सुहास किर्लोस्करसंगीतामधील बारकावे जाणून घेणे हा माझा ध्यास आहे. छंद हा फावल्या वेळेत करावयाचा असतो म्हणून संगीत हा माझा छंद नाही, अशी माझी धारणा आहे. याच ध्यासामधून संगीतविषयक लेखमाला लिहिल्या गेल्या, आणि त्याचे नंतर गाता रहे... या पुस्तकामध्ये रूपांतर झाले....हम और तुम, तुम और हम, खुश है युं आज मिल के... या गाण्यातले पॉझ किती चपखलपणे वापरले आहेत, असे मला ते गाणे ऐकताना वारंवार वाटायचे. देखिये साहिबों वो कोई और थी, और ये नाज़नीं है मेरी, मैं इनपे मरता हूँ... हे गाणे सलग गायले नसल्यामुळे त्यामध्ये वेगळी गंमत आहे, असे मला वाटायचे. त्याला स्टकॅटो म्हणतात, हे मला नंतरच्या अभ्यासात समजले. कोणत्याही गाण्यामध्ये कोणते वाद्य वाजले आहे, याची मला उत्सुकता असते. संगीतकार तेच वाद्य का निवडतात? असा माझा प्रश्न असायचा, अजूनही असतो. कोणते वाद्य वापरायचे, याचा निर्णय संगीत संयोजक संगीत दिग्दर्शकाच्या सल्ल्याने घेत असतो, हे अधिक माहिती मिळवताना समजले. मन तड़पत हरि दर्शन को आज.. हे गाणे दूरदर्शनवर लाइव्ह सादर झाले होते, तेव्हा संगीतकार नौशाद, गायक मोहम्मद रफी यांच्यासमोर कसले हातवारे करत आहेत, हा प्रश्न मला पडला होता. त्यानंतर समजले, की खरेतर संगीत संयोजक (म्युझिक अॅरेंजर) हे काम करत असतात. नौशाद यांनी संगीत संयोजक न ‘दाखवता’ स्वतः हातवारे करण्याचा अभिनय केला. जिंदगी का सफर हे गाणे किशोर कुमारने दूरदर्शनवर गायले होते, तेव्हाही किशोरच्या शेजारी उभे राहून कल्याणजी-आनंदजी यांनी असेच हातवारे केले होते. ते त्यांचे काम नव्हेच, हा साक्षात्कार नंतर झाला.चित्रपट बघताना आपल्या काही ठाम धारणा तयार झालेल्या असायच्या, उदाहरणार्थ, अॅकॉर्डियन हिंडत-फिरत वाजवता येते किंवा नायिकेच्या आलिशान घरी पियानो असतोच वगैरे. संगीत कान देऊन ऐकू लागलो आणि भ्रमाचा भोपळा फुटण्यास सुरुवात झाली. बचना ऐ हसीनो गाण्यामध्ये या ऋषी कपूरने ज्या पद्धतीने ट्रम्पेट वाजवण्याचा अभिनय केला होता, ते बघून असे वाटायचे, की ऋषी कपूरला अनेक वाद्ये वाजवता येतात. ऋषी कपूरच्या आत्मचरित्रामध्ये याचा उलगडा झाला आणि समजले की त्याने उत्तम अभिनय केला आहे. हिरो चित्रपट बघितल्यावर बासरी वाजवणे किती सोपे, पैशासाठी युवतीला किडनॅप करणाराही बासरी सहज वाजवू शकतो, असे वाटले होते. लाखो है यहां दिलवाले गाण्यामध्ये विश्वजीतने गिटार ज्या पद्धतीने वाजवली आहे, ते बघता गिटार खेळणे वाटते. पण नंतर लक्षात आले की या गाण्यात एका गिटारवर रिदम वाजतो आणि एका गिटारवर एक ट्यून वाजते. त्यापूर्वीची म्हणजे ब्लॅक ॲण्ड व्हाइट काळातील गाणी बघितल्यावर कोणतेही वाद्य हातात ‘कसे धरू नये’, याचे प्रशिक्षण मिळते. .घरोघरी रेडिओ सिलोन आणि विविध भारती दिवसभर कंठशोष करत राहायचे, त्या काळातला माझा जन्म. ‘कंठशोष’ हा शब्द वापरला, कारण माझ्या जन्मगावी कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात रेडिओ हा ‘पब्लिक रेडिओ’ होता. घरोघरी रेडिओ असा लावायचे, जेणेकरून जवळपास राहणाऱ्या सर्वांना तो ऐकू गेला पाहिजे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहापर्यंत मोठ्या आवाजात सगळीकडे रेडिओ लावलेला असायचा. त्यामुळे जुनी-नवी सर्व प्रकारची गाणी ऐकली, ऐकावी लागली.