Marathi Poem : कोनाडा

मनातील कोनाड्यात जपलाय.. कोनाड्यांच्या सुरम्य आठवणींचा
marathi poem
marathi poem esakal
Updated on

By : आनंद अरुण लेले

बाल आठवणीत पुसला गेला

मनात घर करून आहे वाडा

तिथे माजघर व सर्व खोल्यांतील

पोकळीत स्थित महिरपी कोनाडा

प्रत्येक कोनाड्याची धाटणी

अन् त्याचे आकार वेगवेगळे

काही कोनाडे वस्तूंनी भरलेले

तर काही कोनाडे असती मोकळे

बाळंतिणीच्या खोलीमध्ये

असे बाळाच्या गुटीचा डबा

माजघरातील कोनाड्यात असे

आजीचा औषधांचा बटवा

एकात कुंकवाचा करंडा,

मेणाची डबी आणि फणी

दुसऱ्यात चहा साखरेचे डबे

व चूल पेटविण्याची चिमणी

एखाद्या कोनाड्यात ठेवती

किल्ल्यांचा जुडगा व टाळे

तर देवघरात पोथ्यांची चळत

अन् हळदी कुंकवाचे पंचपाळे

सरकी काढलेला कापूस

पुडीचा दोरा अन फुलवाती

गरजेनुसार लागणाऱ्या वस्तू

लगेच मिळत असत हातोहाती

वाड्यातील कोनाड्यात होता

संग्रह कैक वस्तूंच्या साठवणीचा

मनातील कोनाड्यात जपलाय

कोनाड्यांच्या सुरम्य आठवणींचा

आयुष्याच्या सांजवेळी देह

आपुले फुलवातीसमान जळती

तेव्हा हे कोनाडेच साथ देऊन

बुधली बनून ज्योतीस तेवत ठेवती

-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.