डॉ. नीरज देव
मराठी काव्येतिहासात १८८५ नंतर केशवसुतांच्या कवितांमुळे क्रांती झाली. केशवसुतांना ‘आद्य युगप्रवर्तक कवी’ असंही संबोधले जाते. केशवसुतांपासून मराठी कवितेला आधुनिक वळण मिळाले. केशवसुतांच्या नंतर मराठी काव्यात क्रांती घडवून आणण्याचं काम कवी बा. सी. मर्ढेकर यांनी केले.
आधुनिक मराठी काव्यापूर्वीचे बहुतांशी मराठी काव्य हे पुराणांतील घटनांवर आधारित, उपदेशपर आणि संस्कृतवर अवलंबित होते. त्यात अलंकार, रचना, पाल्हाळीकपणा भरलेला होता. त्यातही आध्यात्मिकता नि ईशस्तुतीचा भाग लक्षणीय स्वरूपात होता. केशवसुतांच्या उदयानंतर त्यात आमूलाग्र बदल झाला. त्यामुळेच आधुनिक काव्याची कालानुरूप वर्गवारी करताना कवी व समीक्षक रा. श्री. जोग १८८५ ते १९२० असा केशवसुतांचा कालखंड मानतात व त्या कालखंडाला ‘क्रांतिकाळ’ संबोधतात या काळाचे ते १८८५-१९०५ आणि १९०५-१९२० असे वीस व पंधरा वर्षांचे दोन भाग करतात. यातील पहिल्या वीस वर्षांतील दत्त, वासुदेव खरे, चंद्रशेखर, विनायक आदी कवींना केशवसुतांच्या नव्या मन्वंतराचा स्पर्श झालेला नव्हता, असे निरीक्षणही ते नोंदवतात.
जोग आधुनिक मराठी काव्याचे केशवसुतपूर्व नि केशवसुतोत्तर असे दोन कालखंड पाडतात व ते बहुतेक समीक्षकांना आणि कवींनाही मान्य झालेले आहेत. त्याच श्रेणीत जोग १९४५-१९६५चा कालखंड मर्ढेकरांचा असल्याचं मांडतात. या दोन्ही कालखंडांचा संक्षेपात आढावा प्रस्तुत लेखात घेण्याचा मानस आहे.