कॅम्प साइट दिसेनाशी झाल्यावर थांबलो आणि आमच्याकडचे टॉर्चही बंद केले. चहूबाजूला नुसताच काळोख, शेजारी कोण उभं आहे हेसुद्धा कळू नये इतका, सोबतीला फक्त रातकिड्यांचा आवाज.
भोवताली माळरानं, छोट्यामोठ्या टेकड्या. वर निरभ्र चांदण्यांनी लगडलेलं आकाश. शहरांमध्ये चांदण्या इतक्या स्वच्छ दिसतात कुठं?
इरावती बारसोडे
पुन्हा एकदा आमचा सूर्यास्त चुकला होता. थंडी क्षणोक्षणी वाढत होती. रेलिंगच्या पलीकडे खाली कोकण दिसतं हे ऐकून माहीत होतं, पण धुक्यामुळं समोरचं खरंतर काहीही दिसत नव्हतं. त्यात अंधारानं आसमंत कवेत घ्यायला सुरुवात केली होती.
पण तरीही आम्ही सगळे तिथंच त्या कोकणकड्यावर बसलो होतो, अगदी गुपचूप, एकमेकांपासून दूर... ती निरव शांतता अनुभवत! ना माणसांचा बोलण्याचा आवाज, ना गाड्यांचा, ना कुठल्या यंत्रांचा आवाज; दिव्यांचा झगमगाटही नाही... सारं कसं शांत शांत...
ही अशी शांतता मला त्या तीन दिवसांत खूपदा अनुभवता आली. निमित्त होतं एका नेचर कॅम्पचं -इकोटूरचं. खास मुलांसाठी आयोजित केलेल्या भंडारदरा इकोटूरला व्हॉलेंटिअर म्हणून येण्याची विचारणा झाली आणि मी एका पायावर तयार झाले.
तशीही ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. दिवाळीनंतरचे तीन दिवस काय करायचं हा प्रश्न आपोआप सुटला होता.
पुण्याहून लवकर निघालो तरी अंतर बऱ्यापैकी असल्यामुळे प्रवासात अर्धा दिवस तरी जाणार होताच. भंडारदऱ्यातल्या उडदावणे गावात कॅम्प साइट होती. पोहोचेपर्यंत सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. दोघंजण मुंबईहून थेट आली होती.
काहींना आम्ही वाटेत घेतघेत गेलो. पुणे, सातारा, नगर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या या मुलांची एव्हाना थोडीफार ओळख झाली होती. मुंबईहून आलेल्या दोघांनाही त्यांनी सहज आपल्यात सामावून घेतलं.
पुढच्या दोनेक दिवसांत त्यांची मैत्री आणखी घट्ट होत गेली, अगदी जिवाभावाचे मित्रच जणू. इयत्ता तिसरी ते सेकंड ईयर अशा वयोगटातल्या या मुला-मुलींचं एकमेकांबरोबर अगदी छानच जमून गेलं. मोठी मुलं आपसूकच छोट्यांची ताई-दादा झाली.
जेवणं झाल्यावर तंबू लागेपर्यंत हा कॅम्प कशासाठी आहे आणि आपण इथं का आलोय, हे मुलांना नीट समजावून सांगण्यात आलं. आपला निसर्ग आणि वारसा समजून घ्यायचा, काहीतरी नवीन एक्सायटिंग शिकायचं, हा या कॅम्पचा उद्देश होता.
या तीन दिवसांत मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त कॅमेरा म्हणूनच झाला, कारण कोकणकडा आणि कळसूबाई सोडलं तर बहुतांश वेळा रेंज शून्य! रेंज नसल्यामुळे मोठी मुलं थोडी अस्वस्थ झाली खरी, पण नव्या मित्र-मैत्रिणींबरोबर वेळही इतका मजेत चालला होता, की मोबाईलला रेंज नाही हे काही काळापुरतं का होईना विसरून जात होती.
