Marathi Article : ‘आई संपावर गेली तर...?’

मायेचा सागर माझी ही आई, माझ्यासाठी, तीच विठाई!
mothers love
mothers loveesakal
Updated on

संध्याकाळी चार वाजता बाळू, शमी घरी आले. पाहतात तर काय! आई हॉस्पिटलमधून घरी आली होती. डॉक्टरांनी घरीच विश्रांती घ्या, असं सांगून आईला डिस्चार्ज दिला होता. घरात आईला पाहून बाळू, शमी पुन्हा रडवेले झाले. आईला बिलगले. बाबा म्हणाले, “अरे आता ती बरी आहे. रडू नका बरं. बाळू, कशी झाली तुझी परीक्षा?”

एकनाथ आव्हाड

“हो ना आपल्या दिवसाची सुरुवातच मुळी आईच्या हाकेने होते. सारखं आपलं काही ना काही काम आईकडे असतंच. पण आई न कंटाळता, न थकता आपलं सारं काही आनंदाने करत असते,” शमी म्हणाली.

“बाबा, आई कुठंय हो? आणि तुम्ही काय करताय सकाळी सकळीच किचनमध्ये?” बाळू सकाळी उठल्याबरोबर आईला शोधत किचनमध्ये आला आणि बाबांना तिथे पाहताच तो लगेच विचारता झाला. बाबा गडबडीतच होते. ते त्याला म्हणाले, “सांगतो, सांगतो. सारं सांगतो. पण आज तुझी चित्रकलेची एलिमेंटरीची परीक्षा आहे ना? चल बरं, आधी पटपट आवरून घे.”

आज बाळूची एलिमेंटरी परीक्षा असल्यामुळे आईने काल झोपण्यापूर्वीच सकाळी लवकर उठण्यासाठी मोबाईलवर अलार्म लावला होता. त्याला डोसे आवडतात म्हणून रात्रीच तिने उडदाची डाळ, तांदूळ भिजत घातले होते. सकाळीच लवकर उठून त्याला खायला आणि सोबत न्यायला गरमागरम डोसे, सोबत खोबऱ्याची चटणी करून देणार होती. बाळूने डोळे चोळतच आख्खं घर पालथं घातलं, पण आईचा कुठे पत्ताच नव्हता. शमीचीही नेमकी आजच उत्कर्ष मंडळाच्यावतीने उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा होती. शाळेने केव्हाच तिचं नाव स्पर्धेसाठी दिलं होतं. स्पर्धेचा विषय ऐनवेळी देण्यात येणार होता. त्यामुळे तयारी काय करायची, असं तिने आईला विचारल्यावर आईने तिला निबंधाची काही पुस्तकं वाचायला आणून दिली होती.

mothers love
Mother Teresa Facts : मदर तेरेसा त्यांच्या विषयीचे Facts माहित आहेत का ?

बाळूला वाटलं, बाबांना आज तर ऑफिसला सुट्टी. रविवार नाही का आज! रविवारी ते उशिराच उठतात. पण आज ते नेहमीपेक्षा लवकर कसे उठले? त्यांची अंघोळ झालीय. त्यांनीच चहा केलाय. दूध तापवलंय. चहात बुडवून खायला ब्रेडचा पुडाही खाली जाऊन दुकानातून घेऊन आलेयत. नाहीतर प्रत्येक रविवारी, सकाळची उन्हं खिडकीतून घरात शिरून सारं घर जागं करतात तरी बाबा मात्र झोपलेलेच असतात. पांघरुणातून बाहेर यायला ते तयारच नसतात. तेव्हा आईचा पारा चढतो. ती बाबांना उठण्याचा तगादाच लावते. तरी ते आईला सारखं म्हणत असतात, “झोपू दे गं अजून थोडा वेळ, आज ऑफिसला सुट्टीच आहे. अजून फक्त पाचच मिनिटं.” पाच पाच मिनिटं म्हणता म्हणता चांगला अर्धा तास होऊन जातो, तेव्हा कुठे ते उठतात आणि मग त्यांच्या कामाला खरी सुरुवात होते.

पण आज बाबा लवकर उठले. सगळं आवरून त्यांनी शमीला उठवलं. एरवी आईच गोड हाक मारून शमीला उठवायची. पण आज बाबांनी उठवलं. आधी तिला काही कळेचना. तिला वाटलं, आई काही वाणसामान आणण्यासाठी खाली गेली असेल. अंघोळीसाठी ती बाथरूममध्ये गेली. लगेच तिची बडबड सुरू झाली. “बाबा, माझा ब्रश कुठाय? आणि पेस्टही इथं दिसत नाही. आणि अंघोळीचं पाणी किती कोमट झालंय. गारच आहे अगदी. हवं तर तुम्ही बघा पाण्यात हात घालून. अशानं मला सर्दी होईल ना. आजारी पडून शाळेला सुट्टी घ्यावी लागली तर.... मला नाही आवडत बुवा शाळा बुडवलेली. मला गरम पाणी द्या ना.” बाबा धावत शमीकडे आले. “शमू बाळा, आज असू दे ना कोमट पाणी. ही घे पेस्ट. ब्रश बघ तिथं कोपऱ्यात अडकवलेला असेल.”

mothers love
India Pakistan Love Story : अंजूच्या एका कृतीची मला भीती वाटली, मी माझा चेहरा लपवला' : नसरुल्लाहने सांगितला भन्नाट किस्सा !

