मंदार व्यासठरलेल्या शिखरापर्यंत पोहोचण्यात तुम्ही यशस्वी होणार की नाही हे हिमशिखरंच ठरवतात. आपल्या हातात फक्त आणि फक्त प्रयत्न करणंच असतं. पण प्रयत्नांती तिथपर्यंत पोहोचलात, तर तो अनुभव अतिशय विलक्षण, आयुष्यभर मनात घर करून बसणारा असतो. .गेल्या काही वर्षांत हिमालयात अनेक ट्रेक केले, पण बहुप्रतिक्षित एव्हरेस्ट बेस कँप हा ट्रेक करण्याचा योग आला नव्हता. तो यावर्षी आला. मागच्या वर्षी पंच केदार ट्रेक केल्यावर त्याचवेळी पुढच्या वर्षीच्या ज्या ट्रेकच्या नियोजनाला सुरुवात झाली तो म्हणजे एव्हरेस्ट बेस कँप. जवळून एव्हरेस्टचं दर्शन घ्यावं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. ते सत्यात उतरवण्यासाठी हा ट्रेक करण्याचं ठरवलं. कारण तेच स्वप्न उराशी बाळगून गेली सात वर्षं सह्याद्रीमधील काही निवडक ट्रेक आणि हिमालयातले अन्नपूर्णा बेस कँप, अमरनाथ, हम्पटा पास, पंच केदार, लेह-लडाख सायकलिंग एवढे ट्रेक केले होते. आता एव्हरेस्ट! २०२३च्या डिसेंबरमध्येच तयारी सुरू केली. मागील अनुभव पाठीशी होताच. प्रस्थान होण्यापूर्वी ज्या ग्रूपबरोबर जाणार होतो त्यांच्या अजित साने सरांनी आमची एक मीटिंग आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी पूर्वतयारी, संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी याबद्दल विस्तृत माहिती दिली. या ट्रेकला तुम्हाला गाइड अत्यावश्यक आहे. ट्रेकसंबंधीचं सर्व गरजेचं साहित्य असल्याशिवाय हा ट्रेक करू नये असं मला वाटतं.ता. १५ एप्रिलला मुंबई ते काठमांडू असा विमान प्रवास करून दुपारी तीनच्या सुमारास हॉटेलमध्ये पोहोचलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन संध्याकाळी आमची एक ग्रुप मीटिंग झाली. त्यामध्ये पुढचे चौदा दिवस वेळेचं काटेकोर पालन करण्याविषयी सूचना दिल्या. तसंच स्थानिक शेर्पा शेरा आणि टेंझी यांनी महत्त्वाचे सल्ले दिले.सगरमाथा नॅशनल पार्क इथं एव्हरेस्ट बेस कँप ट्रेक आहे. तो लुकला व्हॅली या पॉइंटपासून सुरू होतो. लुकला व्हॅलीपर्यंत जाण्यासाठी काठमांडूपासून १५० किलोमीटर अंतरावर रामेछाप इथल्या एअरपोर्टवरून एका छोट्या विमानातून जावं लागतं. त्यासाठी आम्ही पहाटे दोन वाजता काठमांडूवरून बसने निघालो आणि सकाळी साडेसहा वाजता एअरपोर्टवर पोहोचलो.लुकलाला जाणारं विमान सकाळी साडेसात वाजता होतं. लगबगीने नाश्ता उरकून चेक-इनसाठी एअरपोर्टवर पोहोचलो आणि अचानक चर्चा कानावर आली, की हवामान खराब झाल्यामुळे सर्व विमानं रद्द झाली आहेत, जोपर्यंत हवामान सुरळीत होत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. सर्व विमानसेवा संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालू असतात.आम्हाला वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. मग आम्ही हॉटेल शोधून जेवण केलं. चार वाजल्यावरही विमानांना उड्डाणासाठी क्लिअरन्स मिळाला नाही. हताश होऊन रामेछाप गावातच लॉज शोधून तिथेच तळ ठोकला.दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही तयार होऊन परत एअरपोर्टवर पोहोचलो आणि अनुकूल हवामान असल्यामुळे विमानसेवा चालू झाली आहे हे कळल्यावर आनंद झाला. शेवटी साडेआठच्या विमानात बसलो. लुकला एअरपोर्टची जगातील सर्वात धोकादायक विमानतळ अशी ख्याती आहे.त्याच विमानतळावर आम्ही लँड होणार होतो. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे विमान हेलकावे घेत होतं. जीव मुठीत धरून प्रवास केल्यावर एका छोट्याशा धावपट्टीवर आमचं विमान लँड झालं..नाश्ता करून सगरमाथा एंट्री परमीट पॉइंटवर सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेलो. दुपारी साडेबाराच्या दरम्यान खऱ्या अर्थानं आमचा ट्रेक सुरू झाला. आधीचा एक दिवस वाया गेल्यानं आम्ही असं ठरवलं, की नियोजनानुसार मुक्कामाचं पहिलं ठिकाण असणाऱ्या फाकडींग इथं न थांबता पुढच्या बेनकर या गावात मुक्काम करायचा. पहिल्या दिवशी एकूण १४ किलोमीटरचं अंतर पार केलं. बेनकर समुद्रसपाटीपासून नऊ हजार फूट उंचावर आहे.दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पुढे जायला सुरुवात केली. नामचे बाजार हे पुढचं गाव पार करताना वाटेत तीन हँगिंग ब्रिज लागतात. ते क्रॉस करताना वाटेत दोन्ही पर्वतरांगांमधून दुधकोसी नदी प्रचंड आवाज करत वाहत असते. ती आपल्याला चार ते पाच वेळा पार करावी लागते. तिचा उगम अमा दब्लाम पर्वतातून होतो. समुद्रसपाटीपासून ११,४०० फूट उंचीवर असलेलं नामचे बाजार बेनकरपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. दुपारी एक वाजता हॉटेलवर पोहोचून, जेवण करून स्थानिक बाजारपेठ फिरलो. नामचे बाजार एकप्रकारे एव्हरेस्ट बेस कँपचं ट्रेकिंग हबच म्हणावं लागेल. इथं ट्रेकिंगसंबंधी सर्व सामान आणि इतरही आवश्यक वस्तू मिळतात. रात्री इथलं तापमान चार अंशापेक्षाही खाली घसरतं.आम्ही इथं दोन दिवस मुक्काम केला होता. हे करणं श्रेयस्कर ठरतं, कारण इथल्या हवेशी जुळवून घेण्यासाठी तुमच्या शरीराला तेवढा वेळ लागतोच. यामुळे तुम्हाला बेस कँपपर्यंत जायला त्रास होत नाही. इथूनच साधारण १५०० फूट उंचीवर गेल्यावर लोहत्से, अमा दब्लाम, नुपूत्से आणि एव्हरेस्ट या अष्टहजारी पर्वतांचं दर्शन होतं. यालाच एव्हरेस्ट व्ह्यू पॉइंट / खुमजुंग खुंडे असं म्हणतात.१९ तारखेला सकाळी सात वाजता एव्हरेस्ट व्ह्यू पॉइंटला जाण्यासाठी निघालो. दहा वाजता पोहोचलो. अष्टहजारी पर्वतांचं दर्शन घेतलं. आकाश निरभ्र असल्यामुळे सर्व पर्वत दिसत होते. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा नजारा बघून सारा शीण नाहीसा झाला. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, याचाही अंदाज आला.