कबीर साहेब, रैदासजी, धन्ना जाट, पीपाजी यांच्यासारखे संतश्रेष्ठ निर्माण होऊनदेखील उत्तर भारतीय समाज मानसावर व जीवनावर वारकरी संप्रदायासारखा एकत्रित सखोल संस्कार होऊ शकला नाही. याला कारण या संतांना एका पताकेखाली आणणारे नामदेवराय उत्तर भारतीय भक्ती आंदोलन मिळाले नाहीत.
डॉ. राहुल हांडे
कबीर साहेबांच्या निवार्णानंतर उत्तर भारताच्या भक्ती आंदोलनात एका नव्या पर्वाचा प्रारंभ होतो. महायोगी गोरक्षनाथांनंतर नाथसंप्रदायाप्रमाणे प्रभावी पंथाचे निर्माण उत्तर भारतात कबीर साहेबांपर्यंत झालेले नव्हते.
कबीर साहेबांचादेखील एक धागा नाथ संप्रदायाशी जोडलेला होता. कबीर साहेबांनी आपल्या आयुष्यात स्वतःच्या म्हणून अशा कोणत्याही पंथाचा उद््घोष केला नाही. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे पुत्र कमाल साहेब यांनीदेखील कबीर साहेबांच्या नावाने पंथ स्थापन करण्यास नकार दिला.
कबीर साहेबांच्या सर्व रचनांचे अवलोकन केल्यास त्यांनी कोणत्याही संप्रदाय अथवा सिद्धांतांचे अंधानुकरण केलेले नव्हते, असे दिसते. त्याचबरोबर त्यांच्या पूर्ववर्ती अशा कोणत्याही मताचा जीर्णोद्धार करून नव्या संप्रदायाची पायाभरणी केली नाही.
समाज आणि धर्म यांतील विडंबन, अवडंबर, विरोधाभास यांच्यावर टीका करून खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवणे, हा कबीर साहेबांचा प्रमुख उद्देश होता. धर्माच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेले कर्मकांड अथवा बाह्याचार आणि माणसामाणसात भेद करण्याच्या धारणा हे सर्व निरर्थक व निराधार आहेत.
हा सर्व प्रकार मानव जातीला लाभदायक नसून हानिकारक आहे. यामुळे परस्पर द्वेष आणि पाखंड सोडून काहीच निष्पन्न होत नाही. भक्ती म्हणजे माणसाला स्वतःचा परिचय होणे. त्यासाठी कोणत्याही धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा, लोकसमूहाचा भाग होणे आवश्यक नाही.
मन निर्मळ होऊन सर्वांविषयी निखळ प्रेम आणि स्वतःविषयी समाधान असणे, हाच खरा मोक्ष. अशी साधी सरळ वाटणारी; परंतु आत्मशुद्धीची कठोर कसोटी म्हणजे भक्ती. असे तत्त्वज्ञान आयुष्यभर मांडणाऱ्या कबीर साहेबांची भक्ती कोणत्या धर्माच्या अथवा पंथाच्या सीमेत कैद होऊ शकणारी नव्हती. त्यामुळे धर्म, संप्रदाय, पंथ इत्यादी सोपस्कार आणि कबीर साहेब हे समीकरण कधीही जुळणे शक्य नव्हते.
आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात एखाद्या सिद्धांताचा किंवा तत्त्वज्ञानाचा प्रवर्तक आपल्या सिद्धांताचा अथवा तत्त्वज्ञानाचा प्रचार होण्यासाठी आपल्या अनुयायांचे संघटन वा पंथ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो.
यासाठी तो आपल्या अनुयायांना आवश्यक उपदेश करण्यास सुरुवात करतो. यामागे आपले सिद्धांत अधिकाधिक यशस्वीपणे प्रचारात यावेत आणि आपल्या अनुयायांची संख्या वृद्धिंगत होत राहावी, ही इच्छा असते.
यासाठी आपला मृत्यू समीप आल्यानंतर असा सिद्धांत प्रवर्तक एखाद्या सुयोग्य उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करतो आणि प्रचाराची रूपरेषाही निश्चित करून देतो. कबीर साहेब असोत, की भारतीय वैष्णव भक्ती आंदोलनातील अन्य संत असोत, कोणीही असा प्रयत्न केलेला दिसत नाही.
