हेमा देवरे, बंगळूर
कार्यक्रमात दोन देशांतल्या दोन अत्यंत प्रथितयश लेखकांचे सत्कार होणार होते. व्हिएतनाम आणि फ्रान्स! दोन्ही देशाचे लेखक स्टेजवर आले आणि मनोजच्या हृदयाचा ठोकाच चुकला! तशीच दिसते अजून फ्लो! तेच पिंगट सोनेरी केस, तोच गव्हाळ गोरा रंग, तीच नाजूक काया! फक्त आता फ्लो फ्रान्समधल्या तरुणवर्गाची अत्यंत लोकप्रिय लेखिका झालेली होती.
मनोज समुद्रालगतच्या एस्प्लानेड भागात फुलरटन हॉटेलमध्ये शिरला, तेव्हा सर्व आसमंत दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघाला होता. पूर्वीपेक्षाही दिव्यांची संख्या वाढली होती की काय? पूर्वी ते कलात्मक वाटायचं. आता मात्र तोच उजेड जरा जाचक झाल्यासारखा वाटत होता. लोकांची गर्दी मात्र पूर्वीपेक्षा वाढल्यासारखी दिसत होती.
समुद्राला लागून एक नवीन लेझर शो सुरू होता. त्यासाठी काठावरच्या रेलिंगला टेकून बघ्यांची गर्दी उभी होती. हे ठिकाण आता एकदमच कमर्शिअल झालं होतं. असं नव्हतं पूर्वी. लाईट्सही मंद असायचे. निळ्याशार पाण्याची झिलई त्या उजेडातही उठून दिसायची. पण या सगळ्यापेक्षा खास होतं, ते विसाव्या मजल्यावरचं ‘लँटर्न’ रेस्टॉरंट!