वीस तारखेला सकाळी साडेसातला चढायला सुरुवात केली. खडी चढाई होती. वाटेत प्रचंड आवाज करत दुधकोसी नदी साथीला होतीच. या प्रवासात अमा दब्लाम, लोहत्से आणि एव्हरेस्ट जवळ आल्याचं भासतं. साधारण अडीच वाजता त्यांगबोचे गावात पोहोचलो. नामचे बाजारपासून ११ किलोमीटरवर असणाऱ्या त्यांगबोचेची समुद्रसपाटीपासूनची उंची १२ हजारांहून अधिक आहे. इथं पोहोचल्यावर प्रचंड हवा आणि हिमवृष्टी यांचा सामना करावा लागला. तापमान शून्य डिग्रीपर्यंत उतरलं होतं. गरम कपडे घालून थोडी विश्रांती घेतली आणि लगेच गावातील अतिप्राचीन तिबेटियन बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये गेलो. असं म्हणतात, की प्रत्येक गिर्यारोहक इथलं दर्शन आणि आशीर्वाद घेऊनच एव्हरेस्ट चढाईची सुरुवात करतो. आम्ही दुपारी चार वाजता मॉनेस्ट्री बघण्यासाठी गेलो होतो. तेव्हा अनायसे त्यांची प्रार्थनेची वेळ होती त्यामुळे आम्हाला ती अनुभवता आली. पुढील प्रवासासाठी आशीर्वाद घेतला. संध्याकाळी जेवण करून दुसऱ्या दिवशीचा प्रोग्रॅम ठरवला.त्यांगबोचेहून सकाळी सात वाजता निघून दुपारी चारच्यादरम्यान डिंगबोचेला पोहोचलो. डिंगबोचेला पोहोचल्यावर लक्षात आलं, की इथंही तुम्हाला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक मुक्काम जास्तीचा करावा लागतो. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. इथे पोहोचण्यासाठीचा रस्ता अतिशय दुर्गम असल्यामुळे दमछाक करणारा प्रवास तुमची मानसिक आणि शारीरिक परीक्षा घेणारा ठरतो. आता तुम्ही एव्हरेस्ट पर्वतरांगांच्या क्षेत्रात प्रवेश करता. इथून जाताना हवेतील ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि चालण्याचा वेगही कमी होतो. पाठीवरची बॅग जड वाटू लागते. पुरती दमछाक होते. थोडा त्रास होण्याची शक्यताही असते. रात्री तापमान उणे ५ डिग्रीपर्यंत खाली उतरतं.डिंगबोचेचा वाढीव मुक्काम हवेशी जुळवून घेण्यासाठी असल्याकारणाने इथे साधारण एक हजार फूट उंचीची एक टेकडी चढून उतरायची होती. ती आम्ही तीन तासांत पूर्ण केली. लवकरात लवकर हवामानाची सवय होणं आवश्यक होतं, जेणेकरून पुढच्या दिवशी आम्ही एव्हरेस्टजवळील लोबुचे इथे जाऊ शकू. तिथे अतिथंड हवामानाचा सामना करावा लागणार होता. डिंगबोचेची टेकडी त्याचीच तयारी म्हणावी लागेल.लोबुचे ते डिंगबोचे अंतर ८.५ किलोमीटर असून लोबुचेची समुद्रसपाटीपासून उंची १६,६०० इतकी आहे. लोबुचे बेस कँपला वेळेत पोहोचायचं होतं त्यामुळे सकाळी सात वाजता चालायला सुरुवात केली. दुपारी चार वाजता आम्ही लोबुचे बेस कँपला पोहोचलो. रस्ता दुर्गम होता. पूर्ण थकवणारा होता. जीवघेणे चढ-उतार होते. वाटेत आम्हाला एव्हरेस्ट शिखर सर करताना मृत पावलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून उभारलेली स्मृतिस्थळं दिसली. तिथे आम्ही दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली, आणि हॉटेलवर पोहोचलो. पुढचा दिवस तसा महत्त्वाचा होता. कारण आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो दिवस उजाडणार होता. आम्ही गोरक्षेप या शेवटच्या कँपला पोहोचणार होतो. तिथून एव्हरेस्ट बेस कँप आणि काला पत्थर या दोन ठिकाणी जायचं होतं.