आहे. काही पायऱ्या उतरून थोडी सपाटी आणि परत पायऱ्या अशी याची रचना आहे. या पुष्करिणीच्या भिंतीमध्ये २४ कोनाडे आहेत.
बहुतेक त्यात विष्णूंच्या हातातील आयुधक्रमानुसार २४ प्रकारांच्या एकेक मूर्ती असाव्यात ज्या कालौघात इतरत्र विखुरल्या गेल्या असतील. कदाचित मूर्तिभंजकांच्या भीतीने पुष्करिणीमध्ये विसर्जित केल्या किंवा लपवल्यासुद्धा असतील.
पायऱ्यांच्या डाव्या हाताला पुष्करिणीच्या कडेला एक दगडी मंडप आहे. त्यावरसुद्धा अत्यंत सुंदर अशी शिल्पे अंकित आहेत. काही अभ्यासकांच्या मते हा वराह मंडप असून प्रांगणात असलेल्या वराह मूर्तीची मूळ जागा ही असावी.
एकंदरीतच मंदिर, पुष्करिणी आणि वराहमूर्ती असा सुंदर मिलाफ इथे बघायला मिळतो. ऊन, पाऊस, वारा यांचे आघात सोसत हा वारसा शेकडो वर्षे त्याचे अस्तित्व टिकून आहे. त्यात आता सुधारणा करता नाही आली तरी किमान आहे त्या स्वरूपात आपण त्याचे जतन करू शकलो तरी खूप आहे.
---------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.