प्रत्येकाला आपल्या कॉलेजच्या काळातली गाणी विशेष प्रिय असतात. त्या नियमानुसार मला १९८०च्या आसपास प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील गाणी विलक्षण आवडत होती. कॉलेज शिक्षणानंतर नोकरीच्या निमित्ताने साताऱ्यात वास्तव्य होते. मैत्रिणीला खूश करून तिला लग्नाची मागणी घालावी, असा लांबचा विचार करून तिची आवड असलेल्या शास्त्रीय संगीतामध्ये रुची दाखवण्यास सुरुवात केली. चित्रपटातील गाणी कोणत्या रागावर आधारित असतील याचा शोध घेण्याचा नाद लागला. ‘ईप्सित’ साध्य झाल्यावर, म्हणजे लग्न झाल्यावर, तबला शिकण्यास सुरुवात केल्यामुळे गाण्यामधला ताल-लय-तालाचे प्रयोग समजून घेण्याची आवड निर्माण झाली. २०००नंतर पुण्यामध्ये आल्यावर संगीत क्षेत्रातील अनेक कवाडे खुली झाली. वेगवेगळे कार्यक्रम अगदी पहिल्या रांगेमध्ये बसून ऐकणे, वेगवेगळी वाद्ये, त्यामधले बारकावे समजून घेऊ लागलो. १९९०पासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाकरिता पुण्यात येतच होतो. आता तर पुण्यात बदली झाल्यामुळे संगीत विषयक अनेक कार्यक्रम ऐकण्याचा सपाटा लावला. काही कार्यक्रमांमध्ये चित्रपटातील गाणी सादर करताना त्यातले बारकाव्यांबद्दल कोणी बोलत नाही, गायक-गायिकांची नावे, संगीतकार-गीतकाराची नावे यापलीकडे कलाकारांचे खासगी जीवन याबद्दल अधिक बोलले जात आहे, असे कालांतराने लक्षात आले. यामधून ‘गाता रहे मेरा दिल’ या कार्यक्रमाची कल्पना सुचली. .संगीत समजून ऐकण्यासाठी एखादा कार्यक्रम घरी आयोजित करावा असे मी आणि माझी पत्नी निशा यांनी ठरवले. घरातल्या हॉलमध्ये आसनव्यवस्था बदलून काही बदल केल्यास चाळीस रसिक सहज बसू शकतात असे वाटले. मग १६ जून २०१६पासून ‘गाता रहे...’ कार्यक्रम घरी सुरू झाला. गाणी ऐकणे, त्याविषयी आपल्याला असणारी माहिती सांगणे, गप्पांच्या माध्यमातून गाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून ऐकणे, असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. पहिला कार्यक्रम होता, ‘नांदीपासून भैरवीपर्यंत गाणी’. गाण्यातले उस्ताद, स्केल चेंज केलेली गाणी, गाण्यातले पॉज अशा विषयांवर गाणी सादर करता करता रसिक श्रोत्यांनाही मी बोलते केले. डॉ. दत्ता कुंभार वेगवेगळी वाद्ये लीलया वाजवतात. त्यांचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमामध्ये डॉ. कुंभार यांनी रसिक श्रोत्यांशी संवाद साधून त्यांच्या समक्ष एका गझलला चाल लावली. प्रख्यात निवेदक आनंद देशमुख यांनी मराठी गाण्यांचे विश्लेषण केले, विराज पाध्ये यांनी यॉडलींग हा विषय अभ्यासपूर्णरितीने मांडला. ओ.पी. नय्यर यांच्या गाण्यावर आधारित कार्यक्रम प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी सादर केला, त्यावेळी अनेक रसिकांनी उभे राहून कार्यक्रम ऐकला.अशाच एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या अमित गद्रे यांनी या विषयावर लिहिण्यास सुचवले. जानेवारी २०१७पासून दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये लेखमाला सुरू झाली. प्रसंगानुसार गाण्याची चाल कशी तयार केली जाते आणि त्या अनुषंगाने वाद्यांची निवड कशी केली आहे, याबद्दलच्या लेखावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम... या गाण्यामधील वाद्यांविषयीचे बारकावे वाचकांना आवडले. लिखाणाला मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता.एखाद्या विषयामध्ये आपण जितकी माहिती घेत राहतो, तितके बारकावे कळत राहतात आणि आपल्याला माहीत नसलेले जग समोर दिसू लागते. त्यामुळे त्या विषयातील वादक-संगीतकार-संगीत संयोजक अशा पडद्यामागील कलाकारांना भेटून त्यातले बारकावे समजून घेण्याचे ठरवले.जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना त्यांच्या अनोख्या वाद्यांविषयी कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली. त्यांनी रसिक श्रोत्यांशी गप्पा मारताना उत्तम कार्यक्रम सादर केला. जलतरंग वादन करण्यापूर्वी वेगवेगळ्या बाऊलमध्ये किती पाणी भरून ती भांडी सुरात कशी लावायची याचे प्रात्यक्षिक बघितल्यानंतर जलतरंग वादनाच्या अनेक वादकांना कार्यक्रम करण्याची विनंती करून त्यांना बोलते करणे, याची मला ‘चटक’ लागली. .जेंबे या वाद्याची माहिती घेण्यासाठी मिलिंद तुळाणकर यांच्या सहकार्याने तौफिक कुरेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि एक तास वेळ राखून ठेवला. त्यांचे बंधू उस्ताद झाकीर हुसेन यांनी तौफिक कुरेशी यांना पहिला जेंबे आणून दिल्याचे समजले होते. तबला वादनातील बारकावे माहीत असल्यामुळे लय-ताल याविषयी काही प्रश्न तपशिलात विचारल्यावर तौफिकजी म्हणाले, तुम्ही मुलाखतीसाठी तयार केलेले प्रश्न वाटत नाहीत. दिल चाहता हैमधील रिदम त्यांना म्हणून दाखवला आणि विचारले की दुःखी गाण्याला असा रिदम वाजवण्याचे त्यांना कसे सुचले? या प्रश्नावर त्यांनी ‘रिदम अरेंजमेंट’ म्हणजे ‘ताल-संयोजन’ याबद्दल त्यांनी केलेल्या कामाविषयी माहिती सांगितली. यावर त्यांना मारुती कीर यांच्याविषयी आणि राहुल देव बर्मन यांच्या रिदम पॅटर्नबद्दल विचारल्यावर ते बोलते झाले. एक तास होऊन गेला होता म्हणून त्यांना वेळेबद्दल विचारले. यावर तौफिक कुरेशी म्हणाले, “प्रश्न चांगले विचारत आहात, वेळेचा विचार करू नका.” अशा पद्धतीने जेंबेविषयी माहिती घेता घेता ताल-संयोजनावर सविस्तर चर्चा झाली आणि एक तासाची मुलाखत तीन तास रंगली.सन २०२१मध्ये संगीत संगत ही लेखमाला लिहिण्याची संधी मिळाली. त्यासाठी डॉ. कुंभार यांच्याकडे की-बोर्ड शिकण्यास सुरुवात केली. अर्थात माझा हेतू वादन शिकण्यापेक्षा त्यातले बारकावे समजून घेण्याचा होता. गिटार, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, इसराज, सारंगी अशी अनेक वाद्ये डॉक्टर दत्ता वाजवतात. त्यामुळे त्या संदर्भात नवनवे प्रश्न घेऊन जायचे, थोडा वेळ की-बोर्ड शिकायचा आणि बराच वेळ संगीतविषयक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असा उद्योग सुरू झाला. डॉक्टर दत्तांमुळे सॅक्सोफोन वादक सुरेश यादव यांचा परिचय झाला आणि त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही दोघे मुंबईला गेलो. सी. रामचंद्र ते लक्ष्मीकांत-प्यारेलाल, अनिल-अरुण अशा अनेक संगीतकारांच्या गाण्यांमध्ये सुरेश यादव यांनी सॅक्सोफोनवादन केले असल्यामुळे त्यांच्याकडून अनेक हिंदी-मराठी गाण्यांमधले बारकावे समजले. त्यांच्यामुळेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार द्वयीमधील प्यारेलाल शर्मा यांचा परिचय झाला. व्हायोलीन वादन, संगीत संयोजन आणि संगीत दिग्दर्शन अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्यारेलाल शर्मा यांच्याकडून मिळाली. .`लोग आते गये, कारवां बनता गया’, या उक्तीची प्रचिती मला येत गेली आणि मिलिंद रायकर-अमर हळदीपूर (व्हायोलिन), अनिल पेंडसे-प्रदीप्तो सेनगुप्ता (मेंडोलीन), बर्जोर लॉर्ड (झायलोफोन), अर्शद खान (इसराज), दिलशाद खान (सारंगी), किशोर सोढा (ट्रम्पेट) यांच्याशी संवाद साधला आणि त्या कलाकारांच्या वाद्यांबद्दल माहिती घेतली. चित्रपटातील संगीत दिग्दर्शन या विषयावर राहुल रानडे यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून थिएटरमधील साउंड सिस्टीम कशी बदलत गेली, त्यामध्ये एकेक स्पीकर कसे वाढत गेले, फॉली म्हणजे काय, पार्श्वसंगीत देताना साउंड इफेक्ट कसा तयार केला जातो अशा बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या. नकुल जोगदेव यांना भेटून त्यांचे क्लासिक पियानो वादन ऐकल्यावर चित्रपटात दिसणारे पियानो वादन कसे फसवे असते ते समजले.पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य दिलीप काळे यांची भेट सतीश पाकणीकर यांच्या सौजन्याने झाली आणि दिलीप काळे यांनी घेतलेली त्यांच्या गुरूंची जाहीर मुलाखत बघता एेकता आली. पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये पं. शिवकुमार शर्मा यांनी अनेक गाण्यांमधील संतूरमधले बारकावे समजावून सांगितले होते, ते अनुभवता आले. संतूरच्या तारांइतक्याच माझ्या प्रश्नांना दिलीप काळे यांनी उत्तरे दिल्यामुळे संतूरप्रमाणेच अनेक वाद्यांमधील बारकावे समजून घेता आले.राहुल देव बर्मन यांनी अनेक गाण्यांमध्ये ‘स्केल चेंज’ केले आहे. पाश्चात्त्य संगीत प्रकारामधील स्केल चेंज लिहिताना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील मूर्च्छना याविषयी पंडित संजीव अभ्यंकर यांच्याकडून जाणून घेतले. विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्याबरोबर सहगायन करतानाचा त्यांचा ‘जसरंगी जुगलबंदी’ हा कार्यक्रम मी ऐकला होता.तालवाद्यांवरील लेख ड्रमशिवाय अपूर्ण राहिला असता. ओ.पी. नय्यर यांच्यापासून आर.डी. बर्मन यांच्या अनेक गाण्यांमध्ये ड्रमचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे फ्रांको वाझ यांना भेटण्यासाठी मुंबईला गेलो आणि शालीमारच्या टायटल साँगमधील अकरा मात्रांचा ड्रम, तिसरी मंजिल चित्रपटात लेस्ली गुडीन्हो यांनी वाजवलेला ड्रम अशा अनेक गोष्टी उलगडत गेल्या. ओ.पी. नय्यर यांनी अनेक गाण्यांत संतूरच्या जोडीने ड्रम वापरला आहे. अशा वेळी ड्रम ब्रशने वाजवला जातो, हे समजले. .Share Market : भाव आता सावरले असले तरी शेअर बाजारात दहशत कायम.या सगळ्या माहितीमधून लेखमाला रंगत गेली. लेखमालेतील लेखांचे पुस्तक करावे असा सल्ला अनेक वाचकांनी दिला. पुस्तकाला एक प्रवाही स्वरूप असावे आणि उद्देश असावा यासाठी काही लेख नव्याने लिहिले. वृत्तपत्रात शब्दमर्यादा असल्यामुळे राहून गेलेल्या काही तपशिलांचा अंतर्भाव पुस्तकातील लेखांमध्ये करता आला. मुखडा नसलेली गाणी, बोसा नोवा, रवींद्र संगीताचे माधुर्य, एकाच गाण्यात दोन चाली, असे काही अनवट लेख या चित्रपट संगीताच्या लेखनाची फलश्रुती आहे. पुस्तक तयार करताना त्यामध्ये अनेक क्यूआर कोड असतात, परंतु वाचकाला प्रत्येक वेळी असे क्यूआर कोड स्कॅन करावे लागू नयेत याकरिता ब्लॉगवर लेखाच्या क्रमाने प्ले-लिस्ट तयार केल्या आणि ब्लॉगची लिंक पुस्तकामध्ये दिली. बँक आणि त्यानंतर आयटी क्षेत्रात करिअर केल्यामुळे मनातले विचार वेगाने मी लॅपटॉपवर उतरवू शकतो, त्याचाही उत्तम उपयोग करून घेता आला. इतक्या वर्षांत सवाई गंधर्व महोत्सवासारख्या अनेक संगीत कार्यक्रमामध्ये मी काढलेल्या छायाचित्रांचा अंतर्भाव पुस्तकामध्ये करता आला, त्याचप्रमाणे सतीश पाकणीकर यांच्याकडून सात छायाचित्रे त्यांची रीतसर परवानगी घेऊन पुस्तकामध्ये घेतली. संगीत आणि चित्रपट आस्वादकाची भूमिका निभावताना ‘जे जे आपणास ठावे, ते ते दुसऱ्यासी सांगावे’ एवढाच माझा प्रयास आहे. तो प्रयास वाचताना वाचकाला ‘गाता रहे...’ असे वाटले तर ‘घी में शक्कर’!--------------------------.गंगा नदी स्वच्छता मोहीमेत १२-१३ वर्षात मंजूर निधीपैकी फक्त २१ टक्के रक्कम खर्च; गंगेचा इतका भाग सर्वात प्रदूषित! .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.