कौशल इनामदार
फूल जसं देठाला फुटतं तशी ती चाल कवितेच्या देठाला फुटली पाहिजे. मायकेल अँजेलो म्हणायचा, की शिल्प दगडात असतं; मी केवळ अनावश्यक दगड बाजूला करत असतो. त्याचप्रमाणे चाल ही कवितेत निहीत असते; संगीतकाराला केवळ एका निरागस मुलाप्रमाणे आपलं बोट त्या कवितेच्या हातात द्यायचं असतं आणि कविता नेईल तिथे सुरांच्या पंखांवर स्वार होऊन जायचं असतं!
काही वर्षांपूर्वी एका विद्यापीठात मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात माझी मुलाखत होणार होती. कार्यक्रमाच्या आधी चहापानाच्यावेळीच मराठीच्या एका ज्येष्ठ प्राध्यापिकेने मला जरा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. प्रश्न त्यांनी हसून विचारला असला तरी तो ‘आरोप’ या सदरातच मोडत होता.
“तुम्ही गाणी वगैरे करता ते सगळं ठीक, पण तुम्ही कवितेच्या वाटेला का जाता?”
“वाटेला जाता म्हणजे नेमकं कसं?” असा प्रतिप्रश्न मी केला.