Marathi article about Ranbhajya (Wild FOod) festival In Maharashtra
मंजूषा कुलकर्णी
चिचार्डी, भोकर, चाईचा बार, कवदर, कुरडू, लोती, रूखाळू, तेरा, गाजरी, कांडे चित्रक, मासुर्डी, तोंड्या, करटुले, रान तेरडा, गोजीभ. यातले किती शब्द ओळखीचे वाटतात? कोडी न घालता सांगायचं, तर या सगळ्या आहेत रानभाज्या.
आपल्या आहारात नेहमी असणाऱ्या भेंडी, तोंडली, गवार, कोबी, फ्लॉवर, बटाटा अशा फळभाज्या किंवा मेथी, पालक, शेपू, कांद्याची पात अशा पालेभाज्यांसारख्याच भाज्या; पण आपल्या नेहमीच्या मंडईत किंवा भाजीवाल्यांकडे सहसा न मिळणाऱ्या.
माहितीच घ्यायची म्हटलं, तर या रानभाज्याही इतर भाज्यांसारख्याच पौष्टिक असतात. या रानभाज्यांच्याही भाज्या, कोशिंबिरी, आमट्या आणि भजीही तितकीच चविष्ट होतात आणि आपल्या जेवणाची रुचीही वाढवतात.
आपण बाराही महिने खात असलेल्या ठरावीक भाज्यांव्यतिरिक्त अन्य भाज्यांबद्दलही माहिती मिळावी, अशा रानभाज्यांबद्दल कुतूहल जागं करावं आणि मुख्य म्हणजे परिसरातच उगवणाऱ्या भाज्यांचा आहारात अधिकाधिक समावेश असण्याबाबत लोकजागृती व्हावी या हेतूने पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये गेल्या सतरा वर्षांपासून ‘रानभाज्या महोत्सव’ होतो आहे.