सुशील धसकटेमराठी भाषेचं सौंदर्य जपण्यासाठी आग्रही असणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने ‘शेखबाईं’विषयी त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केलेली मनोगते....व्याकरणाच्या इतिहासातील चढउतार लक्षात घेता आणि अभ्यासकांतील मत-मतांतरे पाहता प्रा. यास्मिन शेख यांची भूमिका अधिक करून प्रचलित व्याकरणाला अनुसरून निर्माण केलेल्या लेखनविषयक नियमांचे यथोचित पालन करण्याची राहिलेली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात एम.ए. करत असताना भानू काळे यांच्या अंतर्नाद मासिकात काम करत होतो. एम.ए.चे तास झाल्यावर दुपारनंतर अंतर्नादचे काम करत असे. मासिकाच्या कामानिमित्त प्रा. यास्मिन शेखबाईंकडे नियमित जाणे होत असे. बाई तेव्हा मराठी शब्दलेखनकोशाचे काम करत होत्या. एके दिवशी त्यांनी ‘कोशाच्या मुद्रणप्रतीचं काम करशील का?’ म्हणून विचारलं. मी त्वरित होकार दिला. रोज दोन तास कोशाचं काम चालत असे. ‘हस्ताक्षर सुंदर असल्याने आणि लेखनात कमीत कमी चुका असल्याने तुझी निवड केली,’ असं नंतर त्यांनी सांगितलं. मुद्रणप्रतीचं काम करत असताना मनात व्याकरणविषयक ‘बाई, हा शब्द असाच का लिहायचा?’, ‘ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय?’, ‘प्रत्यय लागतो म्हणजे नेमकं काय होतं?’, ‘या शब्दाच्या रूपात बदल कसा झाला?’ वगैरे वगैरे अनेक प्रश्नांची वलये उमटत. दोनेक दिवसांनी बाईंना म्हटलं, ‘बाई, मुद्रणप्रतीचं काम करताना काही प्रश्न-शंका उपस्थित होतायत, मला समजावून सांगा.’ कोशाचं काम झालं, की मग त्या माझ्या प्रश्नांचं-शंकांचं निरसन करत. एका स्वतंत्र वहीमध्ये मी त्या नोंदी करत असे. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे बाई सहजसोप्या भाषेत समजावून सांगत.बाई हाडाच्या शिक्षिका . भाषा-व्याकरणासारखा विषय रंजक पद्धतीनं समजावून सांगत. त्यातून बाईंची भाषेबद्दलची एक प्रचंड तळमळ दिसत असे. त्यामुळे व्याकरणाची मनात असलेली एक अनामिक भीती कधीच निघून गेली आणि या विषयात रुची निर्माण व्हायला लागली. एक दिवस त्या म्हणाल्या, ‘आता मी तुझ्या शंकांचं निरसन करतेय, हे ठीक. पण बाहेर कुठे गेल्यावर तुला जर प्रश्न पडला, तर मग काय करशील? मी तुझ्याबरोबर असेनच असे नाही.’ मी म्हटलं, ‘बाई, खरंय तुमचं, यासाठी मी काय करायला हवे?’ त्या म्हणाल्या, ‘आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधता आली पाहिजेत. त्यासाठी भाषा आणि व्याकरण यांचा नीट अभ्यास कर. भाषाविज्ञानाचा शास्त्रीय पाया असल्याशिवाय हे शक्य नाही, म्हणून भाषाविज्ञानाच्या अभ्यासावर भर दे.’ बाईंचे हे सांगणे दृष्टी देणारे आणि प्रेरणा देणारे होते. या सांगण्याचा योग्य तो परिणाम झाला. मग व्याकरण, भाषा, भाषाशास्त्र यांवरील शक्य तितकी पुस्तके मिळवली. या विषयावर नवीन काही आलं (मराठी-हिंदी-इंग्रजी) की घेतलंच विकत, हा नाद लागला. अभ्यासात कुठं काही अडलं, की बाईंना विचारत असे. भाषा-व्याकरणाच्या अभ्यासाची सुरुवात ही अशी झाली. मग डेक्कन कॉलेजात भाषाशास्त्राचे वर्षभर शिक्षण, आणि आता बोलीभाषा या विषयात पीएच.डी.करिता संशोधन, असा हा प्रवास - शेखबाईंमुळे. २००३ ते २०१५ हा माझ्यासाठी ‘शेखबाईमय’ काळ होता. खरंतर तत्पूर्वी डॉ. मृणालिनी शहा, वैयाकरण श्रीकृष्ण वैद्य यांनी या विषयाचे दरवाजे उघडे करून दिले होते. मात्र गोडी लावून शास्त्रीय/वैज्ञानिक अभ्यासाकडे मला वळवले, ते शेखबाईंनी. त्याच गुरू. त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल लिहावे-सांगावे असे पुष्कळ आहे, त्याबद्दल पुढे कधीतरी लिहीन. आत्ता शेखबाईंच्या भाषा व व्याकरण याविषयीच्या योगदानाबद्दल माझे विचार मांडण्याचा प्रयत्न आहे..मराठी व्याकरणाच्या पूर्वपरंपरेवर एक दृष्टिक्षेप टाकल्यास लक्षात येते, की मराठीच्या व्याकरणावर इंग्रजी आणि संस्कृत या दोन्हींचे सतत ओझे राहिलेले आहे. या ओझ्यामुळे मराठी वैयाकरणांमध्ये, अभ्यासकांमध्ये सतत वाद-प्रतिवाद झडत आलेले आहेत. मराठी व्याकरणाची बीजे महानुभाव पंथपरंपरेतील लेखक भीष्माचार्य यांच्या पंचवार्त्तिक या ग्रंथात सापडतात. सतराव्या शतकात पोर्तुगीज मिशनरी फादर स्टीफन्स यांनी गोमंतकातील मराठी भाषा व बोलींचा अभ्यास करून लिहिलेले आर्ति द लिंग्व कानारी (१६४०) हे व्याकरण; ब्रिटिश मिशनरी विल्यम केरी यांचं ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज (१८०५) हे आधुनिक काळातील मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक; जगन्नाथशास्त्री क्रमवंत-गंगाधरशास्त्री फडके-बाळशास्त्री घगवे यांनी मिळून लिहिलेले पंडिती वळणाचे- संस्कृतचा दाट प्रभाव असलेले व्याकरण; दादोबा पांडुरंग तर्खडकर लिखित महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (१८३६) हा स्वदेशी परंपरेतील व्याकरणग्रंथ; कृष्णशास्त्री गोडबोले यांचे मराठी भाषेचे नवीन व्याकरण (१८६७); गो. ग. आगरकरांचे वाङ्मयमीमांसा आणिवाङ्मयाचे पृथक्करण (१८८८); मोरो केशव दामले यांचे शास्त्रीय मराठी व्याकरण (१९११); कृ. पां. कुलकर्णी यांचे मराठी व्याकरणाचे व्याकरण आदी. विल्यम केरी-कुलकर्णींपासून ते अलीकडच्या वैयाकरणांपर्यंत इंग्रजी आणि महाराष्ट्रीय लेखकांकडून व्याकरणाच्या लेखनाचे अनेक प्रयत्न झाले. एकंदरीत हा प्रवास पाहता मराठी भाषा आणि व्याकरणावर येनकेन प्रकारे इंग्रजी व संस्कृतचा प्रभाव राहिलेला आहे, हे नाकारता येत नाही.