शेताशिवारांना भाकरीची शाश्वती सतत देण्याइतपत तर पावसानं कायम जगाच्या सोबत राहावं.
पावसा तू येत राहा. उडत्या पाखरांच्या गाण्यांना साथ द्यायला तू येत राहा...
ढगांच्या चरणांवर ठेवलेली एवढी एक ही भिजलेली प्रार्थना!
गावाकडच्या जत्रेत हातपाय गोंदून घ्यावेत, तशा सगळ्या आयुष्यावरच पावसाच्या आठवणी गोंदून राहिलेल्या... पाऊस आवडत नाही, असं म्हणणारा माणूस जगात कुठं सापडायचा नाही. पावसावर निबंध लिहिण्याची अवघड नौबत कधी वर्गात, कधी परीक्षेत येत राहिली, तेव्हा वाटायचं, ‘पाऊस काय लिहायची गोष्ट आहे?’ म्हणजे भिजलेलं मन निबंधात कसं लिहायचं? थोडक्यात काय, तर पुष्कळदा मनमुराद आनंदही शब्दांत नाही बांधता येत!
२.
पिकांनाच काय, माणसांनाही कोंभ फुटतात पाऊस झेलताना... पावसात धिंगाणा घालताना. पावसावर काय कविताबिविता लिहिणार यार! पाऊस हीच एक केवढी मोठी कविता आहे! म्हणजे, एक दीर्घ कविताच सगळं पुस्तक भरून अथवा भिजवून टाकणारी... होय, नुसत्या पावसाच्या आठवणीनंही माणसाचं मन अक्षरश: मनमोर होतं. मग अशावेळी एकेक आठवण ढग होते... पावसाळलेले दिवस आठवतात नि आस्ते आस्ते मग मन भिजत राहातं पावसाच्या चिंबानुभवांनी... इतकंच काय पावसाच्या आठवणीनेही चिंबओल होणारी माणसंही जगभर भेटणारी आहेतच की!
३.
पाऊस बहुरूपीणी. पाऊस रूपोत्सव. पाऊस दयापुरुष. पाऊस बिनधास्त. पाऊस अघोरी. पाऊस मायबाप. पाऊस बाजार उठवणारा. पाऊस रानात गायीवासरं झोडपून काढणारा. पाऊस गाढवं-कुत्री भिजून-थिजून टाकणारा. पाऊस रपरपणारा. पाऊस गायब होणारा...!! पावसाचे अवतार तेहतीस कोटी देवांचीही संख्या ओलांडून पुढं जाणारे... पावसाला असं सहज चिमटीत पकडणारा माणूस अजून कुठं जन्मलाय...? कितीही महाग्रंथ लिहून झाले तरी पाऊस मात्र अमृतअमरच.
४.
अंधाराचा शामियाना पांघरून संध्याकाळी पाऊस येतो पुष्कळदा आणि हमखासही. सकाबापू देवळामधी पोचलेला असतो एव्हाना. देवापुढं बसून त्याची रोजची तेलवात सुरू असते. सर्वत्र लाइट गुल होते. आणि मग दातओठ खाणाऱ्या एखाद्या रागीट माणसासारखे ढग असे चहूबाजूंनी भरून येतात. जणू की ढगच फुटतात... सगळीकडं पाणीपाणी होते. तेव्हा सकाबापूच्या दोन्ही डोळ्यांतून पावसाचे खारट पाण्याचे ढग वाहतात. खेड्यांचा सगळा सदरा फाडून पाऊस अडमदिडम धुमाडधुमाड कोसळतो. हा असा बेभान कोसळणारा पाऊस देवाला दिसत असावा का?
५.
शिवारातली सुगी गावांत ओतून देणाराही पाऊसच. मातीखाली झोपी गेलेल्या बियाणांना पावसाच्या चिंब अलार्ममुळे जाग येते. बीज आणि ढग यांची ओळख प्रत्येक पेरणीच्यावेळी घट्ट झालेलीच असते. पाऊस असा धिंगाणा करत कधीही कोसळला म्हणजे वेली-झाडांच्या पानांचं कोवळेपण पोपटी होऊन जातं. पाखरांच्या चोचींमधून पंडित हरिप्रसाद चौरसियांचा जणू सुखी वेणूनाद अधिकच रमणीय होत जातो. खरं म्हणजे, पाऊस हाच गायक आहे. सरीसरींमधून बासरी घेऊन हिंडणारा. संगीताचं घर सरींच्या स्वरांनी पावसाशी जुडलेलं असतंच... पावा आणि पाऊस यांच्या स्वरधारा मनं भिजवणाऱ्याच.
