मंजिरी पाटील, पुणे
उत्तर दे माझ्या प्रश्नाचे.. जुई म्हणाली जाईला
साजण नाही कसा जीवनी सुंदर या निशिगंधेला..
जाई म्हणाली.. सहमत मी पण तुझ्या आताच्या प्रश्नाला
सखा नसे जर कुणी जीवनी अर्थ न उरतो जगण्याला..
उंचनिंच शेलाटी बांधा रंग शुभ्रसा दूध जसे
हावभाव लाघवी देखणे बघत रहावे रूप असे..
जास्त दरवळे माझ्यापेक्षा चाफा सांगे दोघींना
भूल पाडते गंधाची संसारी करते जोगिंना..
शुभ्र पांढऱ्या वस्त्राभवती लखलख पाचुचा मिना..
त्याहीपेक्षा गंध तिचा तो मौल्यवानसा दागिना..
ऊन सोसते हसतमुखाने अन् दरवळते रात्रीला
खाण गुणांची असून का मग कसा मिळेना सखा हिला?
भाग घेउनी चर्चेमध्ये आली अबोली बोलाया
एक गोष्ट जी केव्हापासुन मनात लागे घोळाया..
सगळ्या गोष्टी सुरेख सुंदर आणिक पूरक आहे कबुल
एक गोष्ट जी मला जाणवे.. तीच असावी मोठ्ठी भूल..
कणा पाठीचा ताठ तिचा बघ मान न झुकते कुणापुढे
ताठ प्रेयसी अथवा पत्नी मुळीच ना पुरुषा आवडे..
देठ तिचा तोडावा तेव्हा वेणीमध्ये नीट बसे
पण मग वेणीमध्ये गुंफता हिरमुसलेली स्पष्ट दिसे..
असो एवढा एकच अवगुण निशिगंधेचा दोष असे
म्हणून संन्यासी होउन ती गंध जगाला देत असे..