उत्तर भारताच्या भक्ती आंदोलनांचा प्रेरक राहिलेल्या वारकरी संप्रदायाच्या भक्ती आंदोलनात सर्व संत आणि त्यांचे अनुयायी भागवत धर्माच्या पताकेखालीच राहिले. नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचे संघटक, समन्वयक व प्रचारक अशा रूपांत अत्यंत मौलिक योगदान दिले असले तरी वारकरी संप्रदाय नामदेवरायांचा पंथ अथवा संप्रदाय म्हणून ओळखला गेला नाही.
वारकरी संप्रदायात ज्ञानदेव-नामदेव-एकनाथ-तुकोबा अशी संतपरंपरा दिसत असली तरी वारकरी संप्रदायात त्यांच्या शाखा निर्माण झाल्या नाहीत. हे संतश्रेष्ठ असोत की सामान्य वारकरी, सर्वजण वारकरी संप्रदायाचे वारकरी म्हणून समान ठरतात.
उत्तर भारतातील भक्ती आंदोलनाची ज्योत नामदेवरायांनी प्रज्वलित केली असली तरी नामदेवरायांसारखा संघटक, समन्वयक व प्रचारक तेथे निर्माण होऊ शकला नाही, हे मान्य करावे लागते.
त्यामुळे उत्तर भारतीय भक्ती आंदोलन एका अर्थाने विस्कळीतच राहिले. महाराष्ट्राच्या समाज मानसावर आणि जीवनावर वारकरी संप्रदायाचा एकत्रित सखोल संस्कार व प्रभाव दिसून येतो. कबीर साहेब, रैदासजी, धन्ना जाट, पीपाजी यांच्यासारखे संतश्रेष्ठ निर्माण होऊनदेखील उत्तर भारतीय समाज मानसावर व जीवनावर असा एकत्रित सखोल संस्कार होऊ शकला नाही.
याला कारण या संतांना एका पताकेखाली आणणारे नामदेवराय उत्तर भारतीय भक्ती आंदोलन मिळाले नाहीत. अशा विस्कळीतपणाचा परिणाम असा झाला, की ह्या संतांनंतर त्यांच्या तत्त्वज्ञानावर आणि नावावर विविध पंथ निर्माण झाले.
त्या पंथांमध्ये अनेक शाखा निर्माण झाल्या. कबीर साहेबांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेल्या कबीर पंथापासून उत्तर भारतात प्रत्येक संतांचा पंथ वेगळा होण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली.
याचा परिणाम उत्तर भारतीय भक्ती आंदोलन विविध पंथांमध्ये आणि त्यांच्या अनेक शाखांमध्ये विभागले गेले. तर ‘नानक पंथ’ अथवा ‘दादू पंथ’ अशा पंथांना त्यांच्या प्रवर्तकांनीच निर्माण केले.
आज शीख धर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नानक पंथाच्या निर्मितीत कबीर पंथांच्या निर्मितीची बीजे नकळतपणे दडलेली दिसतात. नानकदेवांनी निर्वाणसमयी आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारार्थ आपले शिष्य लहना यांचे ‘अंगद’ असे नामकरण करून विधिवत आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
येथपासून नानक पंथात गुरुपरंपरा आणि नियोजनबद्ध विस्ताराची प्रक्रिया प्रारंभ झाली. याचा परिपाक म्हणजे नानक पंथ एक धर्म म्हणून स्वतःचे पृथक अस्तित्व सिद्ध करण्यात यशस्वी झाला.
शीख धर्माच्या प्रत्येक गुरूंनी नानक पंथाला एक धर्म म्हणून स्वतंत्र ओळख देण्यासाठी प्रयत्न केला. नानक पंथाच्या हा प्रयत्न पाहून कबीर साहेब, रैदासजी आदी संतांच्या अनुयायांमध्ये असा प्रयत्न करण्याची इच्छा प्रबळ झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कबीर साहेबांच्या निर्वाणानंतर कबीर पंथ कधी आणि कसा अस्तित्वात आला यासंदर्भात विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. कबीर साहेबांच्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी कबीर साहेबांनंतर त्यांच्याप्रमाणेच भटकंती करून आपल्या गुरूच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करत होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संघटन अथवा सुसूत्रता नव्हती.