वैयाकरण कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी दोन परंपरा मानलेल्या आहेत. एक अमराठी अर्थातच इंग्रजांनी लिहिलेली व्याकरणांची परंपरा, आणि दुसरी पंडिती व्याकरण परंपरा अर्थातच संस्कृतप्रभावाखालील परंपरा. या दोन्ही परंपरा मानणाऱ्या मराठी व्याकरणाच्या अभ्यासकांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे अर्जुनवाडकर साधार नोंदवतात. या परिस्थितीवर अर्जुनवाडकर यांनी हातचे न राखता परखड भूमिका घेत शास्त्रीय विश्लेषण केलेले दिसते. तर ‘व्याकरण म्हणजे एका विशिष्ट भाषेची व्यवस्था आणि व्याकरण म्हणजे त्या व्यवस्थेच्या पद्धतशीर अभ्यासाचे फलित, व्यवस्थेचे वर्णन.’ तसेच ‘कोणत्याही भाषेचे व्याकरण ती भाषा बोलणारे घडवतात. व्याकरण भाषेचे अभ्यासक लिहितात.’ अशी भूमिका भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर घेतात.व्याकरणाच्या इतिहासातील हे चढउतार लक्षात घेता आणि अभ्यासकांतील मत-मतांतरे पाहता प्रा. यास्मिन शेख यांची भूमिका अधिक करून प्रचलित व्याकरणाला अनुसरून निर्माण केलेल्या लेखनविषयक नियमांचे यथोचित पालन करण्याची राहिलेली आहे. असे असले, तरी प्रचलित व्याकरणात काळानुसार घडणारे बदलही आपण स्वीकारले पाहिजेत, अशी स्पष्ट व विनयशील भूमिकाही प्रसंगी त्यांनी घेतलेली दिसून येते. ‘बदलत्या मराठीचे लेखन’, ‘भाषासूत्र’, ‘भाषेला धर्म नसतो, जात नसते’ अशा काही लेखनातून, व्याख्यानांमधून त्यांनी वेळप्रसंगी आपली भूमिका मांडलेली आहे. प्रवाहीपण हा भाषेचा एक महत्त्वाचा गुण आहे. प्रवाहित असणं हे भाषेच्या वाढीसाठी, प्रसारासाठी, समृद्धीसाठी महत्त्वाचे असते, हा शास्त्रीय दृष्टिकोन त्यामागे आहे. त्यांची ही सुधारणावादी शास्त्रीय दृष्टी प्रसंगानुरूप दिसून येते. उदाहरणार्थ, ज्या इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये पर्याय नाही आणि जे रुळलेले आहेत, किंबहुना मराठीच झालेल्या इंग्रजी शब्दांचा त्यांनी लेखनकोशात अंतर्भाव केलेला दिसून येतो..मराठीचे बदललेले स्वरूप किंवा बोलीभाषेतील कळीचे बदल लक्षात घेता लेखनात त्यानुषंगाने बदल व्हायला हवेत, याकडे त्यांनी तज्ज्ञ व जाणकारांचे लक्ष वेधले होते. इंग्रजीच्या ‘स्पेलिंग’बाबत दक्ष असणारे लोक मराठीच्या लेखनाबाबत अनास्था दाखवतात. बहुतांश सुशिक्षित लोकांच्या लेखनात सर्रास चुकीचे लेखन दिसून येते. कारण शालेय स्तरावरून संस्कृतची पीछेहाट झाल्याने अमुक एखादा शब्द संस्कृत आहे की नाही यासंबंधीचे ज्ञान त्याला नसते. तत्सम ऱ्हस्व इ-कारान्त व ऱ्हस्व उ-कारान्त शब्द सामासिक शब्दात पूर्वपदी असल्यासही दीर्घ लिहावेत, प्रत्ययान्त व साधित शब्दांच्या लेखनातही हा बदल व्हायला हवा, अपप्रयोग कटाक्षाने टाळायला हवेत, मराठी बोलताना-लिहिताना हिंदी-इंग्रजीची सरमिसळ करायला नको, इत्यादी महत्त्वाचे बदल यास्मिन शेख यांनी सुचवलेले आहेत. एक अभ्यासक म्हणून ‘भाषा-व्याकरण आणि भाषाविज्ञान’ यांच्यातील परस्परसहबंध शेखबाईंच्या आस्थेचा आणि चिंतनाचा कायम विषय राहिलेला आहे. व्याकरणाबद्दलची एक भीती वा नावड समाजात निर्माण केली गेली आहे, ती कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांनी, लोकांनी