रामायणातली वनसंपदा: दोनशेपेक्षा जास्त वनस्पती आणि अनेक प्राण्यापक्ष्यांचे रामायणात उल्लेख

जैवविविधता, तिचं मूल्य, सर्व ठिकाणच्या परिसंस्था, जंगलांचे प्रकार या सर्वांची नोंद रामायणात केलेली आहे.
forest in ramayana
forest in ramayana esakal
Updated on

डॉ. कांचनगंगा गंधे | अशोक कुमार सिंग

वाल्मिकी ऋषींनी रामायणात जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त वनस्पती आणि अनेक प्राण्यापक्ष्यांचे उल्लेख केलेले आहेत. या संपदेच्या काही पाऊलखुणा आजही श्रीरामाच्या वनवास मार्गावर आढळतात.

जैवविविधता, तिचं मूल्य, सर्व ठिकाणच्या परिसंस्था, जंगलांचे प्रकार या सर्वांची नोंद रामायणात केलेली आहे.

महर्षी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणामध्ये उत्तर प्रदेशातल्या अयोध्येपासून सुरू झालेला श्रीरामाचा वनवास मार्गाचे; सीतेचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणच्या घनदाट, रौद्र जंगलातून, तसंच शांत, मोहक अरण्य, वन-उपवनातून राम-लक्ष्मणानं केलेल्या प्रवासाचे वर्णन आहे.

रामाचा वनवास मार्ग आणि राम-लक्ष्मणाने प्रवास केलेले जंगल याबरोबरच भारताच्या दक्षिण टोकाकडे असलेल्या श्रीलंकेतील सदाहरित अशोक वाटिका, हिमालयातल्या द्रोणागिरी पर्वतावरच्या औषधी वनस्पती हा सर्व खजिना रामायणामध्ये उलगडलेला आहे.

या सर्व ठिकाणी असलेली जैवविविधता, म्हणजेच वनस्पती, प्राणी, पक्षी, किडे, कीटक आणि त्यांच्यातले परस्पर संबंध, ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या नात्यानं जंगलातल्या अन्नसाखळ्या, अन्नजाळ्या आणि त्यांच्यातले उपजतच पाळले जात असलेले जंगलाचे कायदेकानू, निरनिराळ्या प्रकारच्या परिसंस्था (Ecosystems) या महाकाव्यात पाहायला मिळतात.

दीर्घकाळपर्यंत अबाधित राहिलेल्या जंगलांबरोबरच निसर्गाची भौगोलिक रूपं - सपाट, उंच सखल भूप्रदेश, पर्वत, डोंगर, टेकड्या, उंच शिखरं; तळी, सरोवरं, नद्या, नाले, समुद्र यांसारखे जलस्रोत अशा अनेक प्राकृतिक जैविक आणि अजैविक घटकांच्या चित्रलिपींचा सुंदर मिलाफ रामायणामध्ये दिसून येतो.

forest in ramayana
Ram Aayenge Lata Mangeshkar Voice : AI नं रेकॉर्ड केलं लता मंगेशकरांच्या आवाजात 'राम आयेंगे'! नेटकरी म्हणाले, 'हा आवाज तर...'

याशिवाय जंगलाच्या सीमावर्ती वनसदृश भागात ऋषिमुनींनी साकारलेले आश्रम; वड-पिंपळासारख्या भव्य वृक्षांच्या छायेत ध्यान-धारणा, तपस्या करण्याचे स्थान; शिष्यांना विविध विद्यांत पारंगत करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील कार्यास चालना देण्यासाठी केलेलं योगदान, त्याचबरोबर वनसंपदेचा योग्य वापर करूनही तिची जपणूक कशी करायची अशा अनेक प्रकारांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वोच्च दर्शन रामायणात जागोजागी घडतं!

रामायणातल्या जंगलांच्या प्रकारांतला निसर्ग जेवढा सुंदर आणि शांत आहे, तेवढाच तो रौद्र, अशांत आणि संतापी आहे. असं असूनही जंगलं टिकून होती, त्यामुळेच हजारो वर्षांपूर्वीचं रामायण आणि त्यातल्या वनसंपदेचं वैभव, माहात्म्य अजूनही मनाला भुरळ घालणारं आणि आपलं वाटणारं आहे!

