‘काय वाचावं?’ या प्रश्नाचं उत्तर वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीगणीक बदलत जातं हे खरं असलं, तरी पुस्तकांशी मैत्र हवं, वाचत राहायला हवं, हे मात्र जगण्याची उंची वाढवणारं सत्य असतं. हातात धरलेलं प्रत्येक पुस्तक वाचणाऱ्याला काहीतरी देऊन जातं, हे निश्चित!
सकाळ साप्ताहिकाच्या सर्व वाचकांना २३ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक पुस्तकदिनाच्या शुभेच्छा!
अमेरिकेतील आरआयएफ (रीडिंग इज फंडामेंटल) ही गेली अनेक वर्षं सुरू असलेली अमूल्य चळवळ आणि भारतातील नवीन पिढीतील वाचकांसाठी चालणारे ‘बुक कॅफे’ यादरम्यान महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचं आणि त्यातही वयाची शंभरी ओलांडलेल्या ग्रंथालयांचं योगदान किती प्रचंड आहे, हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं.
देशभरातील २० टक्क्यांपेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालयं एकट्या महाराष्ट्रात आहेत. या ११ हजार ३२२ ग्रंथालयांपैकी ९०पेक्षा अधिक ग्रंथालयांनी शंभर वर्षांहून अधिक काळ आपल्या सर्वांना ज्ञानाधिष्ठित समाजाकडं घेऊन जाण्याचे प्रयत्न अखंड सुरू ठेवले आहेत.