डॉ. सुनंदा विद्यासागर महाजन
कोणत्याही साहित्यकृतीचे भाषांतर करणे तसे आव्हानात्मकच असते, परंतु कवितेचे भाषांतर करताना त्यात आणखी काही आयामांची भर पडते. भाषांतराची कृती एकप्रकारे नवनिर्मिती असते. काहींना वाटते, की भाषांतरकार स्वतः कवी असेल, तर तो जास्त चांगल्या प्रकारे भाषांतराचे आव्हान पेलू शकतो. ते खरे असेलही, पण सर्जनशील कवी नसूनही कवितेचे भाषांतर करता येईलच.
कवितेचे भाषांतर या विषयावर लिहायचे म्हणजे आधी कविता म्हणजे काय, आणि भाषांतर म्हणजे काय हे उलगडले पाहिजे, आणि मग ते कसे करायचे, का करूच नये हे पाहिले पाहिजे. कवितेचे वेगळेपण हे कवितेचे पुस्तक हातात घेतले, की दृश्य स्वरूपात ठळकपणे जाणवतेच. कथा, कादंबरीपेक्षा कविता दिसायला वेगळी आहे, हे लक्षात येते.