६.
पावसाला रंग नाही; पाण्याला रंग नाही, असं खरंतर खूपदा कानांवर पडतं. पण, हे फारसं खरं नाही. अहो, झाडांना हिरवा रंग ही पावसाचीच देणगी आहे. एवढ्या जमिनींच्या सावळेपणाला आशीर्वाद पावसाचाच. प्रसन्न इंद्रधनूच्या सात रंगांशी खेळणारे अंतरंग मुळात तर पावसाचेच. पाखरांच्या एवढ्या आवाजांच्या तऱ्हा या पावसाला वगळून नाहीच स्पष्ट करता येत... ही सगळी पिकं हलतात, डुलतात, खेळतात, फळतात, बहरतात; पावसाशी सख्य असल्यामुळेच...
पावसाळ्याच्या ऋतूमधला अनेकदा पुरांतून वाहणारा चहासारखा रंग पाहताना घरोघरी माणसं पावसाळ्यात एकदा सोडून चारदा चहा पितात. भजी खाण्याचा शोधही बहुतेक पावसामुळंच लागला असावा. कश्शाकश्शात पाणी टाकून क्कायक्काय प्यावं लागतं - ही सगळी सगळी प्राशनपरंपरा पावसाला विसरून सुरू ठेवताच येत नाही. आमचे छंद आणि चोचले पावसाला कळतातच!
७.
पावसाळा आला म्हणजे छत्री हवीच, ही एक प्रौढ सवय. पण, छत्रीशिवाय भिजण्याचंही एक वय, किंबहुना अशी अनेक वयं पाहताना ‘वय’ झालेली माणसंही वयानं वजाबाकीत येतात... कितीक सिनेमांतून भीजगाणी ओली करून दाखवतात. कादंबऱ्यांचीपण काही पानं लेखक पावसांतून भिजूनच लिहितो. किंवा ‘न’ अनुभवलेल्या पावसाच्या कविता कधी कधी, मग ऐन पावसाळ्यात वाचायला मिळतात. मात्र, अस्सल पावसाचं नाटक करता येत नाही. पावसात झोडपून म्हैस-गाय दगावल्याची बातमी वाचण्यात येते; तेव्हा डोळे पावसाळा झालेले असतात. जिवांना उभारी देणारा पाऊस जेव्हा जिवांवर उठतो, अशावेळी ‘थांब रे!’ अशी हाक काळजातून ओठांवर येत आभाळाला भिडू पाहते!
८.
अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी एक याद अशी: नागराज मंजुळेंचा ‘पावसाचा निबंध’ पाहताना उसवलेल्या झोपड्यांचे हुंकार वाढत जातात, आणि शालेय शिक्षणाची जिद्द बाळगणाऱ्या गरिबांच्या लेकरांचं ते वाट्याला आलेलं दारिद्र्य आभाळापेक्षा मोठं होतं. अशावेळी कसा लिहू ‘पावसावरचा निबंध?’ उघडं घर नीट झाकायला हाताशीपण काही नाही. उद्या शाळेमधी जाताना रात्रभर-दिवसभर कोसळणाऱ्या या अघोरी पावसानं घरांत मुठीएवढीपण जागा कोरडी ठेवली नाही. राकस होऊन पाऊस बेभान झालाय... तेव्हा अशा स्थितीत “पावसाचा निबंध कसा लिहू? आणि कुठं लिहू? माझा पाऊस दु:खाचा..!!” हे बोलणारे फाटक्या झोपड्यांमध्ये ज्ञानाचे सूर्य उगवतातच मग सतत... मागे... पुढे... कायम... असे अनेक सूर्य पावसात भिजतात. खोल वेदनांचा पाऊस घेऊन. तेव्हा, “नको नको रे पावसा” असे करुणाच भाकणारे आवाज अवघे आभाळ व्यापून खिन्नभिन्न आभाळभर झालेले असतात...! कधी वाईट एवढंच, की कहर झालेला नि लहर होऊन कोसळणारा पाऊस भाकर देणारी चूल विझवून टाकतो, अशावेळी मग वैऱ्याच्या भूमिका वठवणारा पाऊस “नको-नको” म्हणावा लागतो...
९.
