हिंदी चित्रपटसृष्टीसाठी २०२३ अत्यंत उत्तम गेले. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली. २०२४कडूनही हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक आशा आहेत.
चित्ररसिकांकडून गेल्या वर्षी मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदाही अनेक उत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या वर्षी येणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी चर्चेत असणाऱ्या काही चित्रपटांविषयी...
सायली ससाणे
फायटर (२५ जानेवारी)
फायटर हा २०२४मधील सर्वात मोठा आणि अॅक्शन एंटरटेनर चित्रपट ठरेल अशी आत्तापासूनच चर्चा आहे. वॉर आणि पठाण या चित्रपटानंतरच्या सिद्धार्थ आनंदच्या ह्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट आहे.
पठाण आणि जवान या चित्रपटांनंतर दीपिका पुन्हा अॅक्शन अवतारात दिसणार आहे. तर वॉर आणि विक्रम वेधानंतर हृतिक रोशनही आणखी एकदा ॲक्शनपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची चर्चा आधीच शिगेला पोहोचली आहे. फायटर या वर्षाची धमाकेदार सुरुवात करेल अशी चर्चा बी टाऊनमध्ये आहे.
सिंघम अगेन (१५ ऑगस्ट)
दिग्दर्शक व निर्माता रोहित शेट्टीचा सिंघम हा चित्रपट सन २०११मध्ये आला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर रोहित शेट्टीने सिंघम रिटर्न हा चित्रपट केला आणि त्यानेदेखील चांगला व्यवसाय केला.
आता त्यानंतर २०२४मध्ये रोहित शेट्टी यांचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अजय देवगणसह अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ व करिना कपूर-खान अशी तगडी स्टारकास्ट आहे. सिंघम अगेन या चित्रपटाची चर्चा आता रंगू लागली आहे.
पुष्पा-२ (१५ ऑगस्ट)
सन २०२१ मध्ये पुष्पा.. द राइज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर उत्पन्नाचा नवीन विक्रम करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत कमाई केली होती. जगभरातल्या प्रेक्षकांवर पुष्पा.. द राइजची जादू पुढील कित्येक महिने होती.
‘झुकेगा नही साला’ सारखा संवाद असो वा सामी सामी, ऊ अंतवा आणि श्रीवल्ली अशी त्यातील चार्टबस्टर गाणी असोत, या चित्रपटाचा प्रत्येक पैलू चर्चेचा विषय ठरला होता. आता पुष्पा-२ द रूल येतो आहे.
अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना ही जोडी पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळेल. आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचा नुकताच प्रसिद्ध झालेला फर्स्ट लुक पाहून प्रेक्षक आत्ताच खऱ्या अर्थाने वेडे झाले आहेत.
लापता लेडीज (१ मार्च)
आमीर खान प्रॉडक्शन आपल्या ११वा चित्रपट घेऊन येत आहे. लापता लेडीज. एकाच रात्री, एकाच ट्रेनमधून बेपत्ता झालेल्या दोन नवविवाहितांच्या या कथेच्या ट्रेलरने प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे.
मनोरंजन उद्योगात नवनवीन चेहरे लॉन्च करण्याची आमीर खान प्रॉडक्शन हाउसची परंपरा आहे आणि लापता लेडीज ही परंपरा राखणार आहे.
दंगल, सिक्रेट सुपरस्टार, जाने तू... या जाने ना, तारे जमीन पर, पीपली लाइव्ह इत्यादी चित्रपटानंतर दिग्दर्शिका किरण राव यांचा हा सर्वात मोठा चित्रपट असणार आहे. मनोरंजन हा मुख्य गाभा असणाऱ्या हा चित्रपटात तीन नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.
मैं अटल हूं (१९ जानेवारी)
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनप्रवासावरील मै अटल हूं हा बहुप्रतिक्षित चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओ प्रस्तुत मै अटल हूंचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे, तर चतुरस्र अभिनेता अशी ओळख असणारे पंकज त्रिपाठी या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहेत.
देश पहले हे या चित्रपटातील पहिले गाणे गेल्या २५ डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात होत असताना प्रदर्शित झाले होते.
प्रभावी राजकीय नेतृत्व, माजी पंतप्रधान याचबरोबर एक संवेदनशील कवी अशी ओळख असणाऱ्या अटलजींचा जीवनप्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.