Physiotherapy : खूप वेळ बैठे काम करणाऱ्यांना कंबरदुखीचा त्रास का होतो?

या स्नायूंची क्षमता टिकवण्यासाठी लागणारे विशिष्ट व्यायाम नियमित करणे गरजेचे असते.
back pain
back pain Esakal
Updated on

डॉ. वर्षा वर्तक

वयाच्या चाळिशीनंतर मॅरेथॉनसारखा लांब पल्ल्याचा पळण्याचा व्यायाम चालू केल्यास कोणत्या दुखापती होऊ शकतात?

पळण्यामुळे प्रामुख्याने पायाच्या तीन भागांवर ताण पडतो. गुडघे, नडगी आणि टाचा किंवा तळवा. पळताना गुडघ्याचा नेहमीपेक्षा अतिवापर होतो आणि गुडघे दुखू लागतात. याला ‘रनर्स नी’ असंही म्हणतात.

पळताना जेव्हा जेव्हा टाच उचलण्याची क्रिया होते, तेव्हा तेव्हा पोटरीचा स्नायू आणि टाच यांना जोडणारा ‘अकिलीस टेंडॉन’ ताणला जातो. या टेंडॉनच्या अतिवापरामुळे टाचेचा वरचा भाग दुखू लागतो. याला वैद्यकीय भाषेत ‘अकिलीस टेंडनाइटिस’ म्हणतात.

पळताना होणाऱ्या नडगीच्या हाडाच्या सततच्या वापरामुळे या हाडाभोवतीच्या मांसल भागाला सूज येऊ शकते. त्यामुळे नडगी दुखू लागते. कधीकधी याचे पर्यावसन नडगीच्या हाडाच्या फ्रॅक्चरमध्येही होऊ शकते. याला वैद्यकीय भाषेत ‘शिन स्प्लिंट’ म्हणतात.

या दुखापती होऊ नयेत म्हणून व्यवस्थित प्लॅनिंग करून पळण्याच्यासोबतच स्नायू बळकट करणारे व्यायामदेखील आवश्यक आहेत. तरीही दुखापत झाल्यास फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली विनासर्जरी उपाय करता येतात आणि मॅरेथॉन पळण्याचा आनंद मिळवता येतो.

खूप वेळ बैठे काम करणाऱ्यांना कंबरदुखीचा त्रास का होतो?

मुळात माणसाच्या शरीराची रचना खूप तास बसण्यासाठी, आणि तेही खुर्चीवर, झालेली नाही. सलग खूप तास उभे राहण्याने जसा पायांवर भार येणार, तसाच भार खूप वेळ बसण्यामुळे कंबरेवर येणार. त्यातच सलग बैठे काम करत असताना आपण नकळत थोडेसे पुढे झुकून बसतो. अशा प्रकारच्या बसण्यामुळे दोन मणक्यांच्या मधे असलेल्या गादीवर (डिस्क) अतिरिक्त भार पडू लागतो. त्यामुळे ही डिस्क झिजते किंवा थोडीशी बाहेर सरकते. आणि इथूनच कंबरदुखीची सुरुवात होते.

जर ही गादी झिजली तर दोन मणके एकमेकांवर घासू लागतात आणि वेदना होतात. ही डिस्क मणक्यांमधून बाहेर डोकावू लागली (हर्निया), तर नस (नर्व्ह) दाबली जाऊ लागते आणि कळ यायला सुरुवात होते.

ऑफिसमध्ये किंवा घरून काम करताना ताठ न बसता अयोग्य पोश्चरमध्ये सलग खूप वेळ बसणे पाठदुखीला आमंत्रण देते. यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे थोड्या थोड्या वेळाने चक्क उठून उभे राहायचे आणि थोडे पाय मोकळे करून यायचे. त्याचबरोबर फिजिओथेरपिस्टकडून ‘डेस्क स्ट्रेचेस’ शिकून घेऊन नियमितपणे करायचे. विशिष्ट योगासनेही खूप उपयुक्त ठरतात.

मणक्याभोवतीचे स्नायू वयाप्रमाणे शिथिल पडू लागतात आणि मग सगळा भार मणक्यावर पडतो. या स्नायूंची क्षमता टिकवण्यासाठी लागणारे विशिष्ट व्यायाम नियमित करणे गरजेचे असते. तुम्ही जर रोज नियमित चालायला जात असाल, तर त्याच्या जोडीने हेही व्यायाम करणे गरजेचे आहे.

तुमची तब्येत आणि तुमच्या प्रोफेशनची गरज याचा विचार करून फिजिओथेरपिस्ट तुमच्यासाठी व्यायाम ठरवून देतो. पाठीच्या स्नायूंची क्षमता जर चांगली असेल तर मणक्यावरचा भार स्नायूही विभागून घेतात. मग दिवसभर ऑफिसमध्ये खूप काम झाले तरी घरी आल्यावर तुम्ही उत्साहाने घरच्यांबरोबर वेळ घालवू शकता.

***

(डॉ. वर्षा वर्तक फिजिओथेरपी क्लिनिकच्या संचालिका आहेत.)

महत्त्वाचेः या लेखमालेत प्रश्नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. या उत्तरांना वैद्यकीय सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधारे कोणतेही वैद्यकीय निर्णय घेऊ नयेत. याबाबतीत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या डॉक्टरांशी किंवा फिजिओथेरपिस्टशी बोलावे व त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावेत.

निवेदन : फिजिओथेरपीविषयी तुम्हालाही काही प्रश्न असल्यास ते साप्ताहिक सकाळकडे saptahiksakal@esakal.com या ई-मेलवर जरूर पाठवा. ई-मेलच्या विषयात ‘फिजिओथेरपीविषयी’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.

-----------------------

back pain
‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’ ते ‘बीएमएम’ - परदेशात राहणाऱ्या मराठी माणसाला आधार देणारी संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.