सुकेशा सातवळेकर
चातुर्मासात पावसामुळे पचनशक्ती कमी असते. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वात दोष वाढतात, पित्ताचं संचयन सुरू होतं. म्हणून हलका, संतुलित आणि संयमित आहार घ्यावा. पचायला जड पदार्थ टाळावेत. गरज पडल्यास पोटाला विश्रांती द्यावी, याच विचारानं पूर्वीच्या काळी उपवास केले जात होते.
पावसाळा एक अजब ऋतू आहे ना? एकीकडे नवसंजीवनी, तर दुसरीकडे तब्येतीच्या वाढत्या तक्रारी! आषाढापासून एकादशीचे उपवास सुरू होतात.
चातुर्मास सुरू झाला की बाकीही उपवास सुरू! सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार उपवासांची यादी संपतच नाही आणि त्यांच्या जोडीला चतुर्थी, पौर्णिमा आहेतच.
आणि हो, उपवासांच्या यादीसारखीच उपवासाच्या मेनूतील चमचमीत पदार्थांची यादीही भली मोठी असते. बरोबर ना? त्यामुळेच म्हणत असावेत, ‘एकादशी दुप्पट खाशी आणि तब्येतीची ऐशी की तैशी!’
पावसाळ्याच्या सुमारास ओलसर दमट परिस्थितीत रोगजंतूंची वाढ झपाट्यानं होते. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे पचनशक्ती कमी होऊन अपचनाच्या तक्रारी वाढतात.
हवेतील भौतिक रासायनिक बदलांमुळे आणि अॅलर्जीच्या त्रासामुळे सर्दी, खोकला आणि दम्याचा त्रास वाढू शकतो. प्यायचं पाणी दूषित असण्याची शक्यता असते, त्यामुळे पोट बिघडण्याचा धोका वाढतो.
समतोल, चौरस आणि नियंत्रित आहार तसंच आरोग्यपूर्ण सवयींचा अवलंब केला, तर साथीचे आजार आणि संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारशक्ती कमावणं शक्य होईल.
पावसाळ्याच्या दिवसांत पाणी उकळून प्यावं. पाण्याला उकळी आल्यावर पुढे दहा मिनिटं पाणी उकळावं, म्हणजे अपायकारक जंतू नष्ट होतील. जास्तीची खबरदारी म्हणून एक लिटर पाण्यात तीन-चार थेंब क्लोरिन घालावं.
आलं, लसूण, पुदिना, हिंग, हळद, मिरे, जिरे, धने यांचा रोजच्या आहारात वापर वाढवला की पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. स्वयंपाकासाठी सैंधव मीठ वापरावं. सॅलडच्या भाज्या, मोडाची कडधान्यं कच्ची न खाता वाफवून खावीत.
इम्युनिटी वाढवण्यासाठी गरम गरम काढा किंवा हर्बल टी दिवसभरात थोडा थोडा प्यावा. गवती चहा, तुळशीची पानं, आलं, सुंठ, लवंग, धने पूड पाण्यात उकळून काढा तयार करावा. तसंच वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता जपावी.
स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावं. हातांची योग्य स्वच्छता कायम लक्षात ठेवायला हवी. काहीही खायच्या, प्यायच्या आधी किंवा अन्नपदार्थ हाताळण्याआधी हात जंतुनाशक साबणानं स्वच्छ धुवावेत. बाहेरून घरी आल्यावर पाय काळजीपूर्वक धुवावेत.
तळपायाच्या त्वचेमधून जंतूंच्या सूक्ष्म अळ्या शरीरात प्रवेश करून पोटाचं आरोग्य बिघडवू शकतात. भाज्या आणि फळं, मीठ किंवा व्हिनेगर घातलेल्या पाण्यात पाच मिनिटं बुडवून मग नळाखाली पाण्यात स्वच्छ धुवावीत, म्हणजे त्यांच्यावरील सूक्ष्मजंतू नष्ट होतील.
रस्त्यावरचे, उघड्यावर विकले जाणारे, माश्या बसलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत. बाहेरील अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्गाचा धोका असतो. माश्यांवाटे रोगजंतूंचा फैलाव होतो. घराबाहेर खायची वेळ आलीच तर आपल्या डोळ्यांसमोर शिजवलेले पदार्थच निवडावेत.
मांसाहार करणाऱ्यांनी या दिवसांत मासे शक्यतो खाऊ नयेत. मासे शिळे असण्याची शक्यता असते. या दिवसांत शक्य तेवढी स्वच्छता पाळून, आहाराचं व्यवस्थित संतुलन साधून, पावसाळ्याचा आनंद नक्कीच घेता येईल.
आता वळूया उपवासाच्या आहाराकडे!
उपवासामागचं खरं प्रयोजन ‘जिभेवरील नियंत्रण वाढून, पोटाला आराम देणं’ हे आहे. चातुर्मासात पावसाळी हवेमुळे पचनशक्ती कमी असते. आयुर्वेदाप्रमाणे पावसाळ्यात वात दोष वाढतात, पित्ताचं संचयन सुरू होतं.
म्हणून हलका, संतुलित आणि संयमित आहार घ्यावा. पचायला जड पदार्थ टाळावेत. गरज पडल्यास पोटाला विश्रांती द्यावी, याच विचारानं पूर्वीच्या काळी उपवास केले जात होते.
चरक संहितेमध्ये चक्रदंतानं लंघन किंवा उपवासावर मार्मिक भाष्य केलं आहे. ‘उपवास’ म्हणजे कामक्रोधादि दुर्गुणांचा परित्याग व सत्य, अहिंसादि सात्त्विक गुणांचे उपदान होय.