विश्वामित्रांनी त्यांच्या आश्रमात श्रीराम आणि लक्ष्मणाला धनुर्विद्येत पारंगत केलं. त्यांची पुढील वाटचाल (आत्ताच्या) बिहारमधल्या बक्सरमधून सुरू झाली.

इथल्या ‘तटाका’ अरण्यात महाकाय वृक्ष, वेली, खैर, अर्जुन, बिल्व, आंबा, मोह, शिसम, बांबू याशिवाय पॅसपॅलम्, फ्रॅगमॅटिससारखे गवताचे प्रकारही खूप होते.

याचा उपयोग श्रीरामाने त्या जंगलात असलेल्या त्राटिका राक्षसिणीला ठार मारण्यासाठी केला, असा उल्लेख आहे.

इथलं प्राणीविश्व जास्त भीतीदायक होतं! सिंह, वाघ, जंगली अस्वलं, अन्य हिंस्र पशू, सुळेवाले हत्ती, गिधाडं, गरुड, विविध कीटकांच्या झुंडीच्या झुंडी...

या सर्वांच्या थरकाप उडवणाऱ्या कर्कश्श आवाजांमुळे दिवसाही हे घनदाट जंगल भीतीदायक वाटत असावं. या जंगलात फार थोडा काळ श्रीरामांचं वास्तव्य होतं!

श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या वनवासाला खरी सुरुवात झाली ती आत्ताच्या उत्तर प्रदेशमधला चित्रकूट जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या सटना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या, जैववैविध्यानं नटलेल्या आणि भूरचनेतही विविधता असलेल्या, उष्णकटिबंधातल्या मिश्र-शुष्क पानगळीच्या ‘चित्रकूट’ अरण्यातून!

प्रत्येक ऋतूत बदलणाऱ्या सौंदर्यानं नटलेलं, पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे अरण्य जसजसं आत जावं तसतसं घनदाट होणारं, पण वनस्पती, प्राणी यांनी समृद्ध होतं. उंच-सखल भूभाग, पर्वत, टेकड्या, मंदाकिनीसारखी मोठी नदी, गुंटा, वाल्मिकी, गेदुआ, चक्र, झुरी यांसारख्या छोट्या नद्या, पावसाळ्यात वाह‌णारे झरे, तळी अशा जलस्रोतांमुळे जंगलातली हिरवाई बारा महिने टिकून असायची.

कमळं, कुमुदिनी, पाणवनस्पती तर होत्याच, पण पाणवठ्यावर क्रौंच, हंस, प्लव, रथंगासारख्या पक्ष्यांची सतत ये-जा असायची.

सारस हे स्थलांतरित पक्षीही विणीच्या हंगामात या भागात येत असत. कोकीळ, कॅकोरासारखे सुरेल आवाज असणारे पक्षी, पिसारा फुलवून मोहक हालचाली करणारे मोर, रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे जंगलाचं सौंदर्य मोहक होतं.

ह्या जंगलाचं वैभव वाढलं होतं ते तृणभक्षी आणि मांसाहारी प्राण्यांमुळे! विविध प्रकारची हरणं, माकडं, वाघ, चित्ते, हत्ती असे प्राणी जंगलाच्या आतल्या भागात होते.

धूप, मोह, भूर्ज, तिनिशा, असाना, पुन्नागा, सळई, काळा पळस असे अनेक पानगळी वृक्ष इथं असल्यामुळे चित्रकूटचं जंगल पानगळीचं जंगल म्हणून ओळखलं जायचं.

त्याच घनदाट जंगलात काही भागात एकाच प्रकारची अनेक झाडं-वृक्ष होते, हे भाग त्या वृक्षाच्या नावानं ‘उप-जंगल’ म्हणून ओळखले जायचे.

