दिल्ली :परवा पश्चिम दिल्लीत पंजाबी बाग भागात गेलो होतो. माझ्यासारख्या काही कुल्चावाल्यांनी सहज भेटायचं ठरवलं. तिथं गेलो आणि नेहमीप्रमाणे दिसले ते मोठ्ठाले बंगले. त्यांना इथं कोठी म्हणतात. आपली धान्य ठेवण्याची कोठी नाही!
कोठी म्हणजे चांगले तीन-चार मजली आलिशान बंगले. बंगल्याच्या समोर अरोराज्, खन्नाज्, धवन्स अशा नेमप्लेट लावतात. श्रीमंत लोकांचा सगळाच थाट कसा श्रीमंतीच असतो. समोर उंची गाड्या असतात. शोफर्स असतात. असे बंगले ओळीनं असतात. काही कोठ्या अशा असतात, की ग्राऊंड फ्लोअरवर मालक राहतात आणि वर एखादा भाडेकरू असतो.
पश्चिम दिल्ली हीच खरी दिल्ली, असाही दावा इथले काही लोक करतात. कारण ‘दिल्लीकर’पणाचे सगळे नियम इथे पाळले जातात. इथल्या भाषेला दिल्लीचा असा वेगळा टच आहे. इथले मध्यमवर्गीय कोठीमालकांसारखंच वागण्याचा प्रयत्न करतात.
मालकांसारखं वागणं आणि तसा रुबाब करणं तसंही दिल्लीकरांच्या रक्तातच आहे. पंजाबी बाग तरी त्याला कशाला अपवाद असेल?