मयूर भावे
कवी अनिल यांच्या निर्वासित चिनी मुलास, पेरते व्हा, फुलवात अशा संग्रहांतून मुक्तछंद प्रकारातील कवितेला एक प्रतिष्ठा लाभली. डॉ. वि. म. दांडेकर, कृ. ब. निकुम्ब, वसंत बापट अशा अनेक प्रतिभावंत ज्येष्ठ कवींनी मुक्तछंद प्रकारातली कविता अधिक व्यापक केली.
मुक्तछंद कविता दुधारी तलवारीसारखी असते. जमली तर इतकी छान जमते, की एखाद्या वृत्तबद्ध कवितेला मागे टाकून ती वाचकांच्या स्मरणात राहते, छंदातल्या कवितेप्रमाणे पाठ होते, सादरीकरणात वाहवा मिळवते, रसिकांच्या पसंतीस उतरते. मात्र नाही जमली, तर तो शब्दांचा फक्त एक सांगाडा होतो.
एखादा गद्य उतारा शब्द आणि वाक्य तोडून लिहिला आहे की काय, असं वाटतं. त्यामुळेच अनेक मुक्तछंद वाचताना ललितगद्य, वर्णनपर लेखन, संवाद किंवा स्वगतं वाचल्याचा भास होतो. यापलीकडे जाऊन फारच मोजक्या कविता मुक्तछंद म्हणून स्वतःचा डौल सांभाळू शकतात. बाकी अनेक मुक्तछंदांना आजही ‘काव्या’ची प्रतीक्षा आहेच.