यात ‘करढाई’चं जंगल, ‘सळई’चं जंगल, ‘खैर’ आणि ‘बांबू’ची जंगलं होती, असे उल्लेख आहेत.

forest in ramayana
Ayodhya Ram Mandir : व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात

चित्रकूट जंगल वनस्पतीदृष्ट्या ‘आदर्श’ जंगल होतं. यात वनस्पतींचे तीन स्तर होते. उंच वाढणाऱ्या पहिल्या स्तरात भूर्ज, धूप, मोह, काळा शिरीष, कळंब, बेल, अर्जुन, शाल्मली, तेंदू असे अनेक वृक्ष होते. तर त्याच्या खालच्या, दुसऱ्या स्तरात अमलतास, खैर, गेळ, काळा कुडासारखे मध्यम आकाराचे वृक्ष होते.

खालच्या स्तरात सहदेवी, आघाडा, पिवळा धोत्रा, दगडपाला, फ्लेमिंजियासारख्या सहा इंचापासून फूट-दीड फुटापर्यंत वाढणाऱ्या वनस्पती वाढत होत्या. त्यामुळेच लांबून हे जंगल म्हणजे हिरवागार पडदा पसरल्यासारखं दिसत असे.

याशिवाय पर्वतावर आणि जंगलात काळी मुसळी, अपामार्ग, गुळवेल, निरगुडी, लिटसिया, अर्जुन, मालकांगुणी, बेल, दगडपाला, मुरुडशेंग, पुनर्नवा अशा अनेक औषधी वनस्पतीही होत्या.

चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी असणारे मंदाकिनी नदीजवळचं अरण्य आल्हाददायक होतं. फळझाडं, कंदमुळे आणि आश्रम साकारण्यासाठी लागणारा बांबू, कळक आणि पामही तिथे होते.

चारोळी, आवळा, बोरांच्या जाती, आंबा, बेल, फणस अशी फळझाडंही होती. तर अमलतास, कांचन, कदंब अशी सुरेख फुलं येणारी झाडंही होती.

म्हणूनच अनेक ऋषींचे आश्रम चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी होते. याच भागात श्रीरामही बरीच वर्षं पर्णकुटी शाकारून राहिले होते, असा उल्लेख रामायणात आढळतो.

चित्रकूट पर्वत, पर्वताचा पायथा, तिथला उंच-सखल आणि सपाट भाग, विविध प्रकारचे जलस्रोत आणि त्या ओघानं वाढणाऱ्या विविध वनस्पती, वास्तव्याला येणारे प्राणी, पक्षी, स्थलांतरित पक्षी; विविध परिसंस्था, त्यातल्या अन्नसाखळ्या या सर्वांमुळे चित्रकूटचं जंगल सतत हालचाल करणारं, जिवंत आणि परिपूर्ण होतं, असं म्हणायला हरकत नाही.

forest in ramayana
Ram Mandir Pran Pratishta: प्राणप्रतिष्ठा विधी, आज रामलल्लाच्या मूर्तीला १०० हून अधिक कलशांच्या पाण्याने घालण्यात येणार स्नान

चित्रकूटमध्ये बरीच वर्षं राहिल्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह ‘दंडकारण्य’ या घनदाट, भयावह पण पानगळीच्या जंगलात गेले. आताच्या भारतात हे दंडकारण्य मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणाच्या काही भागात होतं.

असं म्हणतात की या जंगलात ‘दंडका’ राक्षसाचं वर्चस्व होतं म्हणून हे दंडकारण्य! तर वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते, ‘दंडा-त्रिना’ हे दीड ते दोन मीटर उंच वाढणारं गवत इथं विपुल प्रमाणात होतं.

याशिवाय होम, हवन आणि धार्मिक कार्यात वापरला जाणारा ‘दर्भ’ म्हणजे ‘कुश’ गवतही या जंगलात होतं.

ह्या दर्भाच्या चटईवर बसून अनेक ऋषिमुनी ध्यानधारणाही करायचे. गवताशिवाय साल, मोह, अर्जुन, धावडा हे विशाल, उंच वृक्ष होते. पाताळा, बेल, तिन्दुका हे मध्यम आकाराचे वृक्षही होते.

दंडकारण्य पर्वत, सरोवर, नद्या आणि जंगलाच्या मोठ्या भूप्रदेशानं व्यापलेलं होतं.