केवळ अन्न वर्ज्य करून शरीराचे अनावश्यक शोषण करणं म्हणजे उपवास नव्हे! आपण चरक संहितेत सांगितलेला उपवासाचा खरा अर्थ लक्षात घ्यावा.
आपलं पोट, आपलं शरीर, जरुरीनुसार आपल्याला उपवास करण्याचा, न खाण्याचा संदेश देत असतं. तेव्हा मात्र पचायला हलका, पचनशक्ती सुधारेल असा थोडा आहार घ्यावा. तो खरा उपवास!
मधुमेहाचं प्रमाण हल्ली खूपच वाढलंय. मधुमेहींनी उपवास करताना विशेष काळजी घ्यायला हवी. काहीही न खाता-पिता किंवा अगदी कमी प्रमाणात खाऊन उपवास करू नयेत. रक्तातील साखर एकदम कमी होऊन हायपोग्लायसिमिया होण्याचा धोका असतो.
चार-पाच वेळा थोडा थोडा फराळ करावा. उपवासाला चालणाऱ्या आरोग्यदायी पदार्थांची निवड करावी. अयोग्य खाण्यापिण्यानं, रक्तातील साखर वाढू किंवा कमी होऊ शकते.
वरचेवर उपवास करत असाल तर उपवासाच्या आहाराच्या वेगळ्या स्वरूपामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांच्या डोसमध्ये आवश्यक बदल करावेत.
उपवासाचे नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे, साबुदाण्याची खिचडी, वडे किंवा पापड्या तसंच बटाट्याचे चिप्स/ भाजी/ पापड किंवा शेंगदाण्याचे लाडू किंवा आमटी, केळी, रताळी वरचेवर खाण्यात येत असतील तर यांमधील दोष आणि कमतरता समजून घ्याव्यात.
या पदार्थांमध्ये फायबर किंवा तंतुमय पदार्थांचं प्रमाण खूप कमी असतं.आयर्न, प्रोटीन, व्हिटॅमिनचा अभाव असतो.हे पदार्थ तयार करताना अतिप्रमाणात तेल, तुपाचा वापर होतो.या पदार्थांमध्ये कार्बचं प्रमाण जास्त असतं.या पदार्थांचा ग्लायसिमिक इंडेक्स जास्त असतो.
त्यामुळे होणारे दुष्परिणाम‘एकादशी, दुप्पट खाशी’ असं केल्यामुळे वजन वाढतं.पित्ताचा त्रास संभवतो.बद्धकोष्ठता म्हणजेच पोट नीट साफ होत नाही.
कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती असते.रोगप्रतिकारशक्ती कमी होते.हे पदार्थ खाल्ल्यावर रक्तातील साखर लवकर वाढते, साखरेवरचं नियंत्रण बिघडतं.मानसिक, शारीरिक थकवा जाणवतो.
योग्य पद्धतीने उपवास करायचा असेल तर हे नक्की करा
तुमच्या घरी उपवासाला चालणाऱ्या भाज्यांचा वापर तुम्ही वाढवायला हवा. तांबडा भोपळा, भोपळी मिरची, भेंडी, काकडी, राजगिऱ्याची पालेभाजी, कोथिंबीर; उपवासाची भाजी किंवा भरीत किंवा कोशिंबिरीच्या स्वरूपात खाऊ शकता.
सुरण, रताळी, कच्ची केळी, ओले शिंगाडे, बटाटा यांचा वापरही योग्य पद्धतीने आणि थोड्या प्रमाणात करता येईल.राजगिऱ्याचा वापर वाढवावा. राजगिऱ्याच्या लाह्या किंवा पीठ, दूध/ दही/ ताकाबरोबर वापरावं.उपवासाच्या फराळासाठी राजगिरा पीठ किंवा वऱ्याच्या तांदुळाच्या पिठाची भाकरी आणि उपवासाला चालणारी भाजी भरपूर खावी.
फोडणीचे वऱ्याचे तांदूळ करून त्यात एखादी उपवासाची भाजी घालावी.उपवासाचं थालीपीठ करतानाही बटाट्याऐवजी इतर भाज्या वापराव्यात. काकडी, भोपळी मिरचीचं सॅलड करावं. दाण्याची आमटी करण्याऐवजी आमसुलाचं सार किंवा शिंगाड्याच्या पिठाची कढी करावी.
दिवसभरात किमान एक-दोन फळं खायला हरकत नाही.सुक्या मेव्याचा योग्य वापर करावा. खारीक, काळ्या मनुका, सुकं अंजीर, जर्दाळू खाऊ शकता.
एखादा बदाम, अक्रोडही खाऊ शकता.पातळ पेयं म्हणजेच ताक, शहाळ्याचं पाणी, लिंबू/ आवळा/ कोकम सरबत प्यावं. फळांचे रस, लस्सी, दूधही पिऊ शकता.उपवासाचे पदार्थ करताना तेल, तूप, दाण्याचं कूट, ओलं किंवा सुकं खोबरं यांचा वापर जपूनच करावा.
उपवासाची परंपरा बऱ्याच धर्मांमध्ये विविध प्रकारे जोपासलीगेली आहे. काही उपवास फक्त एका दिवसापुरते, तर काही जास्त दिवसांसाठी, कमी अधिक कडक असतात. उपवासकेल्यानं आहारातील बंधन पाळण्याचं प्रशिक्षण मिळतं.
वेळपडल्यास अशी बंधनं पाळणं सहज स्वीकारता यावं असा त्यामागे उद्देश आहे. त्यामुळे अन्नाचं महत्त्वही कळतं; अन्न वाया घालवू नये असा संस्कार बिंबवला जाऊ शकतो.
उपवासासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीच्या जोरावर शरीराला आणि आजच्या काळाला साजेसे उपवास करावेत. प्राचीन उपवासामागील प्रयोजनाचा शोध आणिबोध समजून घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.