सकाळी सात वाजता लोबुचेवरून निघालो. दुपारी एक वाजेपर्यंत गोरक्षेपला पोहोचलो. हवामान चांगलं आणि आकाश निरभ्र असल्यामुळे जेवण करून लगेच आम्ही काला पत्थरला जायला निघालो. इथे ऑक्सिजन कमी असल्यामुळे हवा विरळ होती. भर दुपारी तापमान केवळ २ डिग्री होतं. ऑक्सिजन कमी असल्यामुळे आपण जास्त वेगातही चालू शकत नाही. तरीही हा ट्रेक आम्ही तीन तासांत पूर्ण केला. काला पत्थरहून एव्हरेस्टचं अतिशय भव्य, विहंगम दृश्य बघून सगळा शीण नाहीसा झाला. आपल्या देशाचा झेंडा फडकवत काही फोटो काढले आणि एव्हरेस्ट ‘याची देही याची डोळा’ बघितला. ते दृश्य डोळ्यात साठवलं आणि हवामान बिघडत असल्यामुळे जास्त वेळ न थांबता लगेच खाली उतरण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी एव्हरेस्ट बेस कँपला जायची तयारी सुरू केली. त्या रात्री तापमान उणे २४ डिग्रीपर्यंत खाली उतरलं होतं..ज्या दिवसाची दीर्घकाळ प्रतीक्षा करत होतो, तो दिवस येऊन ठेपला होता. पहाटे चार वाजता उणे २४ डिग्री तापमान असताना चंद्राच्या साक्षीनं बेस कँपला जायला निघालो. वाटेत मोठमोठाले खडक, ग्लेशियर पार करत साधारण तीन तासांनी बेस कँपला पोहोचलो. समोरच सर एडमंड हिलरी आणि तेनझिंग नॉर्गे यांचे फोटो असलेली बेस कँपची पाटी दिसली! समुद्रसपाटीपासून १७,८०० फूट उंचीवर असणारा एव्हरेस्ट बेस कँप अवर्णनीय भासत होता. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं! काहीक्षण आनंदाश्रू आले! कडाक्याच्या थंडीमध्येही फोटो काढून तो क्षण खऱ्या अर्थानं जगून, कॅमेऱ्यात साठवून धन्य झालो. जिथून पर्वतरोही एव्हरेस्टच्या गिर्यारोहणाला सुरुवात करतात ते हे ठिकाण. तिथं आम्हाला वेगवेगळ्या देशांतून एव्हरेस्ट सर करण्यासाठी आलेली मंडळी दिसली. त्यांच्यासोबत काही फोटो काढून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.एव्हरेस्ट बेस कँपचा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करून दुपारी बारा वाजता गोरक्षेपहून निघून संध्याकाळी चार वाजता फेरीचेला पोहोचलो. एका दिवसात एकूण २० किलोमीटरचा टप्पा पार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी फेरीचेवरून आठ वाजता निघालो. संध्याकाळी सहा वाजता बेनकरला पोहोचलो. दहा तासांत एकूण ३६ किलोमीटरचं अंतर पार केलं. पुढच्या सकाळी बेनकरवरून निघालो. दुपारी बारापर्यंत लुकलाला पोहोचलो. तेरा दिवसांत एकूण १२६ किलोमीटरचं अंतर पार केलं. अतिशय अवघड रस्ता आणि सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करत हा ट्रेक आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला.शेवटी एकच सांगावंसं वाटतं. तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होणार की नाही हे हिमशिखरंच ठरवतात. आपल्या हातात फक्तआणि फक्त प्रयत्न करणंच असतं. पण प्रयत्नांती तिथपर्यंत पोहोचलात तर तो अनुभव अतिशय विलक्षण, आयुष्यभर मनात घर करून बसणारा असतो.--------------------------