इथं हत्ती, रानगवे, सिंह, वाघ, बिबटे, विविध प्रकारची माकडे, कोल्हे, लांडगे, हरणं, काळविटं, अस्वलांसारखे प्राणी; तर सारस, कौंच, प्लव, मोर, हंस, गिधाडांसारखे पक्षी, कीटकांचे थवे होते.

या सगळ्यांच्या सततच्या कोलाहालामुळे दिवसासुद्धा दंडकारण्य भीतीदायक वाटत असावं.

दंडकारण्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या गोदावरी नदीच्या जवळच्या ‘पंचवटी’ या दंडकारण्याच्या उप-अरण्यात वास्तव्यासाठी आले.

एखाद्या ध्यानस्थ तपस्व्याप्रमाणे शांत असलेले, त्यांच्या सान्निध्यात आल्यावर मनःशांती मिळणारे, पारंब्यांनी लगडलेले पाच वटवृक्ष एका ठिकाणी होते म्हणून ‘पंचवटी’ नाव पडलं असावं!

अरण्याजवळची पवित्र गोदावरी नदी, तिच्या भोवतालचं स्वच्छ, सुंदर उत्साह वाढवणारं वातावरण; हंस, चक्रवाक पक्ष्यांचं वास्तव्य, हरणांचे कळप, मोर इथं होते; मात्र हिंस्र प्राणी नव्हते.

याशिवाय कंदमुळे, औषधी वनस्पती, फळं, फुलांनी हे शुष्क पानगळीचं जंगल समृद्ध होतं!

इथं तमालपत्र, सात, ताडी, पाम, सीता अशोक, खजूर, फणस, शमी, पळस, खैर, चाफा असे लहान-मोठे वृक्ष तर होतेच, पण खरं वैशिष्ट्य म्हणजे तुळस आणि कमळं या वनस्पतींचं वर्चस्व होतं.

पंचवटीचं अरण्य एकंदरीत शांत, आल्हाददायक होतं, भुरळ घालणारं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथेच सीतेला कांचन मृगाची भुरळ पडली आणि रावणानं तिचं अपहरण केलं!

forest in ramayana
Ayodhya Ground Report: सुप्रीम कोर्टाचा निकाल ते प्राणप्रतिष्ठापना, अयोध्येत पाच वर्षात काय बदल झाले?

श्रीराम आणि लक्ष्मण सीतेला शोधण्यासाठी तुंगभद्रा नदीच्या दक्षिण दिशेच्या पंपा सरोवर आणि कर्नाटकातल्या किष्किंधा व त्याच्या जवळच्या अरण्यात आले. इथे सुग्रीवाचं राज्य होतं, असे उल्लेख आढळतात. पंपा सरोवर आजही पवित्र मानलं जातं.

सरोवराला बाराही महिने पाण्याचा स्रोत होता. पाणी नितळ, स्वच्छ होतं! सरोवर असल्यामुळे पाणी नदीसारखं वाहत नाही. जरी ही जल परिसंस्था असली तरी नदीपेक्षा इथले जैविक आणि अजैविक घटक, जैवविविधता वेगळी आहे.

सरोवरात वाढणारी कमळं, पाणवनस्पती, स्थलांतरित पक्षी, राजहंस, क्रौंच, बदकं असे पाणपक्षीही इथं होते. माशांच्या काही दुर्मीळ जाती, रंगीत आणि विविध जातीचे इतर मासेही या सरोवरात होते. सहाजिकच इथल्या अन्नसाखळ्या वेगळ्या प्रकारच्या होत्या.

सरोवराजवळच्या अरण्यात आंबा, जांभूळ, फणस, प्रियाला अशी फळझाडं होती. याशिवाय रक्तचंदन, चंदन, बकुळ, निळा अशोक, अर्जुन, नागकेशर, चाफा, वांजुळा, शिरीष, शाल्मली, पळस, पुन्नागा, कोविदार, हिंताळा असे सुंदर वृक्ष तर होतेच.

शिवाय मल्लिका, माधवी लता, जुईसारखे सुंदर फुलांचे वेलही होते. सोनटक्का, केतकी, चाफा, बकुळ या सुगंधी वनस्पतींची नोंद वाल्मिकींनी केली आहे. पंपा सरोवराजवळची वृक्षराजी म्हणजे ‘स्वप्नातलं सुंदर स्थळ’ होतं.

