अरविंद परांजपे
सूर्यमालेच्या शोधातील दोन नावे अशी आहेत ज्यांनी इतर शास्त्रज्ञांसारखे शोध लावले नाहीत. पण सूर्यमालेच्या या शोधात त्या दोघांचा खारीच्या वाट्यापेक्षा थोडा मोठा वाटा आहे. त्यांचे अप्रत्यक्ष योगदान नाकारता येणार नाही.
सुमारे १३व्या शतकापर्यंत भिंग बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते आणि बारीक अक्षर वाचण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला होता. पण आज ज्या प्रकारचे चष्मे आपण वापरतो तशा प्रकारचे चष्मे निर्माण व्हायला १८वे शतक उजाडावे लागले होते. सांगण्याचा मुद्दा असा, की दुर्बिणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य १३-१४व्या शतकापर्यंत उपलब्ध झाले होते. आणि कदाचित काहींनी दुर्बिणी तयार केल्याही असतील पण दुर्बीण-निर्मितीचे श्रेय दिले जाते हान्स लिपरहॉयला.
हान्स लिपरहॉय (Hans Lipperhey १५७० - २९ सप्टेंबर १६१९) या जर्मन-डच व्यक्तीचा चष्मे बनवण्याचा व्यवसाय होता. आता जर्मनीमध्ये असणारे व्हीझल हे शहर लिपरहॉयचे जन्मगाव. वयाच्या २४व्या वर्षी तो त्यावेळच्या झीलॅण्डची राजधानी मिडलबग येथे स्थायिक झाला. हे गाव आता नेदरलॅंड्समध्ये आहे. इथेच तो भिंग तयार करण्यास शिकला, या तंत्रज्ञानात पारंगत झाला व त्याने स्वतःचा कारखाना आणि दुकानही थाटले.
दुर्बिणीचा शोध नेमका कसा लागला याबद्दल दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेनुसार लिपरहॉयच्या कारखान्यात दोन मुले भिंगे घेऊन खेळत होती. खेळताखेळता एक भिंगाच्या मागे दुसरे भिंग लावल्यावर त्या मुलांना दूरवरच्या चर्चवरील वातकुक्कुट जवळ दिसू लागले, आणि दुर्बिणीची कल्पना सुचली. तर अन्य काहींच्या मते लिपरहॉयकडे शिकणाऱ्या कारागिराने दोन भिंगे वापरून दूरची वस्तू जवळ बघता येईल ही कल्पना सुचवली असेल.
वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. लिपरहॉयने २ ऑक्टोबर १६०८ या दिवशी या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज केला. आपल्या उपकरणाबद्दल तो लिहितो, की या उपकरणाचा उपयोग ‘दूरच्या गोष्टी जवळ असल्यासारखे पाहण्यासाठी’ आहे. पण इतरांनीही असेच उपकरण बनवले आहे, असे कारण देत त्याला हे पेटंट नाकारले गेले नंतर लिपरहॉयने दोन दुर्बिणी वापरून दोन्ही डोळ्यांनी बघता येईल असे आणखी एक उपकरण बनवले आणि त्याच्या डिझाईनच्या बदल्यात डच सरकारने त्याला मोठे बक्षीस दिले.
लिपरहॉयने दोन प्रकारच्या दुर्बिणी बनवल्या. एका प्रकारात त्याने दोन बहिर्वक्र भिंगांचा वापर केला होता. अशा प्रकारच्या दुर्बिणीतून प्रतिमा उलट्या दिसतात. तर दुसऱ्या प्रकारात त्याने एक बहिर्वक्र आणि एक अंतर्वक्र भिंग वापरले. या प्रकारात प्रतिमा सरळ दिसतात.
त्यावेळी या उपकरणांना डच परस्पेक्टिव्ह ग्लास (Dutch Perspective Glass) असे म्हणत असत. याला टेलिस्कोप (Telescope) असे नाव जियोव्हानी डेमीसीयानी या ग्रीक शास्त्रज्ञाने दिले. टेलि म्हणजे दूर आणि स्कोपीन (Skopein) म्हणजे बघणे. आपल्याकडेही दूरदर्शी हा शब्द याच अर्थाने वापरतात.
लिपरहॉयच्या नंतर इतर काही जणांनीही दुर्बिणीचा शोध लावल्याचा दावा केला आणि पेटंटसाठी अर्जही केले. पण ते अर्जही फेटाळून लावण्यात आले. याच काळात सूक्ष्मदर्शीचाही शोध लागला होता. पण दुर्बिणीचे नाते गॅलिलिओशीच घट्ट जमले होते. गॅलिलिओने या उपकरणाकडे एका शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले. त्याने दुर्बिणीचा उपयोग खगोलविज्ञानासाठी केला आणि मुख्य म्हणजे त्याच्या निरीक्षणांमुळे सूर्यकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेचा पाया भक्कम झाला.
याच काळातील आणखीन एका व्यक्तीबद्दल सांगायला हवं. ज्योर्दानो ब्रुनो (Giordano Bruno १५४८-१६००). ब्रुनोला ‘विज्ञानाचा हुतात्मा’ म्हणूनही संबोधले जाते. ब्रुनो हा एक इटालियन तत्त्वज्ञ आणि कवी. विश्वाबद्दल त्याने आपले सिद्धांतही मांडले होते. हा गूढवादीही होता.
