संपादकीय
रंगाचा पंखा उलगडत पसणारी सांज पाहताना कधीतरी प्रश्न पडतो रंगांशी असणाऱ्या आपल्या नात्याचा. खरंच आपलं नेमकं काय नातं असतं रंगांशी? आणि ते केव्हा जमतं? सहज प्रयत्न करून पाहा. आपण रंगांच्या प्रेमात केव्हा पडलो ते नाही आठवणार.
म्हणजे तो असा काही नेमका प्रसंग, नेमका क्षण नसणार, पण ते प्रेम ‘प्रथम तुज पाहता’च्या चालीवरच जमतं, हे मात्र खरं. आरक्त पहाटेच्या आश्वासकतेपासून ते भयाची जाणीव करून देणाऱ्या काळ्याकभिन्न अंधारापर्यंत वेगवेगळ्या रंगछटा आपल्या जगण्यात प्रवेश करतात त्या अशा नकळतच.
वेगवेगळ्या भावभावनांच्या तरंगांशी जवळून जोडले गेलेले निसर्गातले रंग माणसांच्या हातात नेमके कधी आले ते रंगज्ञच सांगू शकतील, पण त्या रंगांनी आपल्या सगळ्यांचीच आयुष्यं रंगवून टाकली आहेत, याबद्दल दुमत नसावं.
झाडांच्या साली, पाने, फुलांच्या पाकळ्या, फळांचे रस अशा अनेकविध पदार्थांतून माणसाच्या हाताला रंग लागले त्याला आता पाच सहस्रकांहून अधिक काळ लोटला आहे. एखाद्या आनंद-प्रसंगाच्या उत्फुल्लतेत भर घालणारी शुभसूचक मेंदी याच प्रवासात माणसाच्या हाती लागली असणार, आणि सौंदर्य खुलवणाऱ्या रंगसंभाराच्या पहिल्या काही प्रयत्नांमध्ये, काहीसा उग्र असला तरी रंध्रांना सुखावणारा दरवळ असणारी, मेंदी नक्की असणार.
लॉसोनिया इनरमिस अशा नावाने वनस्पतीविज्ञानाला परिचित असणारी लिथ्रेसी कुलातील मेंदी मूळची भारतातली नसावी. विश्वकोशकारांच्या मते ती मूळची आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातली आणि आग्नेय आशियातली. इ.स. ११००पूर्वी कधीतरी ती भारतात आली असावी.
कारण भारतात इ.स. ११००च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या नित्यनाथ सिद्धांच्या रसरत्नाकर या ग्रंथात ‘महिंदी’ हा मेंदीवाचक शब्द आढळतो. तत्पूर्वीच्या कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात मेंदीचा उल्लेख आढळत नाही, असं विश्वकोशकार सांगतात.
मेंदीचं कूळ कुठलंही असलं तरी मेहंदी, मदरंगा, मेंदिका, नखरंजका, गोरंटे, रक्तगर्भा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मेंदीने आजवर असंख्यांच्या आयुष्यात रंग भरले आहेत, हे निःसंशय.
वैयक्तिक आयुष्यांच्या पलीकडे जात औषधनिर्मितीसारख्या उद्योगांमध्ये मेंदी आपला आब राखून आहे. मेंदीच्या एकूण उलाढालीची कल्पना सहज येत नाही. पण लग्नसराई, रमजान ईद, दिवाळी अशा मेंदीचे ‘सीझन’ असण्याच्या दिवसांपुरता विचार केला, तरी एका एका शहरामधलीच मेंदीची उलाढाल काही क्विंटलांमध्ये मोजावी लागते.
मेंदीची पूड जितकी सुपरिचित असते तितकीच मागणी मेंदीच्या फुलांपासून तयार होणाऱ्या अत्तरालाही असते. कन्नौजच्या गुलाबाच्या अत्तरांबरोबर हिना म्हणजे मेंदीच्या अत्तराचाही बोलबाला असतो.
पारंपरिक मेंदी व्यावसायिकांच्या बरोबरीने गेल्या काही वर्षांमध्ये सौंदर्यप्रसाधन उद्योगातल्या काही बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनीही, विशेषत्वाने केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांसाठी, आता मेंदी उद्योगात पाय रोवले आहेत. नेमके आकडे मिळणं कठीण असलं, तरी एका अंदाजानुसार भारतातली मेंदी उद्योगाची वार्षिक उलाढाल काहीशे कोटी रुपयांच्या घरात असावी, आणि यात निर्यातीचा वाटा निम्म्याच्या आसपास आहे.
इराण, पाकिस्तान, येमेन आणि सुदानचाही मेंदीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताच्या बरोबरीने सहभाग आहे. अमेरिका, कॅनडा, यूके, जर्मनी, फ्रान्स, चीन, जपान, द.आफ्रिका, ब्राझील ही जगातली मेंदीची बाजारपेठ.
जगाच्या बाजारपेठेत भारतीय मेंदीला ‘सर्वात उत्तम रंगणारी मेंदी’ म्हणून भाव असला तरी मेंदी उद्योगासमोर सध्या आव्हान आहे ते पसरत जाणाऱ्या शहरांमुळे मेंदी पिकाखालची जमीन आक्रसण्याचे. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारभाव ही मेंदी उद्योगाला जाणवणारी आणखी एक अडचण असल्याचे जाणकार सांगतात.
तरीही मेंदीच्या औषधी गुणधर्मांमुळे शुभकार्यांच्या आनंदाशी जोडलेल्या मेंदीचा रंग खुलतच राहणार, असा या जाणकारांचा विश्वास आहे. औषधी वनस्पतींपासून तयार झालेल्या उत्पादनांना वापरकर्त्यांकडून मिळणारी पसंती हे या विश्वासाचं एक कारण.
अलीकडे वैयक्तिक पातळीवर मेंदी कलाकारांसाठी मेंदी रेखाटन हा उत्तम व्यवसाय म्हणून पुढे आला आहे. कलाकाराची नजर आणि सातत्याने शिकण्याची सवय या भांडवलासह मेंदीने कित्येक कलाकारांच्याही जगण्यात रंग भरले आहेत.
दाही दिशा महिरून टाकत सणवारांची द्वाही फिरवणारा श्रावण आकाशवाटेने मेघांत सोनेरी निशाणे लावीत येत असताना साप्ताहिक सकाळच्या वाचकप्रिय विशेषांकांमधील हा मेंदी विशेषांक आपल्या हाती असेल.
गोठलेल्या आसवांनाही पंख देत आनंद पेरणाऱ्या सणांची मालिकाच सुरू होताना या सगळ्या सोहळ्यांचा आनंद वाढवणारी मेंदी आपलं जगणं खुलवत राहो, अशाच सदिच्छा!
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.