डॉ. राधिका टिपरे
अधेमधे एखादी मगर चिखलात सुखेनैव पहुडलेली... पाण्यात डुबलेल्या खारफुटीच्या फांद्यांवरसुद्धा मगरीची पिल्लं मस्त निवांत पहुडलेली होती. खरं सांगायचं तर नंतर जेव्हा आम्ही जंगलाच्या अगदी आत गेलो तेव्हा तर इकडे मगर... तिकडे मगर... झाडावरती मगर... चिखलात मगर... असं मजेशीर दृश्य दिसायला लागलं.
घरात बसून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची अजिबात इच्छा नव्हती. कुठंतरी जाऊन छान निवांत दोन-चार दिवस घालवावेत असं वाटत होतं. ओडिशा राज्यातली चिल्का आणि भितरकनिका ही दोन पक्षी अभयारण्यं पाहायची राहून गेली होती. दोन्ही पाणथळ अभयारण्यं आहेत आणि बंगालच्या उपसागराला खेटून आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी तिथं भेट द्यायला जावं, असं मनापासून वाटत होतं. माहिती काढून, थोडी फोनाफोनी करून दिवस ठरवले आणि आरक्षण करून टाकलं.
सुरुवातीला दोघांनीच जायचं असं ठरवलं होतं. पण दोन मैत्रिणी आपापल्या नवऱ्याबरोबर यायला तयार झाल्या. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही सहाजणांनी ही लहानशी ट्रिप एकत्रितपणे करायचं ठरवून टाकलं. भितरकनिकाला जायचं तर भुवनेश्वरला विमानानं जाऊन मग गाडीनं पाच तासांत तिथंवर पोहोचता येणार होतं.