Food Recipe : बाजरीच्या टिकाऊ पुऱ्या करून पाहिल्या का? बघा पुऱ्यांचे विविध प्रकार

Food Point : तिखट पुऱ्या, खारी पुरी, पालक पुरी, बाजरीच्या टिकाऊ पुऱ्या, टोमॅटोच्या पुऱ्या, कोथिंबीर पुरी, मसाला पुरी
millet puri
millet puri esakal
Updated on

सुप्रिया खासनीस

तिखट पुऱ्या

वाढप

२०-२५ पुऱ्या

साहित्य

दोन वाट्या कणीक, अर्धा वाटी बेसन, आवडीनुसार तिखट, मीठ, १ चमचा ओवा, हळद, तळण्यासाठी तेल.

कृती

कणीक व बेसन एकत्र करून त्यात किंचित हळद, तिखट, मीठ व ओवा हाताने एकत्र करावा. नंतर त्यात ४ चमचे गरम तेलाचे मोहन घालून कणीक घट्ट भिजवावी. अर्धा तासाने त्याच्या पातळ पुऱ्या लाटाव्यात व तळाव्यात. पूर्ण थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात. बरेच दिवस टिकतात त्यामुळे प्रवासात उपयोगी. तसेच या पुऱ्यांचा कुस्करादेखील दहीचटणीबरोबर छान लागतो.

खारी पुरी

वाढप

२५-३० पुऱ्या

साहित्य

अडीच वाट्या मैदा, २ चमचे मिरपूड (भरड), २ चमचे जिरे पूड, हळद, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती

मैदा, मिरपूड, जिरे पूड, अर्धा वाटी तेल, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर पाणी घालून कणीक भिजवून तासभर बाजूला ठेवावी. तासाभराने कणीक मळून पातळ पुऱ्या लाटाव्यात. त्यावर सुरीने टोचे पाडून त्या थोडा वेळ सुकत ठेवाव्यात, तांबूस रंग होईपर्यंत तळाव्यात.

पालक पुरी

वाढप

२०-२५ पुऱ्या

साहित्य

दीड वाटी कणीक, अर्धी वाटी रवा किंवा बेसन, पाव चमचा हळद, १ चमचा ओवा, चवीनुसार मीठ, १०-१२ पालकाची पाने, ४-५ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या, तेल.

कृती

सर्वप्रथम पालकाची पाने धुवून घ्यावीत. पानांचे बारीक तुकडे, लसूण, मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. या वाटलेल्या मिश्रणात कणीक, रवा किंवा बेसन, हळद, २ चमचे तेल, चवीनुसार मीठ घालून घट्ट पीठ भिजवावे. गरज वाटली तरच पाण्याचा वापर करावा. १५-२० मिनिटांनी पुऱ्या लाटून तळाव्यात. या पुऱ्या ४-५ दिवस टिकतात.

बाजरीच्या टिकाऊ पुऱ्या

वाढप

मध्यम आकाराच्या २०-२५ पुऱ्या

साहित्य

तीन वाट्या बाजरीचे पीठ, ४ चमचे तीळ, १ चमचा हिंग, चवीनुसार मीठ, तिखट व गरजेनुसार दही किंवा ताक.

कृती

बाजरीच्या पिठात हिंग, मीठ, तिखट, तीळ घालून मिश्रण एकसारखे करावे. तयार मिश्रणात गरजेनुसार दही किंवा ताक घालून पीठ भिजवावे. १० ते १५ मिनिटांनी पीठ मळून जाडसर पुऱ्या लाटून तळाव्यात. या पुऱ्या चविष्ट लागतात, प्रवासात उपयोगी पडतात.

टोमॅटोच्या पुऱ्या

वाढप

२०-२५ पुऱ्या

साहित्य

दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी बेसन, पाऊण वाटी लाल टोमॅटोचा रस (प्युरी), ५-६ हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार तिखट, १ चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती

सर्वप्रथम मिरच्या, ओवा, जिरे यांचे बारीक वाटण करावे. कणीक किंवा बेसन पिठामध्ये वाटण, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तेल आणि टोमॅटो प्युरी घालून कणीक घट्ट भिजवावी. गरज वाटली तरच थोडी कणीक घालावी. पुऱ्या लाटून तळाव्यात.

कोथिंबीर पुरी

वाढप

२५-३० पुऱ्या

साहित्य

एक मध्यम कोथिंबीर जुडी, २-३ वाट्या कणीक, अर्धी वाटी बेसन, ७-८ हिरव्या मिरच्या, १ चमचा आले पेस्ट, चवीनुसार मीठ, तेल, तीळ.

कृती

प्रथम कोथिंबीर फार बारीक न चिरता मध्यम चिरून धुवून घ्यावी व निथळावी. नंतर त्यात अर्धी वाटी बेसन, आले-मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ घालून एकसारखे करावे. हवे असल्यास पांढरे तीळ घालावेत. तयार झालेल्या मिश्रणात २ चमचे गरम तेलाचे मोहन घालून त्यात गरजेनुसार कणीक घालावी व पीठ घट्ट भिजवावे. कोथिंबिरीला पाणी सुटते त्यामुळे पाणी गरजेनुसारच घालावे. पुऱ्या लाटून तळाव्यात.

बटाटा पुरी

वाढप

२०-२५ पुऱ्या

साहित्य

दोन वाट्या कणीक, २-३ मध्यम आकाराचे बटाटे, ५-६ हिरव्या मिरच्या, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ.

कृती

सर्वप्रथम बटाटे उकडावेत. गार झाल्यावर कुस्करून घ्यावेत. त्यात चवीनुसार मीठ, वाटलेल्या मिरच्या, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्या मिश्रणात साधारण २-३ वाट्या कणीक घालून पीठ चांगले मळावे. पुऱ्या लाटून तळाव्यात. या पुऱ्या खुसखुशीत होतात.

मसाला पुरी

वाढप

२०-२५ पुऱ्या

साहित्य

दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा ओवा, १ चमचा जिरे पूड, १ चमचा धने पूड, १ चमचा भरडसर मिरी पूड, चवीनुसार मीठ, मोहनासाठी तूप, ३ चमचे तेल.

कृती

मैद्यात गरम तुपाचे मोहन घालून पीठ एकसारखे करावे. मोहन पीठाला चांगले लागले पाहिजे. पिठाचा मुटका झाला म्हणजे मोहन व्यवस्थित लागले आहे असे समजावे. नंतर त्यात धने-जिरे पूड, चवीनुसार मीठ व ओवा घालून पीठ घट्ट भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. पीठ व्यवस्थित मळून पातळ पुऱ्या लाटाव्यात व तळाव्यात.

-----------------------

Related Stories

No stories found.