लाल भोपळ्याचा हलवा
वाढप : ४ व्यक्तींसाठी
साहित्य : अर्धा किलो लाल भोपळा, १ वाटी साखर, २ चमचे साजूक तूप, २ टेबलस्पून साबुदाणा पीठ, अर्धा चमचा लिंबू रस आणि पाव वाटी काजू आणि बदामाचे काप.
कृती : लाल भोपळ्याची साले काढून फोडी करून त्या वाफवून घ्याव्यात. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. जाड बुडाच्या पातेलीत ही पेस्ट घालून त्यात साखर घालून शिजायला ठेवावे. साखर विरघळत असताना सतत ढवळावे. दोन मिनिटांनी साबुदाणा पीठ पाण्यात चांगले घोळून घ्यावे आणि ते ह्या मिश्रणात घालून सतत ढवळावे. पातेल्याच्या कडेने मिश्रण सुटू लागले, की तूप घालून ढवळावे. ह्याच वेळी थोडे काजू, बदाम काप घालून हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत घालून थापावे. उरलेले काजू व बदाम काप वरून लावून सजवावे. जरा थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. हा हलवा उपवासालापण चालेल.