गणेशोत्सव हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! प्रत्येकाच्या मनात गणरायाशी जुळलेलं नातं, गणेशमय आठवणींचं एक कोलाज तयार झालेलं असतं. आघाडीच्या काही कलाकारांशी त्यांच्या आठवणींमधल्या गणेशोत्सवाविषयी बोलताना या आठवणी उलगडत गेल्या. केवळ लाडक्या बाप्पाशीच नाही, तर गणेशोत्सवाच्या प्रत्येक पैलूशी या कलाकारांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. गणपतीबद्दल असणारी भावना, बालपणी साजरा केलेला उत्सव, गणेशोत्सवातील विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये कला सादरीकरणासाठी मिळालेली संधी अशा अनेक...
गणेशोत्सव हा माझा सर्वात आवडता सण आहे. त्याचं एक विशेष कारण असं, की माझा वाढदिवस नेहमी गणेशोत्सवाच्या काळातच येतो. त्यामुळे त्या दहा दिवसांमध्ये आमच्या घरात एक अनोखं उत्साही वातावरण असतं. लहानपणापासूनच गणपती बसवण्याची जबाबदारी जरी माझ्या भावावर असली, तरी नेहमी मीच ती मूर्ती बसवते, सजावट करते आणि नैवेद्य दाखवते. हे सगळं करणं मला मनापासून आवडतं. लग्नानंतरही ही परंपरा कायम आहे. आमच्याकडे दीड दिवसांचा गणपती बसवण्याची प्रथा आहे. मोदक हा माझा आवडता गोड पदार्थ आहे, त्यामुळे बाप्पाचा नैवेद्य आणि माझा वाढदिवस अशा निमित्तानं गोड म्हणून भरपूर मोदक केले जातात.
मी भरतनाट्यम् नृत्यांगना असल्यामुळे गणेशोत्सवात माझ्या नृत्याची एक खास भूमिका असते. माझ्या आठवणीतल्या सर्व गणेशोत्सवांमध्ये, गौरी पूजन असो किंवा गणेशोत्सवातील कोणताही दिवस, मी नेहमी नृत्य सादर करत आले आहे. नृत्य कलाकार म्हणून गणपतीची मूर्ती तयार करून पूजा करण्याचा योग जुळून येणं, ही माझ्यासाठी एक अनोखी अनुभूती आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांपासून मी कलावंत पथकात ढोल वाजवत आहे. ढोल वाजवताना मिळणारा अनुभव, ऊर्जा, स्फूर्ती अवर्णनीय असते. एकदा माझा वाढदिवस सिद्धिविनायकाच्या मिरवणुकीच्या दिवशीच होता. मिरवणुकीसाठी मुंबईला गेलो होतो. तिथे माझ्या हस्ते पूजा होण्याचा योग आला आणि बाप्पाचं अतिशय सुंदर दर्शनही झालं. ती प्रसन्नता आणि आनंद माझ्या आयुष्यातील एक अमूल्य आठवण झाली आहे.
लहानपणीचा एक खास प्रसंग म्हणजे, लता मंगेशकर यांच्या ‘अष्टविनायक गीते’ कार्यक्रमात ‘गणराज रंगी नाचतो’ हे गाणं माझ्यावर शूट झालं होतं. लतादीदींनी माझ्या नृत्याचं कौतुक केल्याचं मला आजही स्पष्ट आठवतंय. त्यांचं ते कौतुक माझ्यासाठी अतिशय मोठी गोष्ट होती. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या जीवनात एक अमिट छाप सोडली आहे. गणेशोत्सव आणि माझ्या वाढदिवसाच्या या आठवणींमुळे हा सण माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे, त्यामुळे मी त्या आठवणींमध्ये रमते.