डॉ. अन्विता अग्रवाल
मराठवाडा ही तर संतांची भूमी. शेतकरी, कष्टकरी, ऊसतोड कामगारांची आणि लढवय्यांची भूमी. या भूमीवर आक्रमणे झाली. वेगवेगळ्या सत्ता आल्या. मराठवाड्याला कर्मभूमी मानून इथे वेगवेगळ्या प्रांतांतील माणसे आली.
मराठवाड्याने प्रत्येकाला स्वीकारले. सांस्कृतिक आदानप्रदान करताना इथली खाद्यसंस्कृती अजून प्रगल्भ झाली. या भूमीवर झालेले आघात झेलता यावेत यासाठी वेगवेगळ्या संतांनी वेदनांवर जशी फुंकर घातली; अगदी तशीच मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीनेही लोकांमधले अंतर कमी करण्याची जबाबदारी पेलली. म्हणूनच कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्याने हिंमत न हारता या मातीशी आपली नाळ जोडून ठेवली.