सुजित काळे, कॅलिफोर्निया, यूएसए
A picture is worth a thousand words असं म्हणतात, पण कदाचित प्रवासात काढलेल्या फोटोंना हा सिद्धांत लागू होत नाही. कारण प्रवासात काढलेल्या प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते. ती गोष्ट ऐकल्याशिवाय त्या फोटोंचं ‘पाहणं’ पूर्ण होत नाही.
परवाच घर आवरताना फोटोंचा एक जुना अल्बम सापडला. त्यात माझ्या बालपणीच्या सहलींचे फोटो होते. मी चौथीत असताना एकदा आम्ही पुण्याला चाललो होतो. वाटेत स्टँडवर बाबांनी गरमागरम वडापाव घेतला आणि त्यासोबत एक मोठ्ठं वर्तमानपत्र का कसलातरी अंक घेतला.
त्यात लहान-मोठी अशी अनेक शब्दकोडी होती. घरी आल्यावर आम्ही त्यातलं सर्वात मोठं कोड सोडवलं. मी आणि माझ्या बहिणीनं ते गुपचूप पोस्टानं त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात पाठवलं. एक दिवस अचानक पोस्टमन एक पार्सल घेऊन आला.