पावसाळा सुरू झाला म्हणजे यंत्रणा सुरक्षा हाका घालतात... दरडींची हाडं सैल करणारा पाऊस वाहनांचे अवयव मोडून काढतो. अघोरी धैर्य करून पुलांवरून गाडी घालणाऱ्या एखाद्या चालकाला पाऊस घनघोर मरणाची बिफोर सूचना देत नाही. दिवसभराचे श्रम वेचून घरांकडे परतणाऱ्या कितीतरी श्रमवंत माणसांच्या अंगावर कोसळते वीज, माणसांचा होतो कोळसा अशावेळी, पावसाच्या रानटीपणाची केवढी म्हणून चीड येत राहाते. उलट पाऊसच येत नाही, तेव्हा मग सगळे डोळे आभाळाकडे लागतात. मानवी तहानभूक अगदी हरपते. उदासी थैमानते. घरीदारी माणसांचा मग जीव रमत नाही. कोणत्याच जिवाला करमतही नाही, जेव्हा पाऊस येत नाही. जगाला हवाच पाऊस. म्हणावा असा बेताचा. जीवसृष्टीच्या हिताचा....
१०.
खरंतर आषाढीची वारी भिजावी असं पंढरीच्या वाटेला वाटत राहतं. चिमणीला दाणापाणी मिळावा असा शब्द मुक्या मनाला फुटतो. कीडा, मुंगी, पाखरू, वासरू, जनावरं, बीज, झाड, पीक, वेल, फूल, फळ, जीव, जंतू, प्राणी... ही सगळी चराचर सृष्टी भिजली - बहरली पाहिजे यासाठी प्रार्थनांचे शब्द पाऊस होऊन निसर्गाशी संवाद साधू पाहतात... देवळांमधून अवघ्या कीर्तनभजनांची गोडी अमृताची होते पावसासाठी... पावसाची तहान आभाळाएवढी महान, धरणीएवढी विस्तारवंतच आहे!
११.
पावसाची तऱ्हा आणि माणसांच्या तऱ्हा भिन्न भिन्न! मोटरसायकलींवरून हिंडताना गॉगलची एवढीशी काच पावसात धुरकट होते, तेव्हा घरापर्यंत तरी जाऊ दे, असं म्हणून पावसावर सौम्य चीड मानवी ओठांतून सांडते... उत्तम वेशभूषा करून एखाद्या समारंभाला निघतो नि निघतो तोच पाऊस दत्त म्हणून उभा राहतो किंवा जणू वाटेत अडवून फजितीच करतो, तेव्हा पाऊस सिनेमातल्या खलनायकासारखा भासतो. रस्ता दिसत नाही, खड्डा कळत नाही; आणि आपण गप्पकन पडून रस्ताभर होऊन जातो. तेव्हा ओठांत शाप फुलून येतात. हे शाप कोणाला असतात, हे मात्र नेमकं कळत नाही... सर्वच माणसांचे मूड सांभाळणारा पाऊस माणसासारखा वागला तर तो पाऊस कसला?
१२.
कमरेपासून अर्धे वाकून शेतांत बीज टोचणी करताना, रानातले माजलेले तण काढताना, कासरा धरून बांधांवर बैलं चारताना, उद्याच्या दुधाच्या धारा काढण्यापूर्वी गायी-म्हैशींसाठी चाऱ्याचा मोठा भारा रानातून घरी नेताना, म्हैशींच्या पाठीवर बसून घराची वाट धरताना खूपदा हाच पाऊस फजिती करतो म्हणजे करतोच! कारण पावसाला माणसांचे चेहरे ओळखीचे नसतात. किंवा कोणतं झाड फळांचं की, कोणतं झाड फुलांचं, असाही पक्षपात पावसाच्या गावी मुळी नसतोच. फक्त ‘कोसळणे’ या क्रियापदाचा पाऊस मालकचालक असतो. ‘रात्र वैऱ्याची आहे’, असं पावसाला अगदी समोर ठेवून म्हटलं तरी पावसावर त्याचा काही म्हणजे काहीही परिणाम होत नाही. रात्रभर तो कोसळतो... ‘रातवा’ अशी एक पदवी पावसाला दिली जाते... घड्याळाचा काटा मनात धरून पाऊस नाहीच कोसळत. माणसांइतका शहाणा नसेल पाऊस कदाचित. पण, माणसांतला शहेनशहा तर त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे? पाठपोट पाहा किंवा मागंपुढं पाहा. शेवटी पाऊस हा पाऊस असतो.
