शिरीन म्हाडेश्वर, न्यू जर्सी, अमेरिका
‘‘आपली सर्वोत्कृष्ट कलाकृती हातावेगळी केल्यानंतर ती आपला सर्वात मोठी शत्रू होत असावी का गं?’’
संथ गतीनं पावलं उचलत तो ‘अक्षरसंग’च्या पहिल्या मजल्यावर आला. दोन वर्षांपूर्वी ‘सावरीचं फूल’ प्रकाशित झाल्यानंतर वाचक संवाद आणि त्याची सही असलेल्या प्रती इथंच वितरीत झाल्या होत्या.
पुस्तकांनी खचखचून भरलेल्या बुकशेल्फांच्या गर्दीत ‘कन्टेम्पररी रायटर्स’ विभागात त्याला ‘सावरीचं फूल’ दिसलं. पाचवी आवृत्ती. शहरातल्या एका बलाढ्य प्रकाशन गृहानं वितरीत केलेलं त्याचं पहिलंवहिलं पुस्तक. किती अपार कष्ट केले हे घडवण्यासाठी! तहान-भूक हरपून एकच ध्यास घेतल्यासारखं, झपाटल्यासारखं, दिवस-रात्र फक्त तोच विचार केला. त्यानंतर झालेला झगमगीत लोकार्पण सोहळा. साहित्य वर्तुळातल्या एक से बढकर एक लोकांची उपस्थिती. सर्वांच्या औत्सुक्यपूर्ण नजरांमुळं अधिकचं आलेलं दडपण. आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये वाचकांकडून आलेला भरभरून प्रतिसाद, जबरदस्त प्रतिक्रिया. जाणकार, समीक्षकांकडून एकजात वाखाणलं गेलेलं त्याचं ‘सावरीचं फूल’.