डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी, पुणे
अजरामर साहित्याचा मूळ पाझर आमच्यासमोर असल्याने आम्हालाही शुद्ध असे गदगदून आले. आता पुढे हुंदके फुटू नयेत म्हणून “गुरुवर्य, आता आम्ही निघतो, आज तुमच्याकडून खूप काही मिळालेय!” असे म्हणत, सुभानरावांना निरोपाचा नमस्कार करत आम्ही तिथून हलकेच निघालो...
“शकुंतलेच्या जीवनावर महाकवी कालिदासाने ‘शाकुंतल’ हे संस्कृत नाटक लिहिले. ते अप्रतिम नाटक वाचून जर्मन कवी गटे इतका आनंदला म्हणे, की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला...!”
आमचे ताजे मित्र प्रा. सुभानराव गप्पांदरम्यान हे वाक्य म्हणाले आणि आम्ही चकित झालो.
सुभानराव हे मराठीचे प्राध्यापक!
ज्या गावी आम्ही नोकरीमुळे बदलून गेलो होतो, तिथल्या अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात सुभानराव मराठीचे विभाग प्रमुख होते, आमच्या साहित्यप्रेमाचे नवे संरक्षक होते. केवळ मराठी साहित्यातील पुस्तके वाचण्याचा नाद आम्हाला असल्यामुळे आम्ही साहजिकच ज्या ज्या गावी बदलीने जात असू तिथले वाचनालय शोधत असू आणि तिथल्या मराठीच्या प्राध्यापकांच्या ओळखी करून घेत असू.
अशीच एकदा आमच्या नोकरीदरम्यान आमची एका आडवळणाच्या तालुक्याला बदली झाली, तेव्हा तिथे मनोरंजनाची विशेष अशी कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. सिंगल स्क्रीनचे एकमेव थिएटरही बंद पडलेले होते. नाही म्हणायला गावात नगरपालिकेचे वाचनालय होते आणि अनुदानित असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथालय मात्र उपलब्ध होते.