संपादकीय
आठ-दहा दिवसांपूर्वी एक बातमी वाचली. विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातली. जवळजवळ साडेपाच लाख वर्षांपूर्वी अवकाशातून अतिशय वेगाने पृथ्वीवर आदळलेल्या उल्केमुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवरामुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या काही शाळांमधल्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेत आपले मोबाईल फोन बंद ठेवण्याचे ठरविले आहे.
युनेस्कोपासून ते मानवीवर्तनाचा अभ्यास करणाऱ्या जगभरातल्या विद्वानांपर्यंत अनेकजण एकुणातच समस्तांच्या, विशेषतः घडणीच्या वयातल्या मुलांच्या, स्मार्टफोन अवलंबित्वाबद्दल चिंता व्यक्त करीत असताना; बुलढाण्यातल्या शिक्षकवृंदाने घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.