राजश्री अनिल बिनायकिया
शंकरपाळी अथवा शंकरपाळे हा महाराष्ट्रात दिवाळीत केला जाणारा खास पारंपरिक पदार्थ! म्हणूनच दिवाळी म्हटली की फराळामध्ये काही खास पदार्थ केले जातात, त्यात शंकरपाळी हवीतच.
छान तांबूस रंगाची खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी समोर आली की ती नक्कीच लक्षात राहतात, आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर हमखास हवी तशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात.
साहित्य
एक वाटी साजूक तूप, १ वाटी साखर, दीड वाटी दूध, अंदाजे मैदा, पाव वाटी बारीक रवा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी रिफाइंड तेल.
कृती
प्रथम दूध गरम करून त्यामध्ये साखर विरघळवून घ्यावी. नंतर तूप पातळ करून त्यामध्ये मिक्स करावे. तयार मिश्रण परातीमध्ये ओतून घ्यावे व व्यवस्थित हाताने फेटून घ्यावे. नंतर त्यामध्ये मीठ घालून मावेल तेवढा मैदा व रवा मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्यावे. अर्धा तास पीठ झाकून ठेवावे. नंतर या पिठाचे मोठे गोळे करून अर्धा इंचाची जाड पोळी लाटावी. पोळीचे काप कापून शंकरपाळीचा आकार द्यावा व तेलात मंदाग्नीवर शंकरपाळी तळावीत. गार झाल्यावरच डब्यात भराव्यात. ही शंकरपाळी फार खुसखुशीत लागतात.
टीप : मैद्याऐवजी गव्हाचे पीठही वापरू शकता.
**
साहित्य
अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, पाव वाटी बेसन, पाव वाटी मैदा, २ उकडून कुस्करलेले बटाटे, २ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, २ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, मीठ चवीनुसार, थोडेसे हिंग, १ टीस्पून ओवा, २ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, तळण्यासाठी तेल.