सध्याच्या नेप्लस प्रांतातील एका गावात ब्रुनोचा जन्म झाला होता. जन्माच्यावेळी त्याला दिलेले नाव होते फिलिपो ब्रुनो. त्याचे प्राथमिक शिक्षण नेप्लस येथील आगस्तियन मॉनेस्ट्रीत झाले. वयाच्या १७व्या वर्षी त्याने डोमिनिकन फ्रायर पंथात प्रवेश केला आणि ज्योर्दानो हे नाव धारण केलं. नंतर त्याने केव्हिनिझमचा स्वीकार केला. फ्रायर मंडळी आपल्या परंपरेतील भिक्षुकांसारखी असतात. त्यांची स्वतःची अशी संपत्ती नसते. पावित्र्य आणि आज्ञाधारकपणा हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. हे लोक सामान्य माणसांमध्ये काम करतात आणि देणग्या किंवा इतर लोकांनी दिलेल्या मदतीवरच ते जगत असतात. ब्रुनोला वयाच्या २४व्या वर्षी प्रीस्ट (धर्मोपदेशक) म्हणून नियुक्त करण्यात आले. याच काळात तो आपल्या अफाट स्मरणशक्तीसाठीही प्रसिद्ध होता.
ब्रुनो त्याच्या उत्कृष्ट क्षमतांसाठी ओळखला जात होता पण त्याचे मुक्त विचार आणि ‘निषिद्ध पुस्तकां’च्या त्याच्या आवडीमुळे त्याला अडचणीही आल्या. याच काळात कोपर्निकसने त्याच्या पुस्तकात सूर्यकेंद्रित विश्वाची संकल्पना मांडली होती. आणि ही कल्पना पटल्याने ब्रुनो कोपर्निकसचा एक मोठा समर्थक झाला होता. इतकेच नव्हे तर त्याने दूरवरचे तारे स्वतःच सूर्यासारखे आहेत, असाही प्रस्ताव मांडला. पुढे तो हेही म्हणतो, की या ताऱ्यांभोवती फिरणारे या ताऱ्यांचे ग्रहही असतील आणि महत्त्वाचे म्हणजे या ग्रहांवर सजीवांची उत्क्रांतीही झाली असावी. इथेच न थांबता ब्रुनोने, विश्व अनंत आहे आणि त्याचा एक विशिष्ट असा केंद्र बिंदू नाही, असेही प्रतिपादन केले. पुढे तो इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनीत शिकवण्यासाठी गेला. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली. पण समाज त्याला स्वीकारायला तयार नव्हता. या ना त्या कारणांमुळे प्रत्येक ठिकाणांवरून बाहेर पडून अखेरीस तो व्हेनिसला पोहोचला. व्हेनिस हे त्या काळातील एक उदारमतवादी राज्य होते. इथे आपला स्वीकार होईल अशी ब्रुनोची समजूत होती, पण ती त्याची मोठी चूक ठरली.
व्हेनिसमध्ये असताना त्याच्यावर पाखंडी मते मांडत असल्याचा अनेक प्रमुख कॅथॉलिक सिद्धांत नाकारण्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला चौकशीस सामोरे जावे लागले. चौकशीत ब्रुनोने अत्यंत कुशलतेने स्वतःचा बचाव केला. काही आरोप त्याने खोडून काढले. काही कट्टर मतांबाबत त्याला शंका होती हे त्याने मान्य केले. अनेक महिने चाललेल्या या चौकशीच्या शेवटी, १५९३च्या जानेवारीत त्याला रोमला पाठवण्यात आले.
पुढे जवळजवळ सात वर्षे त्यावर खटला चालू होता. अनेक विश्वे असू शकतात हा विचार त्याने मांडला हाच त्याच्यावरचा मुख्य आरोप होता. त्याला हा विचार सोडून देण्याचा सल्ला देण्यात आला होता. कार्डिनल बेलारमाइन यांच्या देखरेखीखाली हा खटला चालला होता. त्यांनी ब्रुनोला परत एकदा त्याचे विचार पूर्ण बदलण्यास सांगितले. ते त्याने पूर्णपणे नाकारले. अखेरीस त्याला दोषी ठरवण्यात आले व त्याला मृत्युदंड ठोठावण्यात आला. यावर ब्रुनो धमकी देणारे हावभाव करत म्हणाला, की या निकालाची मला जितकी भीती वाटेल त्यापेक्षा जास्त भीती तुम्हाला माझ्या विरुद्ध निकाल देताना वाटत आहे. १७ फेब्रुवारी १६०० यादिवशी रोममध्ये नग्नावस्थेत त्याला एका खांबावर उलटे बांधून त्याखाली जाळ पेटवून त्याचा अंत करण्यात आला.
तेहेतीस वर्षांनंतर गॅलिलिओला जेव्हा अशाच चौकशीचा सामना करावा लागला आणि त्याने आपले सर्व आरोप मान्य केले तेव्हा वयाच्या सत्तरीत असणाऱ्या गॅलिलिओला ब्रुनोची आठवण नक्कीच झाली असणार.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.