समुद्रतळाशी सापडणाऱ्या बुरशीवरील नवीन संशोधनाकडे भविष्यातील ‘गेम चेंजर’ म्हणून का पाहिले जातेय?

वैज्ञानिकांनी आजवर प्रयत्न सुरू ठेवून नवनव्या दिशा शोधल्या ती चिकाटीच माणसाला सुरक्षित भविष्याची ग्वाही देत राहील!
Seabed
Seabedesakal
Updated on

पेनिसिलियम वंशातल्या एका विशिष्ट बुरशीच्या संसर्गामुळे सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते, हे जीवाणुशास्त्रज्ञ ॲलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या लक्षात आले त्याला आता पंचाण्णव वर्षे होतील.

माणसाच्या शरीरातल्या नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीवर संशोधन करताना डॉ. फ्लेमिंग यांना पेनिसिलीनचा शोध लागला आणि मानवी शरीरातल्या जंतुसंसर्गाला तोंड देणाऱ्या पहिल्या प्रतिजैवकाची निर्मिती झाली.

पेनिसिलीनच्या शोधाने विशिष्ट प्रकारच्या औद्योगिक सूक्ष्मजीवविज्ञान संशोधनालाही प्रोत्साहन मिळाले.

साडेनऊ दशकांनंतर संशोधकांना आता समुद्रतळाशी सापडणाऱ्या आणखी एका बुरशीपासून पेनिसिलीनइतकंच प्रभावी असू शकणाऱ्या औषधद्रव्याची निर्मिती करता येईल अशी आशा वाटू लागली आहे.

जीवाणुजन्य रोगांच्या प्रतिकाराचे आव्हान दरदिवशी गहिरे होत असताना प्रतिजैवकांच्या नव्या पिढीच्या निर्मितीच्या आशेचा हा किरण सागरी डीएनएच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासाच्या निष्कर्षांत दिसून आला आहे.

फ्रन्टिअर्स ऑफ सायन्सच्या ताज्या अंकात हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.

हा अभ्यास म्हणजे जगभरातल्या सागरी जीवांमधील ३१.७ कोटींहून अधिक संख्येने असणाऱ्या जनुक गटांसह महासागरांची विविधता समजून घेण्याच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

या अभ्यासातून तयार झालेला पहिला ‘ओशन जीन कॅटलॉग’ महासागरांच्या आरोग्यावर तसेच पृथ्वीच्या हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या आणि परिणामी मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या सागरी सूक्ष्मजीवांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे या अभ्यासकांनी म्हटले आहे.

वेगवेगळ्या सागरी परिसंस्था नेमकं कशा पद्धतीने काम करतात याच्या अभ्यासासह सागरी प्रदूषण आणि तापमानवाढीचा मागोवा घेण्याबरोबरच जनुक विविधतेतील विषाणूंचा सहभाग शोधण्याच्या, प्लास्टिकचा वापर थांबवण्याचे नवीन उपाय शोधण्याच्या किंवा आधी उल्लेख केल्याप्रमाणे नवीन प्रतिजैविकांच्या निर्मितीसारख्या अनंत शक्यतांना या ओशन जीन कॅटलॉगमुळे चालना मिळू शकते, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे.

या अभ्यासाच्या निमित्ताने पहिल्यांदाच महासागरांमधल्या ट्वायलाइट झोनमधल्या म्हणजे जिथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही इतक्या खोलीवर जगणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या नोंदी शक्य झाल्या आहेत.

२००९पासून सुरू असलेल्या या अभ्यासाच्या एक प्रमुख लेखिका एलिसा लायओलो यांच्या मते असंख्य शक्यतांना जन्म देणाऱ्या या अभ्यासाने संशोधकांना असंख्य कोडीही घातली आहेत.

Seabed
Sea Life : खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार

या अभ्यासामुळे डीप सी गोल्ड रशसारख्या मुद्द्यांवरही सध्या सुरू असणाऱ्या चर्चांनाही काही दिशा मिळू शकेल असा अंदाज आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या पुढच्या पिढीसाठी आवश्यक ठरणारे काही दुर्मीळ धातू (रेअर अर्थ एलिमेंट) प्रशांत महासागराच्या तळाशी आहेत.

खोल पाण्यात काम करू शकणाऱ्या यंत्रमानवांच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून हे धातू मिळवण्याच्या शक्यतांनी अलीकडेच एका नव्या उद्योगाला जन्म दिला आहे.

भविष्यातला ‘गेम चेंजर’ म्हणून या नव्या खाण उद्योगाकडे पाहिले जात असले, तरी या कल्पनेमुळे सागरी परिसंस्थांचे कायमचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त करणारा आणखी एक पैलू या चर्चेला जोडला गेला आहे.

खोल समुद्रातील सूक्ष्मजीव आणि त्यांच्या परिसंस्थांबद्दलच्या या नव्या अभ्यासाने महासागरांमधील या उत्खननाबाबत कदाचित नव्याने विचार करावा लागेल.

एकीकडे माणसाला भेडसावणारे जंतूसंसर्ग रोखण्यासाठी महासागरांच्या ट्वायलाइट झोनमधील संजीवनीचा उपयोग होण्याच्या शक्यता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे माणसाच्या विजिगिषूवृत्तीचं पुनःप्रत्यंतर देत ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी निपाह व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावरच्या लशीच्या मानवी चाचण्यांना सुरुवात केली आहे. निपाहच्या पहिल्या साथीनंतर पंचवीस वर्षांनी संशोधकांना हे यश मिळाले आहे.

Seabed
Sea Link Bridge : सागरी सेतूमुळे पाच हजार लोकांवर उपासमारीची वेळ!

भारतासह सिंगापूर, मलेशिया आणि बांगलादेशात आढळणाऱ्या या पशुजन्य रोगात माणसं दगावण्याचं प्रमाण जवळजवळ पंचाहत्तर टक्के आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळमध्ये पसरलेली निपाहची साथ हे आपल्याकडील अगदी ताजे उदाहरण.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पँडेमिक सायन्स इन्स्टिट्यूटच्या ChAdOx1 NipahB लशीनं आवश्यक त्या सर्व चाचण्या पार केल्या तर तो मानवजातीला आणखी एक दिलासा ठरेल.

माणसाच्या माणूसपणात अनुस्यूत असणारी जिगीषा माणसाला कंबर कसून उभं राहायला लावते, मग नव्या वाटा शोधल्या जातात, आतापर्यंतचं ज्ञान, अनुभव पणाला लागतात आणि या मंथनातून अवघ्या मानवजातीला दिलासा मिळत राहातो.

संशोधकांच्या कित्येक पिढ्या गेली कित्येक शतकं विज्ञानाचा हा प्रवास पुढे नेत आहेत. प्रत्येक नव्या वळणावर नवे आव्हान स्वीकारत! परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्या चिकाटीने वैज्ञानिकांनी आजवर प्रयत्न सुरू ठेवून नवनव्या दिशा शोधल्या ती चिकाटीच माणसाला सुरक्षित भविष्याची ग्वाही देत राहील!!

-------------

Seabed
Mumbai Police Viral Video: मुंबई पोलिसांनी रायगडमध्ये वाचवले गिर्यारोहकाचे प्राण; सोशल मिडियावर कौतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.