काय? बांधकाम या विषयावरही भारतात होते संशोधन? जाणून घ्या कोणत्या संस्थेत होतो हा अभ्यास

संकेतस्थळावरील वार्तापत्रे, अहवाल वाचल्यास या बांधकाम विषयाचा प्रचंड आवाका लक्षात येतो
National Council for Cement and Building Materials
National Council for Cement and Building Materialsesakal
Updated on

सुधीर फाकटकर

बांधकामाचे तंत्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आधुनिक कालखंडाला सामोरे जाताना सिमेंट, सिमेंट निर्मितीसाठी आवश्यक असलेले पदार्थ, या पदार्थांच्या खाणी तसेच निसर्गातील उपलब्धता याचबरोबरीने अवजड बांधकामांसाठी गरजेचे असलेले तंत्रज्ञान असे अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

या अनुषंगाने आपल्या देशात औद्योगिक उपयोग आणि रहिवासी क्षेत्रातील बांधकामांसाठी सिमेंट आणि तत्सम पदार्थ, बांधकाम साहित्य, बांधकाम कार्यपद्धती आणि गुणवत्ता तसेच संबंधित पर्यावरणीय मुद्दे इत्यादींवर शास्त्रीय संशोधन करण्याकरिता केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत १९६२मध्ये तत्कालीन पंजाबमध्ये (आताच्या हरियानातील) बल्लभगड या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय सिमेंट आणि बांधकाम साहित्य केंद्राची (National Council for Cement and Building Materials -NCB) स्थापना करण्यात आली.

शास्त्रीय संशोधनाबरोबरच या क्षेत्रातील सुलभ तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचेही कार्य ही परिषद करत आहे.

परिषदेअंतर्गत सिमेंट संशोधन आणि तपासणी, बांधकामाशी संबंधित खणन कार्य-पर्यावरण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि संचलन, बांधकाम विकास आणि संशोधन, गुणवत्ता व्यवस्थापन-प्रमाणिकरण, औद्योगिक माहिती व शिक्षण ही स्वतंत्र संशोधन केंद्रे आहेत.

यातील सिमेंट संशोधन आणि तपासणी केंद्रात सिमेंटसाठी पायाभूत पदार्थ असलेल्या चुनखडीवर विशेष संशोधन करत पारंपरिक सिमेंटच्या तुलनेत अधिक गुणवत्ता साध्य करण्यात आली आहे.

देशातील वीज प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या राखेवर तसेच कारखान्यांमधून निर्माण होत असलेल्या मळीसदृश्य पदार्थांवरही संशोधन करत त्या पदार्थांचा सिमेंट निर्मितीसाठी कसा उपयोग करता येईल यावरही खास संशोधन केले आहे.

याखेरीज भट्ट्यांसाठी उच्च दर्जाची मृत्तिका विकसित करण्यातही परिषदेने यश मिळवले आहे. खणन कार्य-पर्यावरण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि संचलन केंद्राने बांधकामादरम्यान धुळीच्या नियंत्रणापासून अंतिम बांधकाम तपासण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तसेच अचूक तपासणी प्रणाली विकसित केलेली आहे.

बांधकाम विकास आणि संशोधन केंद्राने प्रगतिपथावर असलेले उड्डाणपूल, धरणे, विद्युतशक्ती वहनासाठी आवश्यक असलेली बांधकामे, सरकारी इमारती तसेच औद्योगिक बांधकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्माण केली आहेत.

गुणवत्ता व्यवस्थापन-प्रमाणिकरण केंद्रामध्ये बांधकामाशी संबंधित एकूणएक पदार्थाची तपासणी करण्याचे नियम आणि तंत्रे विकसित केली आहेत.

औद्योगिक केंद्राकडून परिषदेत होणाऱ्या संशोधन आणि विकसित तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने नियमितपणे चर्चासत्रे, कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

बांधकाम क्षेत्राशी संबंधित अभियंत्यांसाठी लघु मुदतीचे प्रशिक्षण, विशेष पदविका अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवीनंतरचा विशेष अभ्यासक्रम तसेच कामगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम या संस्थेत राबवला जातो.

बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणीही विशेष प्रशिक्षणही घेतले जाते. याशिवाय इथे बांधकामाशी निगडित अभियंते, तंत्रज्ञ आणि कारागिरांना कार्यक्षेत्र आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. संस्थेने बांधकाम विषयात शेकडो संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.

संकेतस्थळावरील वार्तापत्रे, अहवाल वाचल्यास या बांधकाम विषयाचा प्रचंड आवाका कळेल. बल्लभगड प्रमाणेच या परिषदेची हैदराबाद, अहमदाबाद आणि भुवनेश्वर येथेही विभागीय केंद्रे आहेत.

राष्ट्रीय सिमेंट आणि बांधकाम साहित्य परिषद

३४ किलोमीटर दगड, दिल्ली-मथुरा मार्ग (राष्ट्रीय महामार्ग २),

बल्लभगड, हरियाना, 121004

संकेतस्थळः https://www.ncbindia.com

----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.