या विषयाकडे वळावे म्हणून ‘व्याकरण हा क्लीष्ट नव्हे, तर मजेदार विषय आहे,’ असे बाई सांगत असतात. मराठीबद्दलचे निस्सीम प्रेम व तळमळ बाईंच्या ठायी असल्याने त्या भाषा आणि लेखनाबद्दल सातत्याने मार्गदर्शन आणि प्रबोधन करताना दिसतात. भाषेसंबंधी कोणीही शंका, प्रश्न विचारला तर बाई आनंदाने शंकेचे निरसन करतात. याबद्दल त्यांनी कधी असहकार दाखवल्याचे माझ्या पाहण्यात वा ऐकिवात नाही. मराठी भाषा व तिच्या अचूक लेखनाचा प्रसार करणे, भाषेचे संवर्धन करणे हे एक व्रत म्हणून बाई आजवर जगत आलेल्या आहेत.महाराष्ट्रात अनेक बोली बोलल्या जातात. प्रदेशानुसार दैनंदिन जीवनव्यवहारात किंवा अनौपचारिक व्यवहारात बोलीभाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. सांस्कृतिकदृष्ट्या बोलींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे असले तरी आपण बोलतो तसे लिहीत नाही.औपचारिक किंवा कार्यालयीन व्यवहारात बोलीचा वापर केला तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. म्हणजे कोकणातील लोकांना अहिराणी समजणार नाही, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वऱ्हाडी कळणार नाही, मराठवाडी मुंबईच्या लोकांना कळणार नाही. अनागोंदी माजेल. तसे होऊ नये म्हणून सर्वांना समजेल-कळेल अशा प्रमाणभाषेचा वापर करावा. कारण प्रमाणभाषा ही एक संकल्पना आहे आणि तीत एकसूत्रीपणा असायला हवा. ज्याप्रमाणे कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते; तद्वतच भाषेला धर्म व जातही नसते. भाषा सर्व समाजाची असते, असे शेखबाई आस्थेने सांगत असतात. हिंदी-इंग्रजीच्या अवास्तव वापराबद्दल शेखबाई टीकात्मक आहेत. याचा अर्थ हिंदी-इंग्रजीचा वापरच करू नका, असे त्या मुळीच म्हणत नाहीत; तर मराठीमध्ये एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द असतानाही आपण अकारण हिंदी-इंग्रजीतील शब्द वापरत असू तर हे एकप्रकारचे भाषा प्रदूषणच आहे. आवश्यक तिथे हिंदी-इंग्रजीचा उपयोग केलाच पाहिजे, ही त्यांची भाषाविवेकी भूमिका आहे..एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात मराठीमध्ये उत्तमोत्तम कोशवाङ्मयाची निर्मिती झालेली दिसते. कोशवाङ्मय भाषेचे वैभव, समृद्धी होय. ज्या भाषेत निरनिराळ्या प्रकारचे कोश तयार होतात, ती भाषा सक्षमपणे काळाबरोबर चालत राहते. कोश हे एका अर्थाने भाषेचे संदर्भग्रंथच असतात. मेजर कँडी, य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, द. ह. अग्निहोत्री, प्र. न. जोशी, वा. गो. आपटे, कृ. पां. कुलकर्णी, श्री. व्यं. केतकर, देवीदास वाडेकर, ह. श्री. शेणोलीकर, स. मा. गर्गे, वसंत आबाजी डहाके इत्यादी कोशकारांची एक सशक्त परंपरा मराठीत आहे. कोशकारांच्या या प्रभावळीत शेखबाईंचे नाव घेणे उचित ठरावे. मुळात कोशवाङ्मयाचं काम हे अत्यंत