Title : चमचमणारे विस्तीर्ण जलाशय
चमचमणारे विस्तीर्ण जलाशय
ग्रह, गोल, तारे, पर्वत निर्मिल्यावर
मग;
पृथ्वी आणि द्युलोकाला
आधार देत्साता
निर्गुण निराकार हिरण्यगर्भ
आकार देता झाला,
आपल्याच मनातल्या
आपल्याच प्रतिमेला
पंचमहाभूतांच्या पसाऱ्यातून!
माणूस...!!
आपल्याच सगुण रूपाकडे
असोशीनं नजर टाकताना
एक पुसटशी स्मितरेषा
उमटून गेली
हिरण्यगर्भाच्या अंतर्मनात
अवघा आसमंत उजळून टाकत...
साकारावर त्या
सत्त्व-तम-रजाचं
सिंचन करताना मात्र
निर्मितीची असोशी
झाकोळत गेली...
माणसाची घडण अपुरीच...
उणी, रिती...
न्यूनाची जाणीव
नेणिवेच्या कृष्णछायेत...
जाणिवेतले अपुरेपण
चिमटीत गवसेना
त्याची काजळी
हिरण्यगर्भाच्या
उत्कटतेवर
उपाय काय...?
पंचमहाभूतांचा पसारा
नव्याने मांडावा,
की उधळूनच द्यावा साराच डाव,
की असू द्यावा उणेपणाच
निराकाराच्या साकारात...
माणसाच्या घडणीत
इथे कविता आली,
हिरण्यगर्भाच्या मनाच्या
खोल तळातून उमटलेली...
सत्त्व-तम-रजाला छंदात बांधत
कवितेने निर्मिले अद्भुताच्या प्रदेशात
शब्दांचे जग,
आणि विणले भावनांचे कोश!
निराकार हिरण्यगर्भाच्या निर्मितीला
कवितेने दिली लय
आणि एक तालही
मग माणसाने रचली सूक्ते
नवनिर्मितीची!