पहिल्या दिवशी दुपारनंतर आम्ही रतनवाडीचं प्रसिद्ध आणि प्राचीन अमृतेश्वर मंदिर पाहायला गेलो. त्या भागात अंजनाची झाडं खूप दिसतात. मंदिराच्या बाहेरही आहेत. अंजनाचं पान सूर्यप्रकाशात नजरेसमोर धरलं की त्याच्या कडा चमकतात... मुलांबरोबर माझ्याही ज्ञानात भर पडत होती.
मंदिर सुंदरच होतं. पाहत राहावं असं. १२व्या किंवा १३व्या शतकात बांधलेलं आहे. गाभाऱ्यातलं शिवलिंग खडकाच्या पोकळीत आहे. मंदिरावरील कोरीवकामही विलक्षणच. त्यामध्ये विविध वाद्य वाजवणारे वादक शोधायचे आणि ते कोणतं वाद्य वाजवतायत हेसुद्धा ओळखायचं काम मुलांना दिलं होतं.
मुलं छान रमली. फक्त वादकच नाही, इतरही अनेक शिल्प त्यांनी ओळखली, अगदी ‘मेकअप’ करणारी (मोठ्यांच्या भाषेत शृंगार करणारी) स्त्रीसुद्धा. मंदिराजवळच पुष्करिणी आहे. खाली उतरायला तीन बाजूंनी पायऱ्या आहेत. पुष्करिणीच्या काठावर बसून तिथं पाणी कुठून येत असावं यावर चर्चा झाली.
तिथून पुढं कोकणकड्यावर सूर्यास्त पाहायला जायचं होतं, पण वाटेतच सूर्य मावळायला लागला होता. कोकणकड्यावर पोहोचेपर्यंत तर अगदी व्यवस्थित अंधार पडला होता. भरीस भर म्हणून गार वारं झोंबू लागलं होतं. दुपारी ऊन असल्यामुळे सगळेच टोप्या, जॅकेट तंबूत ठेवून निघाले होते.
त्यामुळं त्या कड्यावर जाळीतून पलीकडे जे काही लाइट दिसत होतं आणि सर जे काही सांगत होते, ते सारं अक्षरशः हाताच्या घड्या घालून मुलं ऐकत होती. अचानक कोणाच्यातरी लक्षात आलं, अरे रेंज आली.
झालं, सगळ्यांची घरी फोन करण्याची गडबड उडाली. ज्यांच्याकडे फोन नव्हते, त्यांनी कुठल्यातरी ताई-दादाचा किंवा आमचा फोन घेऊन घरी फोन लावले. रेंजमुळे काही वेळासाठी विस्मरणात गेलेली थंडी पुन्हा डोकं वर काढू लागली, तशी सगळ्यांनी काहीही न सांगता बसची वाट धरली.
दुसरा दिवस होता कळसूबाईचा. भल्या पहाटे, अगदी साडेपाचला मुलांना उठवलं. काही उत्साही छोटी मंडळी सहा वाजल्यापासून ‘निघायचं का? का थांबलोय आपण?’ म्हणत पाठीवर सॅक अडकवून तयार होती. कळसूबाईच्या पायथ्याशी नाश्ता केला आणि आठच्या सुमारास चढाई सुरू केली.
तिसरी आणि पाचवीतली मुलंसुद्धा बिनधास्त सगळ्यांच्या पुढे चढत होती. मी काही कारणास्तव पूर्ण वरपर्यंत जाऊ शकले नाही, निम्म्यातून परतले आणि बसपाशी येऊन थांबले. साडेअकरा वाजता सगळे वर पोहोचल्याचा मेसेज आला. परतायला त्यांना किमान चार वाजणार हे निश्चित होतं. सारे वरच जेवणार होते.
बराच वेळ मला एकटीला थांबायचं होतं. पण मला एकटं वाटलंच नाही, कारण आमची बस ज्या हॉटेलपाशी उभी होती, तिथं ट्रेकर्सची सतत ये-जा सुरू होती. त्यांचं निरीक्षण करत, गाणी ऐकत दुपार आरामात निघून गेली. अखेर आमच्या ग्रूपमधल्या दोघी थकूनभागून येताना दिसल्या. बस दिसल्यावर पळत आलो म्हणाल्या.