शमी म्हणाली, “बाबा, आई कुठाय?” बाबा सावरासावर करत म्हणाले, “तू ब्रश, अंघोळ करून बाहेर ये बरं आधी. मग सांगतो तुला.” शमी हिरमुसून म्हणाली, “नंतर नाही. आत्ताच. कुठे गेलीय आई? सांगा ना पटकन.” बाळूसुद्धा लगेच तिथे आला आणि तोही म्हणाला, “हो बाबा, सांगा ना, आई कुठंय?” बाबा समजावण्याच्या सुरातच म्हणाले, “ अरे, रात्री तुम्ही झोपेत होता ना. तेव्हा आईला अचानक ताप आला. तो वाढत वाढत एकशे दोनवर गेला. मग तिला अचानक थंडी वाजायला लागली. तिचं सारं अंग दुखायला लागलं. तिला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. म्हणून तिला रात्रीच मी दवाखान्यात नेलं. शेजारच्या राधाआज्जींना तुमच्या सोबतीला बोलावलं होतं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्या त्यांच्या घरी गेल्या. डॉक्टरांनी अॅडमीट करून घेतलंय आईला. आता बरी आहे तिची तब्येत. ताप उतरलाय तिचा. तुमचा रघूमामा आहेच आता तिच्याजवळ. त्यानंच मला घरी पाठवलंय. बरं चला पटापट आटपा आता. मला दवाखान्यात जायचंय सारं आवरून.”

बाबांचं बोलणं ऐकून तर शमीच्या, बाळूच्या डोळ्यांत पाणीच उभं राहिलं आई हॉस्पिटलमध्ये आणि आपल्याला हे माहीतच नाही या गोष्टीचं बाळूला आणि शमीला खूप वाईट वाटलं. त्यांनी मग कसलीही कुरकूर न करता निमूटपणे आपापली कामं पटपट आटपली. दोघांनाही बाबांनी चहा, ब्रेड दिला. पण बाळू, शमीला आज चहा गोड लागेना. ब्रेड हा प्रकार तर दोघांनाही आवडत नव्हता. पण त्यांनी ब्रेड चहात बुडवून कसाबसा गिळला. आईला आपल्या मुलांना काय आवडतं, काय नाही हे पक्क ठाऊक होतं. म्हणूनच नाश्‍त्याला ती नेहमीच वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवायची. आज तर ती डोसे करणार होती. कधीकधी ती मेदूवडे, घावने वेगवेगळ्या डाळींच्या पिठाची धिरडी, ढोकळे तर कधी उपमा, शिरा, पोहे करत असे. आईच्या हातची चवच खूपच न्यारी. जिभेवर रेंगाळणारी. शमीला चहात ब्रेड बुडवून खाताना हे आठवलं.

mothers love
Mothers Day Bollywood Moms : 'बॉलीवूड मदर्स' ची गोष्टच वेगळी! आलिया ते बिपाशा पहिल्यांदाच...

आज बाळूला एलिमेंटरी परीक्षेला आणि शमीला वक्तृत्व स्पर्धेला जायची मुळीच इच्छा होईना. बाळू तसं बाबांना बोललाही. बाबा म्हणाले, “अरे, तू तर आमचा चित्रकार! तूच परीक्षेला गेला नाहीस तर तुझ्या आईचा हिरमोड होईल आणि आता तिची तब्येत सुधारतेय. तिनेच मला सकाळी घराकडे येताना सांगितलं, की बाळूला चित्रकलेच्या परीक्षेला आणि शमीला वक्तृत्व स्पर्धेला आठवणीने पाठवा. त्या दोघांची सर्व तयारी करून द्या. मी तिला कबूल केलंय आणि बाळू, दवाखान्यात भेटायची वेळ संध्याकाळी चार ते सहा आहे. तोपर्यंत तुझी परीक्षा आणि शमीची स्पर्धा संपतेय. आज तुमची खरी कसोटी आहे, बाळांनो. बाळू, संध्याकाळी मी तुला आणि शमीला तुमच्या आईकडे भेटायला नक्की घेऊन जाईन. शमू, काळजी करू नकोस. शेजारच्या राधाआज्जीला पाठवतो मी तुझ्या सोबतीला. बरं चला, मला निघायला हवं. बाळू, चल मी तुला सोडतो परीक्षा केंद्रावर. रंगीत खडू, रंगांचा बॉक्स, ब्रश, पट्टी, पेन्सिल सगळं साहित्य आईने आधीच भरून ठेवलंय बॅगेत. सगळं परत एकदा पाहून घे. आपल्याला निघायला हवं लवकर.”

