सुयश टिळक, मुंबई
वाघ नावाचा ‘रॅायल’ प्राणी मी अगदी जवळून पाहिलाय! खरं सांगतो, वाघ किंवा बिबट्या आपल्यापासून काही फुटांच्या अंतरावर असतात आणि ते आपल्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात. त्या क्षणाचं वर्णन करणं निव्वळ अशक्य असतं!
तसं बघायला गेलं तर निसर्ग, शांतता, जंगल, प्राणीपक्षी यांच्या सहवासात रमणारा माणूस आहे. मध्यमवर्गीय मराठी घरात माझं लहानपण गेलं. एका वयात जखमी, आजारी अवस्थेत सापडलेले कितीतरी प्राणी, पक्षी मी उचलून घरी आणलेत... त्यांची सेवाशुश्रूषा केलीय आणि ते बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या अधिवासात परत सोडलंय! नाटक करता यावं म्हणून मी फर्ग्युसन कॉलेजला गेलो. तिथे एन्व्हायर्न्मेंट सायन्स हा माझा अभ्यासाचा विषय होता. फर्ग्युसनमधलं शिक्षण सुरू असतानाच मी फोटोग्राफीही शिकलो.