पाठोपाठ एकेकजण दिसू लागला. ताई मी जोरात पडलो, असं म्हणून एका छोट्या मित्रानं टीशर्ट वर करून जखम दाखवली. तू का आली नाहीस विचारत किती मज्जा आली ते प्रत्येकजण रंगवून सांगू लागला.
शेवटचे वीर आल्यावर आम्ही लगेचच कॅम्प साइटकडे निघालो. सगळेच इतके दमले होते, की आता आणखी एकही क्षण थांबायची कोणाची तयारी नव्हती. जेमतेम अर्ध्या तासाचा रस्ता. खिडकीतून वारं येऊ लागलं, तसं सगळ्यांच्या माना कलंडल्या आणि मुलं झोपेच्या आधीन झाली.
अपवाद एकाचा. तिसरीत शिकणाऱ्या त्या छोट्याकडे एवढी एनर्जी येते कुठून याचं मला राहून राहून नवल वाटत होतं. पूर्ण रस्ताभर तो एकटाच अखंडपणे वर काय काय केलं, काय बघितलं, काय जेवलो, कुठले दगड गोळा केले, माझी बाटली कशी फुटली याचं रसभरीत वर्णन मला सांगत होता.
हा मुलगा आत्ता कळसूबाई चढून-उतरून आलाय हे कोणाला सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं. बसमधल्या त्या पॉवर नॅपनंतर सगळ्यांना जरा हुशारी आली. कॅम्प साइटवर बंधारा घालून केलेला छोटासा तलाव होता.
त्यात डुंबण्याची परवानगी दिल्यावर तर सगळीच खूश झाली. काहीजण यथेच्छ डुंबले, काही नुसतेच पाण्यात पाय घालून बसले. पाणी छान गार होतं. नुसते पायाचे तळवे बुडवूनसुद्धा इतकं फ्रेश वाटलं म्हणून सांगू.
आज पुन्हा कोकणकड्यावर जायचं होतं, कालचा चुकलेला सूर्यास्त बघायला. पण जरा उशीरच झाला. आणि वेळेत पोहोचलो असतो, तरीही धुक्यामुळे सूर्य दिसला नसताच. गार वारं होतंच. कालच्या धड्यातून सगळ्यांनी थंडीची आयुधं बरोबर आणली होती.
तिथं बसून मोसमी वारे, कोणते वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात, पावसाचं प्रमाण कमी-जास्त का होतं यावर गप्पा मारल्या. सरांनी मुलांच्या शंकांचं निरसन केलं.
आता अनुभवायची होती शांतता. एकमेकांपासून दूर शांत बसून डोळे मिटून कान उघडे ठेवायचे होते. खरंच अनोखा अनुभव होता तो. पण त्याहूनही विलक्षण होती कॅम्प साइटवरची रात्रीची शांतता. दोन्ही रात्री आम्ही नाइट ट्रेलवर गेलो.
नाइट ट्रेल म्हणजे काय, तर रस्त्यावरून अंधारातून थोडंसं चालत गेलो. कॅम्प साइटचा प्रकाश दिसेनासा झाल्यावर थांबलो आणि आमच्याकडचे टॉर्चही बंद केले. चहूबाजूला नुसताच काळोख, शेजारी कोण उभं आहे हेसुद्धा कळू नये इतका, सोबतीला फक्त रातकिड्यांचा आवाज. भोवताली माळरानं, छोट्यामोठ्या टेकड्या. वर निरभ्र चांदण्यांनी लगडलेलं आकाश.
शहरांमध्ये चांदण्या इतक्या स्वच्छ दिसतात कुठं? थोडंफार आकाशनिरीक्षण करून आम्ही परतलो. पहाटे आणि रात्री गारवा प्रचंड असल्यामुळे शेकोटी पेटवलेली असायची. त्याभोवती मांड्या ठोकून गप्पांचा फड रंगायचा.
आज तर मुलांना जागायची परवानगी दिली होती. वाटलं होतं कळसूबाईवर जाऊन आल्यामुळं थकली असतील. पण कुठलं काय, दोघं-तिघं सोडले तर सगळे नाइट ट्रेलहून आल्यावर पुन्हा शेकोटीभोवती जमले. दुसऱ्या दिवशी कळालं, त्यांच्या गप्पा खूपच रंगल्या आणि त्यांनी एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या होता. त्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली होती आणि आता शेवटचा दिवसच राहिला आहे, याची प्रकर्षानं जाणीव झाली होती.