इथे शुष्क आणि दमट पानगळीच्या जंगलाचे निदर्शक असणारे सर्व वृक्ष आढळतात. इथे तुंगभद्रा नदीकाठची, पंपा सरोवरातली आणि त्याच्या जवळची, अरण्यातली आणि अरण्याच्या सीमावर्ती भागातल्या परिसंस्था असल्यामुळे वेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि मुख्यत्वेकरून विविध नावे/जाती असलेल्या वानरांचे उल्लेखही रामायणात आहेत.

रावणाने सीतेला श्रीलंकेतल्या सदाहरित वृक्ष वाटिकेत बंदिस्त करून ठेवले होते. तेथे सीता अशोक वाटिकेत अशोकाच्या झाडाखाली राहिली होती.

ह्या मध्यम उंचीच्या वृक्षाची पानं एकदम कधीच गळत नाहीत, त्यामुळेच हा सदाहरित वृक्ष म्हणून ओळखला जातो.

मार्च-एप्रिलमध्ये तांबडे-नारिंगी फुलांचे घोस आले की हे झाड अप्रतिम दिसतं. लाल कोवळ्या पानांचे नवीन शेंडे म्हणजे मुकुटावर झुलणारा शिरपेच वाटतो.

याशिवाय ह्या अशोक वाटिकेत बकुळ, सप्तपर्णी, रक्तचंदन, चंदन, नागकेशर, चाफा असे सदाहरित वृक्षही होते. इथे असलेले वृक्ष मुद्दाम लावलेले होते, म्हणूनच इथला भाग जंगलाचा भाग म्हणून न ओळखता ‘वाटिका’ म्हणून ओळखता जातो.

forest in ramayana
Ramayana Facts : जेव्हा सगळे संपले तेव्हा प्रभू श्रीरामांच्या बचावासाठी सीतेने केले उग्ररूप धारण केले!

सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी राम-रावणाचं युद्ध झालं. त्यात लक्ष्मण मूर्च्छीत झाला.

त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाने हिमालयातला (आता अल्पाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातला) औषधी वनस्पतींचं भांडार असलेला द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता.

त्यात दगडालगत वाढणारी ‘मृत संजीवनी’ ही वनस्पती होती. ती नावाप्रमाणेच मृतवत माणसाला संजीवनी देणारी वनस्पती आहे.

लक्ष्मण आणि इतर योध्यांनाही बाण लागलेले होते. ‘दगडपाला’ ही सहा ते आठ इंच वाढणारी वनस्पती द्रोणागिरीवर होती. त्या वनस्पतीचा पाला ठेचून जखमेवर लावला तर जखम लवकर बरी होते.

‘संधानी’ ही हाडं जोडणारी वनस्पती; फाटलेली कातडी जुळून येण्यासाठी ‘सुवर्णकरणी’ ही वनस्पती द्रोणागिरीवर होती. या पर्वतावर औषधी वनस्पती तर होत्याच, पण सुगंधी वनस्पतीही होत्या, असे उल्लेख रामायणामध्ये वाचायला मिळतात.

वाल्मिकींनी रामायणात जवळ जवळ दोनशेपेक्षा जास्त वनस्पती आणि अनेक प्राणी, पक्ष्यांचे उल्लेख केलेले आहेत.

आजही या संपदेच्या काही पाऊलखुणा वनवास मार्गावर आढळतात. जैवविविधता, तिचं मूल्य, सर्व ठिकाणच्या परिसंस्था, जंगलांचे प्रकार या सर्वांची नोंद रामायणात केलेली आहे.

ऋषिमुनींनी अरण्याच्या, जंगलाच्या सीमावर्ती भागात राहून तपश्चर्या, निसर्गाचे नियम, तत्त्वं आत्मसात केली. म्हणूनच आजही रामायणाल्या वनसंपदेच्या चित्रलिपीचं मोल अमूल्य आहे.

-------------

forest in ramayana
Ram Mandir Ayodhya: अभिषेक करण्यापूर्वी रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गाभार्‍यात आणली, VIDEO पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.