नीला विजय कदम
कवितेतील मायलेकींच्या सहजसंवादाचा विषय थेट वैश्विक पातळीवर जाऊन पोहोचतो. कवितेच्या या वैशिष्ट्यामुळेच अक्षरधनातील एक उत्तम ‘दागिना’ म्हणून या कवितेकडे बघावं लागतं.
एकामागून एक काव्यसंग्रह चाळताना संजय चौधरी यांच्या माझं इवलं हस्ताक्षर या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाकडं लक्ष वेधलं गेलं. लेखणीचं टोक असणारी तर्जनी... रजनीघनाचा निळासावळा रंग धारण केलेली मूठ अन् या मुठीवर चंद्रकोरीच्या साथीनं पसरलेलं चांदणं... हे मुखपृष्ठ मला आवडलं अन् मी कवितासंग्रह वाचायला सुरुवात केली. त्यातली ‘दागिना’ ही कविता मी पुन्हा पुन्हा वाचली. या दागिन्यानं मनाला अक्षरशः भुरळ घातली.