तिसऱ्या दिवशी सांदण दरी पाहायची होती. सांदण दरीकडे वळण्याआधी तिथल्या पठारावरच्या गवताकडे सरांनी लक्ष वेधलं. वेगवेगळ्या प्रकारचं गवत तिथं होतं. वाटेत जमीन धूपल्याच्या खुणा शोधायला सांगितल्या. धूप झालेले दगड मुलांना लगेचच सापडले.
आता आम्ही निघालो सांदण दरीकडे. झाड-झुडपातून पायवाटेनं झाडं बघत आम्ही मोठाल्या दगडांचा खच पडलाय असं वाटावं अशा ठिकाणी पोहोचलो. तिथं मोठ्या खडकांच्या फटीतून पाण्याचा झरा वाहत होता. तिथून खाली उतरायचं होतं.
ही दरी म्हणजे अद्भुत भौगोलिक ठेवाच आहे. दोन्ही बाजूला उंचच उंच दगडांच्या भिंती, मधल्या चिंचोळ्या वाटेत भलेमोठे खडक, त्यातून अखंड वाहणारं पाणी... यातून पुढं जात राहिलो.
कधी उतरून, कधी चढून, कधी खडकांना लोंबकाळून, कधी खडकावर बसून, तर कधी पाण्यातून! काहीवेळा सपाट झालेल्या खडकांवरून सहज जाता येत होतं, तर कधी एकच पाय कसाबसा मावेल एवढीच वाट होती. कित्येकवेळा आधी दगडावर बसायचं, खाली पाय सोडायचे, ते टेकले तर ठीक, नाहीतर गुरुत्वाकर्षणाच्या भरवशावर स्वतःला झोकून द्यायचं, अर्थात खाली पक्का खडक आहे ना हे बघूनच.
घळीतल्या बऱ्यापैकी मोठ्या मोकळ्या जागेमध्ये मुलांना निरीक्षण करायला सांगितलं होतं. घळ कशी तयार झाली असेल, दगडामध्ये काही फरक दिसतोय का, सबंध घळीमध्ये त्या ठिकाणीच एवढी पोकळी का असेल या प्रश्नांची उत्तरं मुलांना गटागटाने शोधायची होती.
काही ठिकाणचा खडक ठिसूळ वाटतोय, काहीच खडकांना तीक्ष्ण कडा आहेत, बहुतांश सगळे दगड गुळगुळीत आहेत अशी निरीक्षणं जवळपास सगळ्यांनीच नोंदवली.
प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर आम्ही पुढे निघालो. गुडघ्याएवढ्या पाण्यातून जाताना-येताना मी आणि सर सोडून बाकी सगळे न भिजता, म्हणजे पाण्यात न पडता, पार गेले. परत जाताना दगडांवरून चढाउतरायची आता सवय झाली होती, त्यामुळे तुलनेनं पटकन वर आलो.
सांदण दरीच्या भेटीबरोबरच ही इकोटूर जवळपास संपलीच होती. आता फक्त जेवण आणि कन्क्लुडिंग सेशन राहिलं होतं.
त्यामुळं जेवताना मुलं जरा रेंगाळलीच. घाटघर धरणातून वीजनिर्मिती कशी होते, या भागातल्या गाई काळ्या-पांढऱ्या का, ठिकठिकाणी गवताच्या पेंड्या का बरं बांधून ठेवल्या असतील, या भागात कुठली झालं जास्त दिसतात, एकाच भागात गवताचे एवढे प्रकार कसे, झाडाला गाठी कशामुळे आल्या...
या तीन दिवसांत मुलांना असे अनेक प्रश्न पडले. त्यांना खूप काही नवीन शिकायला मिळालं होते. नवीन मित्र मिळाले होते. तीन दिवस खूप पटकन संपले होते. मुलांना घरी जायची इच्छा होत नव्हती, पण आता परतीच्या प्रवासाला निघावं लागणार होतं...
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.