डॉ. अनघा केसकर, पुणे
त्यानं पहिल्यांदा जेव्हा नाटकाचं तिकीट तिच्या हातात ठेवलं, तेव्हा तिला संदीप-रेखाची आठवण झाली. कितीतरी नाटकं-सिनेमे त्या तिघांनी एकत्र पाहिले होते, त्यावर चर्चा केल्या होत्या. रेखा-सीमाची संदीपशी झालेली पहिली भेटही अशा जाहीर चर्चेच्यावेळीच. पण तेव्हा त्या तिघांपैकी कोणालाच या भेटीमधून पुढे काय घडणार आहे याचा अंदाज आला नव्हता.
मकं कितव्यांदा सीमा निखिलला समजावत होती ते तिला किंवा त्याला दोघांनीही सांगता आलं नसतं. रेखाला जाऊन आता आठ महिने होत आले होते. तरी निखिल सावरतच नव्हता. वास्तविक रेखानं शेवटच्या काही दिवसात इतकं काही सोसलं होतं, की मृत्यूमुळे तिची सुटकाच झाली असं कोणाही शहाण्या किंवा तिच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला वाटलं असतं. या विचाराबरोबर हॉस्पिटलमधे रेखानं घालवलेल्या शेवटच्या काळात वेदनेने पिळवटलेला आणि डोळ्यात येऊ घातलेल्या मृत्यूची व्याकूळपणे वाट पाहणारा, चेहरा सीमाच्या नजरेसमोर आला.
त्या पार्श्वभूमीवर निखिलचं खांदे पाडून आणि देवदासच्या अवतारात समोर बसणं सीमाला वैतागवाणं वाटलं. सीमाला मुळातच रडी माणसं कधी आवडली नाहीत. पुरुषांनी असं टिपं गाळणं तर तिला अजिबात मंजूर नव्हतं. तरीही केवळ आपल्या जिवलग मैत्रिणीवरच्या प्रेमामुळे ती स्वतःच्या मूळ स्वभावाला मुरड घालून निखिलला धक्क्यातून बाहेर काढायला धडपडत होती.
नियतीची अपरिहार्यता, माणसाचं मर्त्य असणं, शरीराच्या जखमांप्रमाणेच मनाच्या जखमा बऱ्या होणं हे स्वाभाविक आणि निरोगीपणाचं लक्षण कसं आहे वगैरे गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून झाल्या होत्या. निखिलला वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना घेऊन जाण्याचा प्रयोगही फसला होता. फुलझाडं लावून त्यांची निगा राखणं, पेंटिंगचा किंवा बासरीचा क्लास सुरू करणं अशा नाना निर्माणक कामात गुंतवायचा प्रयत्न करून झाला होता. प्रयत्नांना यश येत नव्हतं.
एवढंच नव्हे तर सीमाच्या प्रयत्नांमागील धडपड आणि तिने त्याच्यासाठी दिलेला वेळ यातलं काही त्याच्या गावीच नव्हतं. उलट तो दिवसेंदिवस सीमावर अवलंबायला लागला होता. तिच्या घरी त्याने केव्हाही यावं, आपलं रडगाणं तिच्यासमोर गावं आणि तिनं आपल्याला समजून घेत हळूवारपणे सावरावं याची त्याला सवय होऊन गेली होती. बरं एवढं करूनही त्याच्यात काही सुधारणा होती का? तर मुळीच नाही.
सीमाचा संयम आता संपत आला होता. पण त्याने येऊ नये यासाठी तिनं त्याला घरातून हाकलून का लावायचं? एरवीही सीमाकडून कोणाबाबतच असं कृत्य झालं नसतं. मग इतक्या भल्या आणि दुखवट्यात आकंठ बुडालेल्या माणसाशी इतक्या निष्ठूरपणे वागणं तिला कसं जमलं असतं? रेखाच्या मैत्रीला स्मरून तर अशी कोणतीही कृती करणं सीमाला कदापि जमलं नसतं.
गेल्या काही महिन्यांपासून आलोकला- सीमाच्या नवऱ्याला निखिलचं हे असं वारंवार येणं आणि सीमासमोर दीनवाणेपणानं बसून तिच्या सांत्वनाची अपेक्षा करणं आवडेनासं झालं होतं. स्वतःची त्याविषयीची नाराजी लपवण्याची ना आलोकला इच्छा होती, ना तसा त्याचा स्वभाव होता. त्याच्या तिरसटपणाची पत्रास बाळगणं सीमानं केव्हाच सोडून दिलं होतं.
कुणाही दोन व्यक्तींमधल्या प्रेमाची जाण आलोकसारख्या कोरड्या स्वभावाच्या व्यक्तीला असणं अशक्य होतं. ज्याला स्वतःपलीकडे दुसरं जगच कधी दिसलं नाही, ज्याला स्वतःच्या मर्जीने घरात आणलेल्या बायकोबद्दल प्रेम आणि पोटच्या लाघवी मुलींबद्दल माया वाटली नाही त्याला तिऱ्हाइताच्या भावनांची खोली कशी काय जाणवावी?
पण आपण आलोकच्या गैरमर्जीचा मुद्दा पुढे करून निखिलचं येणं बंद करायला हवं होतं असं आता मात्र सीमाला वाटू लागलं होत.