बाळू म्हणाला, “बाबा, तुम्ही जा आईकडे दवाखान्यात. मी जाईन शेजारच्या गौतमबरोबर. आम्हा दोघांना एकच परीक्षा केंद्र आहे. आमची काळजी करू नका.”

“ठीक आहे,” असं म्हणून बाबा घराबाहेर पडले. बाळू शमीला म्हणाला, “शमू, आज आई घरात नाही तर आईची खूप आठवण येतेय ना? आईशिवाय आपल्या घराचं आणि आपलं पान हलत नाही. आपल्याला प्रत्येक कामासाठी आई हवीच.”

शमी म्हणाली, “हो ना दादा, आपल्या दिवसाची सुरुवातच मुळी आईच्या हाकेने होते. आई हे हवंय, ते कुठंय? असं सारखं आपलं काही ना काही काम आईकडे असतंच. पण आई न कंटाळता, न थकता आपलं सारं काही आनंदाने करत असते.” बोलता बोलता शमी, बाळूचे डोळे पुन्हा पाणावले. डोळ्यांतलं पाणी लपविण्यासाठी बाळू, ‘आईने माझी बॅग कुठे ठेवलीय ती बघतो,’ असं म्हणून उठला.

mothers love
Super Mom - कहाणी एका 'डायपर' निर्मिती उद्योगाची...

ठरल्याप्रमाणे बाळू गौतमबरोबर परीक्षा केंद्रावर गेला आणि शमीसुद्धा राधाआज्जीसोबत वक्तृत्व स्पर्धेच्या ठिकाणी गेली. घरीच बसून राहिलो तर आईला ते आवडणार नाही याच एका विचाराने ते दोघंही वागले.

संध्याकाळी चार वाजता बाळू, शमी घरी आले. पाहतात तर काय! आई हॉस्पिटलमधून घरी आली होती. डॉक्टरांनी घरीच विश्रांती घ्या, असं सांगून आईला डिस्चार्ज दिला होता. घरात आईला पाहून बाळू, शमी पुन्हा रडवेले झाले. आईला बिलगले. बाबा म्हणाले, “अरे आता ती बरी आहे. रडू नका बरं. बाळू, कशी झाली तुझी परीक्षा?”

“छान झाली. बाबा, व्यक्तिचित्र काढण्यासाठी एक प्रश्न आला होता. मी सांगू कुणाचं चित्र काढलं? आईचं,” बाळू डोळे पुसतच म्हणाला. बाळूचे बोल ऐकून आईचं काळीज सुपाएवढं झालं. शमीने तर लगबगीने राधाआज्जीच्या हातातली बॅग घेतली आणि त्यातील ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आईच्या हाती देत म्हणाली, “आई, माझा वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक आला. पण तो तुझ्यामुळेच बरं का.” आईला, बाबांना आश्चर्य वाटलं. बाबा म्हणालेच, “म्हणजे कसा काय?”

शमी म्हणाली, “अहो बाबा, आई आज सकाळी घरात नव्हती ना, तेव्हा मला आणि बाळूला आईची खूप आठवण आली. आई आमच्यासाठी किती कष्ट घेते ते पुन्हा एकदा डोळ्यासमोर आलं. आम्ही खूपवेळ आईबद्दलच बोलत होतो. मी स्पर्धेच्या ठिकाणी आल्यावर उत्स्फूर्त भाषणासाठी मला विषय नेमका काय मिळाला माहीत आहे? ‘आई संपावर गेली तर...’ मग काय! आई, मी तुझ्याबद्दल खूप बोलले आणि भाषणाचा शेवट मी तुझ्यावर केलेल्या कवितेने केला. खूप टाळ्या मिळाल्या.” आई-बाबांना शमूचं खूप कौतुक वाटलं. बाळू म्हणाला, “शमू, आईवरची कोणती कविता गं?”

mothers love
Mohammed Shami Mother : तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस... मोहम्मद शमीने आईसाठी केली भावनिक पोस्ट

शमूने लगेच कवितेला सुरुवात केली....

“माझी आई, उन्हात सावली

हसतमुख सदा,असे माऊली

तोडून कधी, नाही ती बोलत

मनाला जोडून, राहते पुढे चालत

दुखले, खुपले, साऱ्यांचे पाही

आल्या-गेल्यांचे, करीत राही

साऱ्यांचं करी, ती शुभचिंतन

सद््गुणांची करी, ती पाठराखण

संकटात खंबीर, राही ती उभी

अढळ तारा, जशी ही नभी

मायेचा सागर, माझी ही आई

माझ्यासाठी, तीच विठाई

कविता ऐकून आता आईबाबांचे डोळे पाणावले. शमू-बाळू आईबाबांकडे धावले, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी.

आईने त्यांना मायेने जवळ घेतलं. एखाद्या पक्षिणीने आपल्या पिलांना पंखाखाली घ्यावं ना, अगदी तसं. बाबा आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून हे हृदयस्पर्शी दृश्य टिपत होते.

-----------------

mothers love
Mother Cooking :आहाहा! पृथ्वीतलावरची सगळी खमंगाई त्यात उतरलेली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.