किशोर पेटकर
साधारणतः दोन वर्षांपूर्वी भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा स्पर्धात्मक कोर्टपासून दूर जाण्याचा विचार करत होता, कारण सामने जिंकणे त्याच्यासाठी कठीण ठरत होते. त्याने चाळिशीही गाठली होती.
खरे म्हणजे हे वय निवृत्तीचे. पण रोहनची पत्नी व लहानगी मुलगी त्याच्यासाठी प्रेरणास्रोत ठरल्या. मुलीने आपल्याला खेळताना पाहावे, आपला पराक्रम तिने अनुभवावा या ध्येयाने रोहनने विचार बदलला.
टेनिस दुहेरीतील कारकीर्द आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला. प्रबळ दृढनिश्चयाच्या बळावर वयाच्या ४३व्या वर्षी रोहनने कारकिर्दीतील पहिले पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम मिळविले. या जिगरबाज भारतीय टेनिसपटूची वाटचाल स्पृहणीय आणि कौतुकास्पद आहे.
ऑस्ट्रेलियन टेनिसपटू मॅथ्यू एबडेन याच्या म्हणण्यानुसार, रोहन ४३ वर्षांचा असला तरी मनाने तो चिरतरुण असून प्रखर योद्धा आहे. रोहन बोपण्णाने एबडेनच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीचा किताब जिंकला, तेव्हा तो ४३ वर्षे व ३२९ दिवसांचा होता.
याचाच अर्थ टेनिसमधील खुल्या युगात पुरुष दुहेरीत ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा तो सर्वात वयस्क खेळाडू ठरला. २९ जानेवारी २०२४ रोजी ४३ वर्षे व ३३१ दिवसांचा असताना रोहन जागतिक पुरुष दुहेरीत मानांकनात अग्रक्रमांकावरील खेळाडू बनला. वयस्क टेनिस खेळाडूंत हा सुद्धा जागतिक विक्रम ठरला.
वय हा फक्त आकडा असतो, असे मानणारे भरपूर क्रीडापटू आहेत. वाढत्या वयासह यशाला गवसणी घालणे सोपे नाही. त्यासाठी कमालीची तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ राखणे तेवढेच महत्त्वाचे असते, त्यात बोपण्णाने चिकाटी प्रदर्शित केली.
भारतीयांसाठी ग्रँडस्लॅम टेनिसमधील यश म्हणजे नवलाई नाही. पुरुष दुहेरीत लिअँडर पेसने आठ, तर महेश भूपतीने चार वेळा अजिंक्यपद पटकावले आहे. सानिया मिर्झाही महिला दुहेरीत ग्रँडस्लॅम विजेती ठरलेली आहे.
असे असतानाही ४४व्या वाढदिवसाच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहनची ग्रँडस्लॅम सफलता प्रेरणादायी वाटते.
२०१७ साली त्याने कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोवस्कीच्या साथीत ग्रँडस्लॅम मालिकेतील फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचा किताब पटकावला होता, पण तो कधीच पुरुष दुहेरीत ग्रँडस्लॅम विजेता ठरला नव्हता.
अखेर ६१व्या प्रयत्नात आणि १९ साथीदारांसमवेत खेळल्यानंतर त्याला पुरुष दुहेरीतील ग्रँडस्लॅम विजेता होता आले. खूप संघर्षानंतर यश मिळाले, त्यामुळे मेलबर्नला जिंकलेला करंडक कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असून आपण जीवनातील उत्कृष्ट टेनिस खेळत असल्याचे रोहनला वाटत आहे.
तो केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगभरातील क्रीडापटूंसाठी प्रेरणादूत बनला आहे. त्याची कामगिरी निश्चितच अभिमानास्पद ठरली आहे.
नव्या साथीदाराशी जोडी जमली
चाळिशीकडे झुकत असताना पूर्ण तंदुरुस्तीसाठी बोपण्णा आग्रही होता. योगाभ्यास त्यासाठी वरदान ठरला. गेल्या काही वर्षांपासून तो बंगळूरमध्ये प्रामाणिकपणे योगाभ्यास करत असून त्याचे गोड फळ त्याला आता चाखायला मिळत आहे.
शरीर चपळ राखण्यासाठी त्याला फिजिओ, ट्रेनर यांचीही तेवढीच मदत लाभत आहे. योगसाधनेमुळे शरीर ऊर्जामय झाले आणि तंदुरुस्तीची क्षमताही कित्येकपटीने वाढल्याचे रोहन एका मुलाखतीत म्हणाला आहे.
योगसाधनेमुळे शरीर मजबूत होत असताना मानसिक स्वास्थ्यातही समतोलता साधता येत असल्याने टेनिस कोर्टवर पूर्ण एकाग्रतेने खेळता येते, असे या अनुभवी टेनिसपटूचे म्हणणे आहे.
वर्ष २०२३ रोहनसाठी चेतनादायी ठरले. निवृत्तीचा विचार झटकून तो टेनिस कोर्टवर नव्या उमेदीने उतरला. ३६ वर्षीय मॅथ्यू एबडेन या ऑस्ट्रेलियन टेनिसपटूशी त्याची जोडी जमली.
ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना बोपण्णा व एबडेन यांचे एकत्रित वय ८० वर्षे व २६ दिवस इतके होते. मात्र त्यांचा धडाका आणि जोश अवर्णनीय ठरला.
त्यामुळे या भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीच्या धमाकेदार खेळासमोर अंतिम लढतीत सिमोन बोलेल्ली व अँड्री व्हावासोरी या इटलीच्या जोडीस दोन सेटमध्येच माघार घ्यावी लागली.
मेलबर्न येथे पराक्रम नोंदविण्याच्या वाटेवर असताना भारत सरकारने रोहनला ‘पद्मश्री’ने सन्मानित केले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरी किताब आणि पद्मश्री सन्मान हा बोपण्णासाठी आगळा दुग्धशर्करायोग ठरला.
गतवर्षी त्याने पुरुष दुहेरीत सातत्याने लक्षवेधक खेळ केला. मास्टर्स स्पर्धा जिंकणारा, अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठणारा आणि एटीपी फायनल्समध्ये विजय नोंदवणारा रोहन बोपण्णा दुहेरीतील सर्वांत वयस्क पुरुष टेनिसपटू ठरला. तीच जिगर बोपण्णाने आता नव्या टेनिस मोसमाच्या प्रारंभीच प्रदर्शित केली.
विजेतेपदाच्या मोहिमेत तिसऱ्या फेरीत त्याने दुहेरीतील ५००वा विजय नोंदविणारा पराक्रम साध्य केला. बोपण्णाला आपली गुणवत्ता, क्षमतेबाबत कधीच संशय नव्हता. खेळाडूच आपल्या शरीराला पूर्णतः जाणू शकतो.
केव्हा थांबावे हा निर्णयसुद्धा त्यालाच घ्यायचा असतो. बोपण्णाची टेनिस कोर्टवरील जिंकण्याची भूक कायम होती, फक्त शरीर शंभर टक्के तंदुरुस्त हवे होते. त्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली, शरीर थकणार नाही याकडे कटाक्ष राखला. मन आणि शरीर ताजेतवाने राखत तो चँपियन बनला.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.