नानक पंथाच्याच निर्मिती काळात सूरत गोपाल हे कबीर पंथाचे सर्वप्रथम व प्रख्यात प्रचारक समजले जातात. कबीर तत्त्वज्ञानाचा प्रचार करत जगन्नाथपुरी येथे आलेल्या सूरत गोपाल यांनी तेथेच देहत्याग केला, अशी मान्यता आहे.
कबीर पंथाची आणि त्याच्या शाखांची निर्मिती होत असताना शेख फरीद, जंभनाथ, संत सिंगाजी, संत भीखमजी अशा संतांनी भक्ती आंदोलनाची पताका पुढे नेण्याचे काम केले. यामध्ये जंभनाथ नाथसंप्रदायी तर शेख फरीद सूफी संप्रदायाचे होते.
ह्या दोघांनी स्वतःच्या म्हणून व्यापक सिद्धांतांची मांडणी केले असली तरी हे दोघे आपापल्या संप्रदायापासून कधी पृथक झाले नाहीत. त्याचप्रमाणे या काळातील इतर संतांनादेखील तशी आवश्यकता वाटली नाही.
पं.परशुराम चतुर्वेदी यांनी कबीर पंथाच्या निर्मितीचा इतिहास सविस्तरपणे मांडलेला आहे. कबीर पंथीय ग्रंथांचा आधार घेऊन चतुर्वेदी यांनी काही तर्क दिलेले आहेत. त्यानुसार कबीर साहेबांनी आपल्या चत्रभुज, बंकेजी, सहतेजी आणि धर्मदास ह्या चार शिष्यांना आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी चार दिशांना पाठवले होते.
यापैकी चत्रभुज, बंकेजी व सहतेजी यांच्यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नाही. धर्मदासांनी कबीर पंथाची धर्मदासी शाखा निर्माण केली. मध्य प्रदेशात तिचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
अनुराग-सागर ग्रंथात कबीर पंथांच्या बारा शाखा त्यांच्या प्रवर्तकांच्या नावावरून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये मृत्यू अंधा, तिमिर दूत, अंध अचेत, मनभंग, ज्ञानभंगी, मकरंद, चित्तभंग, अकिलभंग, विसंभर, नकटा, दुरगदानी आणि हंसमुनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
ह्या सर्व शाखांनी मात्र कबीर साहेबांच्या सत्य मार्गाच्या विरोधात प्रचार व आचरण केलेले दिसते. धर्मदास शाखेचा साधा उल्लेखदेखील अनुराग-सागरमध्ये करण्यात आलेला नाही. तुलसीदासांच्या घट-रामायण आणि परमानंद यांच्या कबीर-मन्शूर ग्रंथांमध्ये उपरोक्त बारा शाखांची काही प्रमाणात माहिती मिळते.
त्यानुसार बारा शाखांच्या नावांचा संबंध त्यांच्या प्रवर्तकांशी असावा. बारा शाखांचे प्रवर्तक क्रमशः सांगताना नारायणदास, भागोदास, सूरत गोपाल, साहेबदास, टकसारी-पंथ-प्रवर्तक, कमाली, भगवानदास, प्राणनाथ, जगजीवनदास, तत्त्वाजीवा व गरीबदास असे सांगण्यात आलेले आहेत.
अनुराग-सागर ग्रंथाच्या कर्त्यांनी इतर शाखांचे महत्त्व दाखवण्यासाठी धर्मदासी शाखेचा उल्लेख जाणीवपूर्वक नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कबीर पंथाच्या आज तीन प्रमुख शाखा आणि त्यांच्या उपशाखा अस्तित्वात असलेल्या दिसतात. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेणे महत्त्वाचे ठरते.
काशी/ कबीरचौरा/ मगहर शाखा - काशी शाखेचे प्रवर्तक म्हणून सूरत गोपाल यांचे नाव घेतले जाते. अनुराग-सागर ग्रंथात त्यांचा उल्लेख ‘अंध अचेत’ असा करण्यात आलेला आहे.
