Navratri :जाणून घ्या नऊरात्रीची पूजा आणि घटस्थापना विधींविषयी

devi
devi esakal
Updated on

दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व लोक भयग्रस्त झाले होते. धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णू व महेश ह्यांची आराधना केली. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून, तिचे पूजन केले. ह्या दिव्यशक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले.. नवरात्रामध्ये देवीच्या तीनही रूपांची म्हणजे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मीची पूजा करण्याने शक्ती, विद्या व धनसामर्थ्य प्राप्त होते.

ओंकार दाते

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत; तर त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळही असणे आवश्यक असते. या संदर्भाने आश्विन महिन्यात येणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.

महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर अनेक देवांना व मनुष्यांना त्राही त्राही करून सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व लोक भयग्रस्त झाले होते. धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णू व महेश ह्यांची आराधना केली.

देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवी शक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून, तिचे पूजन केले. तिला स्वतःच्या दिव्य आयुधांनी मंडित केले.

ह्या दिव्यशक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले. आसुरी वृत्तीला संपवून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवांना अभय दिले. ही शक्ती देवता म्हणजेच आपली दुर्गा, जगदंबा, कालीमाता होय. नवरात्राच्या दिवसांत देवीजवळ शक्ती मागावयाची व आसुरी वृत्तीवर विजय मिळवायचा.

devi
Shardiya Navratri 2023 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून आदिशक्तीचा जागर; उत्सवकाळात 'असा' चालणार महापूजेचा कार्यक्रम

नवरात्र / घटस्थापना

घटस्थापनेच्या दिवशी देवघरात आंब्याच्या पानांचे तोरण लावून, रांगोळी इत्यादीने देवघर सुशोभित करावे. कुटुंबातील सर्वांनी सचैल स्नान करावे. कर्त्याने धूतवस्त्र किंवा रेशमी वस्त्र नेसून देवासमोर बसून आचमन करावे. देशकाल कथन करून देवतेच्या नावाचा उच्चार करून संकल्प करून उदक सोडावे.

यामध्ये घटस्थापना, मालाबंधन, अखंड नंदादीप, सप्तशती पाठ, कुमारिका पूजन यापैकी जे जे करणार आहोत त्यांचा उल्लेख संकल्पात यावा. त्यानंतर महागणपती, कलश, शंख, घंटा यांचे पूजन करावे. देवीची पूजा करताना श्री सूक्ताने अभिषेक करावा. घटावर किंवा देवींवर रोज एक फुलांची किंवा कापसाची माळ बांधावी, त्याच ठिकाणी अखंड नंदादीप लावावा. रोज नैवेद्य दाखवावा.

नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो, पण काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुन्हा लावता येतो.

नवरात्रातील ललित पंचमी

आश्विन शु. पंचमीस ललिता पंचमीचे व्रत करतात. या व्रतात करंडकाचे स्वरूपात असलेल्या ललिता देवीची पूजा करावयाची असते. अठ्ठेचाळीस दूर्वांची एक जुडी याप्रमाणे ४८ जुड्या वाहावयाच्या असतात.

ललिता त्रिशती नामावली वाचायची असते. नवरात्रामध्ये सरस्वतीचेही पूजन करण्यास सांगितले आहे. नवरात्रामधील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाष्टमी (महालक्ष्मी) पूजन. या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे नवरात्रामध्ये देवीच्या तीनही रूपांची म्हणजे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मीची पूजा करण्याने शक्ती, विद्या व धनसामर्थ्य प्राप्त होते.

आश्विन शुक्ल दशमीला विजयादशमी म्हणतात. विजयादशमीचा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्रीदुर्गादेवीने विजय मिळविला. श्रीरामांनी रावणावर याच दिवशी मात केली.

अर्जुनाने अज्ञातवासात शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरवसैन्यावर स्वारी केली व विजय मिळवला, तो याच दिवशी. या कारणाने तिला विजयादशमी (विजय मिळवून देणारी दशमी) असे म्हटले जाते. दसरा हा भारतातील एक सार्वत्रिक सण आहे. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला दिसतो. प्रारंभीच्या काळात तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता.

पावसाळ्यात पेरलेल्या शेतातले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत. आजही नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर देवाला वाहतात.

या गोष्टी या उत्सवाचे मूळ कृषिस्वरूप व्यक्त करणाऱ्या आहेत. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात; ही प्रथादेखील या सणाचे कृषिविषयक स्वरूपच व्यक्त करते.

devi
Navratri: जाणून घ्या नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याची महती

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन, अपराजिता देवी पूजन व शस्त्रपूजा करण्याची प्रथा आहे. पूर्वी राजे-महाराजे युद्धात विजय मिळविण्यासाठी या दिवशी सीमोल्लंघन करून मुहूर्त करीत असत, म्हणूनच या दिवशी विजय मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे. हा मुहूर्त कार्यसिद्धी करणारा मानला जातो.

दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून एकमेकांना आपट्याची पाने देण्याची म्हणजेच सोने लुटण्याची प्रथा आहे. त्यामागे एक कथा आहे, ती अशी ः वरतंतु ऋषींचा कौत्स नावाचा शिष्य विद्याध्ययन पूर्ण करून घरी जाण्यास निघाला.

त्यावेळी त्याने गुरुजींना विचारले की, आपल्याला गुरुदक्षिणा काय देऊ? तेव्हा ऋषी म्हणाले, गुरुदक्षिणेसाठी मी तुला शिकविले नाही. तरी कौत्स परत परत तेच विचारत होता. शेवटी ऋषी म्हणाले, मी तुला १४ विद्या शिकविल्या तेव्हा १४ कोटी सुवर्णमुद्रा दे. पण त्या एकाच दात्याने दिलेल्या असाव्यात

त्यावेळी सिंहासनावर असलेल्या रघुराजाकडे कौत्स गेला. पण रघुराजाकडे तेवढी संपत्ती नव्हती. त्याने सर्व संपत्ती यज्ञयागात दान केली होती. अर्थलाभ होणार नाही हे लक्षात येताच कौत्स तेथून परत निघाला. पण हे रघुराजाला पटले नाही. त्याने निश्चय केला, की प्रत्यक्ष इंद्रावर स्वारी करून कौत्साला धन द्यावे.

हे इंद्राला कळताच इंद्राने शमी व आपटा वृक्षावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. राजाने कौत्साला सांगितले की, या सर्व मुद्रा घेऊन जा. कौत्स म्हणाला मला फक्त १४ कोटीच मुद्रा पाहिजेत. तेवढ्या मुद्रा घेऊन तो गेला.

उरलेल्या मुद्रांचे काय करावे असा प्रश्न रघुराजाला पडला. कारण या सर्व मुद्रा खरे पाहता कौत्साच्या होत्या. म्हणून मग त्याने लोकांना त्या लुटून नेण्यास सांगितले. तो दिवस विजयादशमी (दसरा) होता. म्हणून ‘सोने लुटणे’ असा शब्द रूढ झाला.

अशा अनेक कथा दसऱ्याच्या संदर्भात पुराणात कथन केलेल्या आहेत. दुर्गानवरात्र संपल्यानंतर हा दिवस येतो, म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही मानतात. काही घराण्यांतले नवरात्र नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते.

devi
Fasting Tips : मधुमेहाच्या रूग्णांनी नवरात्रीच्या उपवासात काय खावे काय खाऊ नये? इथे वाचा सविस्तर

सीमोल्लंघन

अपराण्हकाली गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमी वृक्ष किंवा आपटा असेल तिथे थांबतात. मग शमीची पूजा करतात.

पुढील श्लोकाने शमीची प्रार्थना करतात -

शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका ।

धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ।।

करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया ।

तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ।।

अर्थ – शमी पापांचे शमन (नष्ट) करते, रामाने जिचे पूजन आणि गुणवर्णन केले आहे अशी शमी अर्जुनांच्या बाणांना धारण करणारी (बाणांना सांभाळणारी) आहे. हे शमी, तू माझी (विजय) यात्रा निर्विघ्न आणि सुखकारक कर.

आपट्याची पूजा करताना पुढील श्लोक म्हणतात -

अश्मन्तक महावृक्ष महादोषविवारण ।

इष्टानां दर्शनं देहि कुरू शत्रुविनाशनम् ।।

अर्थ - हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर.

दसऱ्याचा दिवस हा सर्व शुभ कार्यांसाठी प्रशस्त मानतात. दशमी तिथी श्रवण नक्षत्राने युक्त असेल, तर तो दिवस अतिशुभ होय. म्हणूनच दसऱ्याला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानलेले आहे.

यावर्षी रविवारी १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना, नवरात्रारंभ करावा. घटस्थापना सूर्योदयानंतर दुपारी १:४८ पर्यंत करता येईल.

गुरुवारी १९ ऑक्टोबरला ललिता पंचमीचे पूजन करावे.

शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) व सरस्वती पूजन करावे.

सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन असून मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) उत्सव साजरा करावा.

यंदा विजयादशमी, दसरा, अश्वपूजा, अपराजिता व शमीपूजन, सीमोल्लंघन, विजय मुहूर्त दुपारी २:१८ ते ३:०४ असा आहे.

devi
Saptashrungi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगड...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.