शेखर ओढेकर
‘ए नाऽऽ ग नरसोबा, पाच पैशाला एक’ असा आवाज ऐकू आला, की श्रावणातील सणासुदीच्या वातावरणाची निर्मिती आपोआपच व्हायची. जीवतीचे किंवा नाग- नरसोबाच्या प्रतिमेचे रंगीत कागद विकणाऱ्या मुलांचा हा आवाज. या आवाजाला एक लय, ताल होता.
शाळेतली मुलं हे प्रतिमेचे कागद विकत गल्लीतून दिवसभर ओरडत फिरत तेव्हा श्रावण महिना आहे, हे चांगलंच जाणवायचं. सणांची आठवण करून देणारा एक खास आवाज संक्रांतीच्या दिवशी अक्षरशः आसमंत दणाणून सोडत असे, ‘कापली रेऽऽ धीना!’ गल्लीतील सगळ्या घरांच्या गच्चीतून, पत्र्यांवरून संक्रांतीच्या दिवशी हा आवाज सामुदायिकरितीने येत असे. त्या दिवशी आकाश पतंगांनी भरलेले असायचे.