काशी शाखेला कबीरचौरा आणि मगहर म्हणून ही ओळखले जाते. काशी शहराचा एक भाग आजही कबीरचौरा म्हणून ओळखला जातो. याठिकाणी कबीरचौरा मठदेखील आहे. त्याच्या जवळ ‘नीरू टीला’ म्हणून स्थान आहे.
येथे कबीर साहेबांच्या माता-पित्याचे घर होते, असे सांगितले जाते. मध्य प्रदेशात बुरहानपुर मठ, जगन्नाथपुरी (कबीर समाधी), द्वारका (कबीर मठ) असे कबीरचौरा शाखेचे मठ अस्तित्वात असलेले दिसतात. तसेच उत्तर प्रदेश व बिहारमध्येदेखील कबीरचौरा शाखेचा प्रभाव दिसतो.
छत्तीसगढी शाखा - धर्मदास हे कबीर पंथाच्या छत्तीसगढी शाखेचे प्रवर्तक मानले जातात. छत्तीसगडमधील बांधवगड हे धर्मदास यांचे मूळ स्थान असल्यामुळे ही शाखा छत्तीसगढी शाखा म्हणून ओळखली जाते.
कबीरचौरा अथवा काशी शाखेपेक्षा छत्तीसगढी शाखेचे अनुयायी आणि उपशाखा अधिक आहेत. धर्मदासांच्या काव्यरचना काशीच्या वेलवेडियर प्रेसद्वारा धनी धर्मदासजी की शब्दावली नावाने प्रसिद्ध केल्या आहेत.
बांधवगढशी संत सेना नाई यांचाही संबंध आहे. तसेच कबीर साहेबांप्रमाणे सेनाजी स्वामी रामनंद यांच्या बारा शिष्यांपैकी एक होते.
धनौती शाखा - बिहारमधील धनौती येथे कबीरचौरा शाखेचा एक मठ आहे. कबीरचौरा शाखेचा मठ असला तरी तेथून ‘भगताही’ नावाच्या शाखेचा जन्म झालेला दिसतो. बुंदेलखंडातील पिशौराबादचे भगवान गोसाई (भगवानदास) हे भगताही शाखेचे म्हणजेच धनौती शाखेचे प्रवर्तक मानले जातात.
निम्बार्क संप्रदायाची दिक्षा घेतलेले भगवान गोसाई अथवा भगवानदास कबीर साहेबांच्या सहवासात आले आणि त्यांचे शिष्य बनले. त्यांनी कबीर साहेबांच्या सहाशे वचनांचा संग्रह लिहून ठेवला होता. या संग्रहाला वर्तमान बीजक ग्रंथाचे मूळस्वरूप मानले जाते.
उपरोक्त तीन शाखांसोबतच कबीर पंथाच्या द्वादश पंथ, साहेबदासी पंथ (कटक, ओदिशा), मूल निरंजन पंथ (काठियावाड), टकसारी पंथ (बडोदा), जीवापंथ (भडोच) इत्यादी काही शाखा सांगता येतात.
कोणत्याही पंथ वा संप्रदाय निर्मितीच्या विरोधात असणारे कबीर साहेब अखेर विविध पंथात आणि त्यांच्या शाखांमध्ये विभागले गेले. धर्म-वर्ण-जात-पंथ यांच्या सीमेपलिकडे असलेल्या कबीर साहेबांना त्यांच्या अनुयायांनी आपापल्या पंथाच्या सीमेत कैद करण्याचा आणि लाभ उठवण्याचा प्रयत्न केला.
असे असले तरी यामुळे एकच लाभ झाला तो म्हणजे कबीर साहेबांच्या काव्याचे व तत्त्वज्ञानाचे जतन, संवर्धन आणि हस्तांतरण झाले. धर्म-वर्ण-जात-पंथ सीमातीत असणाऱ्या कबीर साहेबांनंतर उत्तर भारतीय भक्ती आंदोलनात विविध पंथ वा संप्रदायाच्या निर्मितीने धरलेला जोर भक्ती आंदोलनाला एका छताखाली येऊ न देण्यास कारणीभूत ठरला.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.