योगिनी वेंगुर्लेकर, पुणे
‘‘श्रीनगरनं तिलासुद्धा खूप दुःख दिलंय. फरक इतकाच आहे, की एकटेपणाचं संपून जावसं वाटण्याचं पर्व ओलांडून आपण पुढे सरकलोय आणि ती आता त्या पर्वात शिरलीय... अगदी एकटी..!’’ अभी सांगत होता. भोगलेल्या काळानं मला एवढी समज नक्कीच दिलेली होती... काही झालं तरी शाझिया एकटी पडता कामा नये.
रात्रीचे अडीच वाजलेत, तरीही मी टक्क जागी! मला निद्रानाशाचा विकार नाही. झालंय असं की माझा मुलगा अभिराम दिल्लीहून यायचाय, त्याची मी वाट पाहतेय.
पूर्वीदेखील मी अशीच जागी असायची. पण तेव्हाची कारणं वेगळी होती. पुणे स्टेशनवरून थेट गोळीबार मैदानावरून डावीकडे वळलं की सॅलिसबरी पार्क! इथं आम्ही फ्लॅट घेतलेला. त्या काळात संध्याकाळी सूर्य डुबीला गेला, की काही मिनिटांत इथं ओस पडायचं सगळं, अगदी शुकशुकाट व्हायचा आणि मग खूप चोऱ्यामाऱ्यासुद्धा व्हायच्या. साहजिकच माझ्या मनात... पोटात भीती भरून यायची आणि मी रात्रीची टक्क जागी राहायची.
आता इकडं गर्दी झालीय इमारतींची, वाहनांची, माणसांची. त्यामुळे किमती वाढल्यायत सगळ्याच्याच. पण मुख्य म्हणजे रिक्षा यायला लागल्यायत इथवर. नाहीतर जर कॅम्पात मेन स्ट्रीटवर कामासाठी गेले असेन आणि परतीसाठीची बस ऐनवेळी कॅन्सल झाली असेल, तर रिक्षा अपरिहार्य असायची, पण कोणताही रिक्षावाला सॅलिसबरी पार्कपर्यंत यायला तयार नसायचा. मग हातातलं सामान वागवत घरी येताना बोंब व्हायची.
अशा दिवसांतच नेमकी माझ्या नवऱ्याची बदली झालेली जे. ॲण्ड के.ला. वाटलं आता कुठं जावं लागतंय? कारगिल...? लेह-लडाख की थेट जम्मू की थेट इंटेरियरमध्ये कुठेतरी बटोट उधमपूर वगैरे..? तर चक्क श्रीनगर!