१३.
पावसाचा रूपोत्सव देखणाच असतो! पाऊस आपत्ती. संपत्तीही तोच. भेव पाऊस. देवही तोच. सन्नाटा पाऊस. प्रसन्नही तोच. पूर, ऊर पाऊस. पोटभरही तोच. तहान पाऊस. महानही तोच. फूल-वेल पाऊस. वेलकमही तोच. धुंदफुंद, बेधुंद पाऊस. गंधही तोच. राग पाऊस. अनुरागही तोच. गाणी पाऊस. चारापाणी पाऊस. हंगाम पाऊस. धरण पाऊस. समुद्र पाऊस. बारव पाऊस. आड पाऊस. विहीर पाऊस. नदी पाऊस. ओढा पाऊस. चारा पाऊस. पीक पाऊस. जीव पाऊस. जत्रा पाऊस. देऊळ पाऊस. देव पाऊस. कळस पाऊस... सगळ्या सगळ्या नावानावांत जिवाजिवांत पावसाशिवाय चैतन्यच नाही ! सत्यम् पाऊस. शिवम् पाऊस. सुंदरम्ही पाऊसच...
१४.
ढगांमेघांत, आभाळातच तो आहे असं काही नाही. चित्रांच्या रंगांतही पावसाची ओल, पावसाची चाहूल आहे. गाण्यांच्या प्रतिमा प्रतीकांत पावसाचा ताल भरलेला आहे. नांगरांच्या फाळांखाली मातीच्या स्वप्नांत पाऊस आहे. या फुटपाथवर देह अंथरलेल्या माणसांत कण्हणारा पाऊस आहे. छत्रीखाली चालणाऱ्या पायांत ओला पाऊस आहे.
भर बाजारांतल्या भाजीपाल्यात रस झालेला पाऊस आहे. पालांखाली मांडलेल्या चिवडाभज्यांत पावसाचं तेल आहे. अगदी आनंदून बोलणाऱ्या माणसांच्या डोळ्यांत पाऊस आहे. कधीकधी थांबतच नाही पाऊस म्हणून फाटक्या झोपडीत दुःखाचा पाऊस आहे. ‘पड रे पाण्या’, म्हणताना रानांना पावसाची तहान आहे. सर्वत्र ओरडणाऱ्या बेडक्यांच्या आवाजांत पावसाचे आर्जव आहे. अवघं जंगल पालथं घालूनही तहान भागत नाही तेव्हा एकंदर श्वापदांच्या पोटांना पावसाची प्रकट इच्छा आहे. घागरीत खडा टाकून पाहणारा कावळा पावसाच्याच तहानेच्या स्वगताचा भाग झालेला असतो...
१५.
कसं वागावं, असं पुस्तक पावसाच्या हाती देता येत नाही. तरी विमानांतून अन्नाची पाकिटं हाती देण्याऐवजी ती त्या माणसांवर फेकण्याइतकं पावसानं रौद्रत्व करू नये कधी धारण. रात्रभर झाडांवर बसून ‘काळरात्र’ म्हणून अनुभवण्याची पीडा पावसानं बांधू नये माणसांच्या पदरात. विजा कोसळून कास्तकऱ्याचं सगळंच्या सगळं घर उघडं पाडण्याचं क्रौर्य पावसानं जवळ कधी नको बाळगायला. रोजची चूल पेटवायला लागणारा अन्नसाठा मातीत मिसळून टाकण्याइतका रागही धरू नये पावसानं.
जनावरांना चारापाणी उपलब्ध होईल एवढी मुक्या जिवांची भाषा पावसानं कळूनच घ्यायला हवी. तळ कोरडे करून विहिरींची भयंकर आक्रंदनं ऐकणारा ‘कान’ पावसानं ठेवावा जवळ. शेताशिवारांना भाकरीची शाश्वती सतत देण्याइतपत तर पावसानं कायम जगाच्यासोबत राहावं. उतू नये... मातू नये... पावसानं घेतला वसा टाकू नये... तमाम भुईची तहान होऊन पावसा तू येत राहा. या उडत्या पाखरांच्या गाण्यांना साथ द्यायला तू येत राहा... उपाशी राहू नये कोणी; त्यांची भरलेली ताटवाटी होऊन तू येत राहा. पावसा, तू येत राहा. ढगांच्या चरणांवर ठेवलेली एवढी एक ही भिजलेली प्रार्थना!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.