संपादकीय
इतिहासपूर्व काळातल्या दस्तावेजांपासून ते जगभरातल्या नामवंतांच्या हस्ताक्षरांपर्यंत आणि एरवी नुसतेच दगडधोंडे म्हणून किंवा आता कालबाह्य झालेल्या जिनसा म्हणून मोडीत काढता येतील अशा वस्तूंपासून ते कोणी लोकोत्तर व्यक्तींनी कधीकाळी वापरलेल्या जिनसांपर्यंतच्या असंख्य वस्तूंचे संग्रह करणारी मंडळी जगभर असतात. आयुष्यभराचं असिधारा व्रतच ते त्यांचं. हे असं अजब व्रत त्या त्या मंडळींच्या गावच्या सांस्कृतिक संचितात मोलाची भर घालत असतं.
एखाद्या गावाची सांस्कृतिक श्रीमंती दर्शविणारे काही मापदंड असतात. त्या गावाचं समाजजीवन समृद्ध करणारी प्रत्येक परंपरा त्या मापदंडांचा भाग असते. त्यात असे व्रतस्थ संग्राहक आणि त्यांच्या प्रयत्नांमधून उभ्या राहणाऱ्या संग्रहालयांचा समावेश अवश्य करावा लागेल.
संस्कृतीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याचं कुतूहल असणाऱ्या कोणालाही –वय, शिक्षण, कुवत वगैरेंच्या पलीकडे नेत गुंतवून ठेवणारी जी काही थोडी ठिकाणं असतात, त्यात माणसाचा भवताल विविधांगांनी मांडत जगण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेणारी ही वस्तुसंग्रहालये असतातच. सौंदर्याच्या कल्पनांसह जगण्याच्या पद्धतींपर्यंत अनेक मानवी पैलूंचा आलेख मांडत असतात ही संग्रहालयं.