क्लिष्ट, सचोटीचे, कष्टप्रद, अनिश्चितपणे दीर्घकाळ चालणारे असते. यासाठी वेळ-पैसा आणि विपुल कष्ट खर्ची पडतात. हे पाहता मराठी शब्दलेखनकोशाची निर्मिती करून शेखबाईंनी मराठी भाषेच्या समृद्धीत आपलं योगदान निश्चितपणे दिले आहे. मनोविकास प्रकाशनच्या अरविंद पाटकर यांच्या विनंतीवरून बाईंनी ही जबाबदारी स्वीकारली आणियशस्वीपणे पार पाडली. कोशनिर्मितीतील बाईंचे कष्ट, मराठीचे लेखन निर्दोष-अचूक व्हावे याविषयीची तळमळ, सत्तरीच्या वयात दिवस दिवस बैठक मारून केलेली मेहनत, कोश पूर्णत्वाला जाईपर्यंत सहा-सात मुद्रितांचे शिस्तबद्धपणे केलेले वाचन, एकाही अक्षराची त्रुटी राहू नये यासाठी घेतलेली अपार काळजी आदी संपूर्ण प्रक्रियेचा मी साक्षीदार आहे. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील, कोणतेही काम करणारी असो, तिला दैनंदिन जीवनात मराठीचे लेखन अचूकपणे करता यावे, हे त्यांचे कोशलेखनाच्या मुळातील उद्दिष्ट होते. महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोशाच्या वापरकर्त्यांकडून आलेले सकारात्मक आणि उत्स्फूर्त अभिप्राय पाहता, हे उद्दिष्ट सफल झाल्याचे दिसते. हजारो लोकांना अचूक मराठी लेखन करायला या कोशाने हातभार लावलेला आहे, ही मराठी भाषेची फार मोठी सेवा आहे. बदलत्या काळानुसार अशा प्रकारच्या लेखनकोशाची आवश्यकता आणि महत्त्व याचे अचूक मर्म शेखबाईंना उमजले, यातून त्यांच्या अनुभव आणि व्यासंगाचे महत्त्व अधोरेखित होते.मराठी लेखन मार्गदर्शिका आणि मराठी शब्दलेखनकोश या दोन्ही पुस्तकांनी महाराष्ट्रीय समाजाला अचूक मराठी लेखनाचे धडे दिलेले आहेत. वाळिंबे यांनी व्याकरण ‘सुगम’ केले, तर शेखबाईंनी ‘सुलभसहज’ केले. सामान्य लोकांची भाषा व व्याकरणाशी नाळ जोडली. ही दोन्ही पुस्तके दीर्घकाळ मार्गदर्शन करत राहतील, हे नि:संदिग्ध. हे शेखबाईंनी मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला दिलेले मोठे योगदान आहे. मराठीतील भाषाविचाराला चालना देणारे लेखन करणाऱ्या मंडळींमध्ये राजारामशास्त्री भागवत, मो. के. दामले, वि. का. राजवाडे, महर्षी वि. रा. शिंदे, ना. गो. कालेलकर, गं. ब. ग्रामोपाध्ये, अरविंदमंगळूरकर, कृ. श्री. अर्जुनवाडकर, अशोक केळकर, सत्त्वशीला सामंत, भालचंद्र नेमाडे, गणेश देवी, प्र. ना. परांजपे, लीला गोविलकर अशा काही मोजक्या मंडळींची नावे पटकन आठवतात. यांनी मांडलेल्या विचारांबद्दल कदाचित आपले मतभेद असू शकतील, मात्र तरीही या संदर्भातील त्यांचे कार्य नाकारता येत नाही. प्रा. यास्मिन शेख हे या भाषाअभ्यास परंपरेतील महत्त्वाचे नाव आहे, नि:संदिग्ध!(सुशील धसकटे कादंबरीकार, भाषा व भाषाशास्त्राचे अभ्यासक आहेत.)---------------------.'Youtube Beginners' साठी Influencers ची शाळा का महत्वाची? सांगतायत भाडीपाच्या पॉला आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.